Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

सामान्य रुग्णालयातून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांची पाठराखण करण्यासाठी नेत्यांची चढाओढ
प्रतिनिधी

 

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील भरती केलेल्या ६७ कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी ठाण्यातील सगळे राजकीय पक्ष कामाला लागले, परंतु लेखी आश्वासन आल्याशिवाय कामगारांना सेवेत घेणार नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. टोम्पे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांसह रुग्णालयात धाव घेऊन कामगारांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी प्रशासनाशी चर्चा केली.
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात ६७ जागांवर तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद चपळगावकर यांनी भरती केली. मात्र ही भरती बेकायदेशीर असल्याची ओरड झाल्यानंतर आरोग्य सहसंचालक नितीन पाटील यांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान कर्मचाऱ्यांना गेल्या आठ महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. तरीही आर्थिक देवाणघेवाणीतून नोकरी मिळालेली असल्याने सर्वजण बिनपगारी काम करीत होते. या चौकशीत भरती बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवून ती रद्द करण्यात आली. त्यामुळे ६७ जणांना काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले, त्यापैकी २५ जणांनी शनिवारी आदेश स्वीकारण्याचे टाळले.
हा प्रकार कळताच शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे हे पदाधिकाऱ्यांसह रुग्णालयात पोहचले. मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही देत सर्व कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा घेण्याची मागणी त्यांनी केली. त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजन राजे यांनीही मनसे पदाधिकाऱ्यांसह सामान्य रुग्णालयात धाव घेतली. डॉ. टोम्पे यांच्याशी चर्चा करून सर्व कर्मचाऱ््यांना कामावर घेण्याची मागणी त्यांनी केली. ही चर्चा होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही कार्यकर्त्यांसह पोहचले. कामगारांना कामावरून काढून टाकण्याचे आदेश रद्द करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा मनसे व शिवसेनेने केला आहे.
प्रत्यक्षात मात्र लेखी आदेश आल्याशिवाय कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात येणार नसल्याचे टोम्पे यांनी सांगितले.