Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘बीएमएम’मध्ये मराठीला हिंदीचा पर्याय
मराठीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पुन्हा एकदा आंदोलन होणार
प्रतिनिधी

 

परराज्यातून मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकणे शक्य होणार नाही, असे कारण पुढे करून ‘बॅचलर ऑफ मास मीडिया’ (बीएमएम) या इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रमात मुंबई विद्यापीठाने मराठीला हिंदीचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयावर ज्येष्ठ पत्रकार, विद्यार्थी संघटना व अधिसभा सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
यंदापासून लागू करण्यात आलेल्या पुनर्रचित ‘बीएमएम’ अभ्यासक्रमामध्ये संवादकौशल्य (मराठी, हिंदी, इंग्रजी) व अनुवादकौशल्य (मराठी, हिंदी, इंग्रजी) हे दोन्ही विषय अनिवार्य करण्यात आले होते. परंतु, यातील मराठीला आक्षेप घेत दक्षिण मुंबईतील चार प्रश्नध्यापकांनी मराठी भाषा वगळण्याची मागणी केली. या चार प्रश्नध्यापकांनी राज्यपाल एस. सी. जमीर यांच्याकडेही तक्रार केली होती. परंतु, हा विषय विद्यापीठाच्या कक्षेत येत आहे. त्यामुळे या संदर्भात विद्यापीठानेच अंतिम निर्णय घ्यावा अशी सूचना राज्यपालांनी केली. त्यानुसार विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अ. दा. सावंत यांच्याकडे बैठक झाली.
तक्रारदार चार प्रश्नध्यापकांसह मराठीचा आग्रह धरणारे ज्येष्ठ पत्रकार तसेच बीएमएमच्या अभ्यास मंडळाचेही सदस्य यावेळी उपस्थित होते. सुरुवातीला संवादकौशल्य व अनुवादकौशल्य या दोन विषयांवर आक्षेप घेणाऱ्या या चार प्रश्नध्यापकांनी नंतर सर्वच विषयांबद्दल आक्षेप घ्यायला सुरुवात केली. शिवाय हा पुनर्रचित अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचाही त्यांनी आग्रह धरला. त्यावरून जोरदार खडाजंगी झाली. शेवटी परराज्यातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन संवादकौशल्य व अनुवादकौशल्य या दोन विषयांतील मराठी भाषेला हिंदीचा पर्याय देण्याचा निर्णय प्र-कुलगुरू डॉ. सावंत यांनी घेतला. परंतु, अभ्यासक्रम यंदापासून लागू करण्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली.
मराठीला हिंदीचा पर्याय देण्याच्या निर्णयावर मात्र मराठी समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई विद्यापीठाची ही भूमिका चुकीची असून त्यात राज्य सरकारने लक्ष घालावे. सर्वच अभ्यासक्रमात मराठी अनिवार्य करण्याची सूचना सरकारने राज्यातील विद्यापीठांना करावी अशी मागणी ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे अध्यक्ष प्रश्न. दीपक पवार यांनी केली आहे. मुंबई विद्यापीठाला मराठीचे वावडे असल्यानेच त्यांना अमराठी लोकांचा पुळका येत असल्याची टीका अधिसभा सदस्यांकडून करण्यात येत आहे. या निर्णयाच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे देण्यात आला आहे.
याबाबत, अ. दा. सावंत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, बैठकीत सर्वाच्या सहमतीनेच मराठी अथवा हिंदी असा पर्याय लागू करण्याचा निर्णय झाला आहे. जे विद्यार्थी मराठी भाषिक नाहीत त्यांना मराठी भाषा शिकताना कठीण जाईल यावर बैठकीतील सर्वानीच सहमती दर्शविली होती.