Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

दिल्लीत महाराष्ट्राच्या खासदारांचा ‘प्रेशर ग्रुप’ तयार व्हावा -भारतकुमार राऊत
खास प्रतिनिधी

 

उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, तामिळनाडूच्या खासदारांप्रमाणे मराठी माणूस, मराठी समाज आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या खासदारांनी लोकसभेत ऐक्याचे प्रदर्शन घडवावे, असे आवाहन आज शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांनी एका पत्राद्वारे केले. दिल्लीत महाराष्ट्राचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अनौपचारिक, अदृश्य पण प्रभावी असा ‘प्रेशर ग्रुप’ तयार करण्याची कल्पनाही राऊत यांनी मांडली आहे.
दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांचा एकमुखी आवाज उठत नाही. महाराष्ट्राच्या प्रतिनिधींमधील ऐक्याच्या अभावाचे विपरित परिणाम महाराष्ट्राला वर्षानुवर्षे भोगावे लागत असल्याचे आधी पत्रकार आणि आता संसद सदस्य म्हणून काम करताना आपल्याला प्रकर्षाने जाणवले, असे लोकसभेतील महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित खासदारांना लिहिलेल्या पत्रात राऊत यांनी म्हटले आहे. बंगाल, बिहार, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशचे खासदार परस्पर मतभेद विसरून राज्याच्या हिताच्या मुद्यांवर एकत्र येतात आणि आवाज उठवितात. त्याचवेळी महाराष्ट्राचे खासदार मात्र पक्षांच्या व प्रश्नंतांच्या फसव्या बंधनात गुंतून पडतात, असा आपला कटु अनुभव आहे. सौरव गांगुलीला भारतीय संघातून वगळले तेव्हा पश्चिम बंगालचे सर्व खासदार एकत्र आले.
समुद्रसेतूच्या मुद्यावरून तामिळनाडूचे तर मराठी समाजाला दूषणे देऊन महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी उत्तर प्रदेश व बिहारचे खासदारांनी एकजूट दाखविली. पण एन्रॉन असो वा महाराष्ट्रातील अनधिकृत घुसखोरी, महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींचे दिल्लीत दुहीचेच दर्शन घडत असल्याबद्दल राऊत यांनी खेद व्यक्त केला आहे. पक्ष आणि प्रश्नंत वेगवेगळे असले तरी आपण सारे महाराष्ट्राचे आहोत. महाभारतात पांडवांनी आपण सारे १०५ आहोत, असे म्हटले होते. तीच आपलीही भावना असायला हवी, असे राऊत यांनी म्हटले आहे. पंधराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात हाच निश्चय साऱ्यांनी केला तर पुढील पाच वर्षात त्याची अंमलबजावणी करता येईल. त्यासाठी आपण सारे मिळून एक अनौपचारिक, अदृश्य पण प्रभावी ‘प्रेशर ग्रुप’ तयार करू शकू अशी सूचना करून या कामात सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्यास आपल्याला अभिमानच वाटेल, असे राऊत यांनी म्हटले आहे.