Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

विदेशी नागरिकांच्या सेवेत ‘कुटुंबसखी’!
प्रश्नजक्ता कदम

 

गेली अनेक वर्षे खवय्यांना अस्सल मराठमोळ्या आणि घरगुती पदार्थाचा आस्वाद घडविणारी ‘कुटुंबसखी’ आता परदेशी नागरिकांची भूक भागविण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या आठवडय़ापासून ‘कुटुंबसखी’ने आपला मुक्काम थेट अमेरिकन सेंटरमध्ये ठोकला असून सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच निरनिराळ्या बैठकांच्या निमित्ताने जगभरातून अमेरिकन सेंटरमध्ये येणाऱ्या परदेशी नागरिकांना ‘कुटुंबसखी’ मराठी खाद्यपदार्थाचा आस्वाद घडवित आहे. ‘सखी’ची ही भरारी नक्कीच उल्लेखनीय आहे. मात्र त्याच वेळी परदेशी नागरिकांच्या जिभेवर फास्टफूडऐवजी मराठी खाद्यपदार्थाची चव रुळवायचे शिवधनुष्य ‘कुटुंबसखी’ला पेलावे लागणार आहे.
नरिमन पॉईंट, सीएसटी, गिरगाव आदी परिसरात ‘कुटुंबसखी’ची केंद्रे आहेत. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी ही केंद्रे खवय्यांच्या गर्दीने फुललेली असतात. पण आता देशी खवय्यांबरोबरच विदेशी नागरिकांच्या भोजनाची जबाबदारी ‘कुटुंबसखी’ने आपल्या खांद्यावर घेतली आहे. अमेरिकन सेंटरमधील कॅन्टीन चालविण्याचे काम ‘कुटुंबसखी’ला मिळाले आहे. एकीकडे ‘फास्टफूड’ला वाढती मागणी असताना अमेरिकन सेंटरमध्ये प्रवेश करून ‘कुटुंबसखी’ने अस्सल मराठमोळे पदार्थ परदेशी नागरिकांना उपलब्ध करून दिले आहेत. साबुदाण्याची खिचडी, बटाटावडा, कांदेपोहे, उपमा, थालिपीठ, चटणी पॅटीस, पुरणपोळी, गुळपोळी, गाजराची पोळी, केळ्याची पोळी, नारळाची वडी यांसारख्या अस्सल मराठमोळ्या पदार्थासह दुपारच्या जेवणावर ताव मारताना परदेशी नागरिक अमेरिकन सेंटरच्या कॅन्टीनमध्ये दृष्टीस पडतात.
‘कुटुंबसखी’च्या संस्थापिका आणि अध्यक्षा वंदना नवलकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अमेरिकन सेंटरमध्ये ‘कुटुंबसखी’चे अनेक चाहते आहेत. त्यापैकी काहींनी अमेरिकन सेंटर प्रशासनाकडे कॅन्टीनचे कंत्राट ‘कुटुंबसखी’ला देण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर ‘कुटुंबसखी’ला हे कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘सखी’च्या स्थापनेची आणि एकूण कामाची कल्पना देताना ‘कुटुंबसखी’तर्फे केवळ महाराष्ट्रीय खाद्यपदार्थच बनविले जातील व कुठल्याही प्रकारचे ‘फास्टफूड’ मिळणार नाही, अशी सूचनावजा अटही घालण्यात आली. परंतु या अटीनंतरही हे कंत्राट ‘कुटुंबसखी’ला मिळाले. गेल्या आठवडय़ापासून ‘कुटुंबसखी’ अमेरिकन सेंटरच्या कॅन्टीनशी एक वर्षासाठी करारबद्ध झाली आहे. ‘कुटुंबसखी’ने घातलेली अट मान्य करण्यात आली असली तरी परदेशी नागरिक खाण्यापिण्याच्या आणि स्वच्छतेच्या बाबतीत खूप सतर्क असतात. हे लक्षात घेऊन खाद्यपदार्थासाठी कमीतकमी तेल वापरण्यात येत आहे. तसेच कॅन्टीनमध्ये कटाक्षाने स्वच्छता राखण्यात येते. हे कॅन्टीन ‘कुटुंबसखी’च्या पाच महिला सदस्य चालवितात.
‘कुटुंबसखी’चे काम आवडले तर पुढेही करार कायम ठेवला जाईल. एक संधी म्हणून या कराराकडे पाहण्यात येत असून ‘कुटुंबसखी’ने हे काम एक आव्हान म्हणून स्वीकारले आहे, असे नवलकर यांनी सांगितले. दरम्यान, अमेरिकन सेंटरमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंटरमध्ये सध्या ६० कर्मचारी आहेत. त्यातील बहुतांशी भारतीय आणि त्यातही बरेचसे मुंबईकर असल्याने ‘कुटुंबसखी’चे अस्सल मराठमोळे पदार्थ त्यांच्यासाठी मेजवानीच असते.
अमेरिकन सेंटरमधील अमेरिकन अधिकारी, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व बैठकाच्या निमित्ताने येथे येणाऱ्या विदेशी नागरिकांनीही ‘कुटुंबसखी’च्या खाद्यपदार्थाना पसंती दिली आहे. अनेकजण हे खाद्यपदार्थ घरीही नेताना आढळतात.