Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

बसमार्ग पूर्ववत करण्याचा ‘बेस्ट’ला विसर?
प्रतिनिधी

 

लालबाग येथील संत ज्ञानेश्वर पुलाचे पाडकाम पूर्ण होऊन, त्याजागी बनविलेला नवा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. पर्जन्यजलवाहिनीच्या कामासाठी खोदलेला दत्ताराम लाड मार्गही महिन्याभरापूर्वीच पूर्ववत करण्यात आला. तरीही काळाचौकी येथून लालबागला जाणारी ‘बेस्ट’ बसेसची वाहतूक अद्यापही पर्यायी मार्गाने सुरू आहे. त्यामुळे हे बसमार्ग पूर्ववत करण्याचा ‘बेस्ट’ प्रशासनाला विसर पडला की, काय? असा सवाल स्थानिक रहिवाशांकडून विचारण्यात येत आहे.
काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावर गतवर्षी डिसेंबर महिन्यापासून नवी पर्जन्यजलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या सात बसेसपैकी ४३, ४४, ५०, ५२, ६७ आणि २०० या क्रमांकाच्या बसेस ग. दि. आंबेकर मार्ग, साईबाबा पथ, भारतमाता यामार्गे वळविण्यात आल्या होत्या. मे महिन्याच्या सुरुवातीस हा रस्ता डांबर टाकून पूर्ववत करण्यात आला. मात्र लालबाग पुलाच्या पाडकामुळे वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक एकेरी केल्याने, या बसेसची वाहतूक पर्यायी मार्गानेच सुरू ठेवण्यात आली. ती आजतागायत तशीच सुरू आहे.
संत ज्ञानेश्वर पुलाचे पाडकाम पूर्ण झाल्यानंतर लालबाग भागातील वाहतूक कोंडी कमी झाली. दत्ताराम लाड मार्गावरून अनेक दुतर्फा वाहतूक सुरू झाली.
गेल्या आठवडय़ापासून एमएमआरडीएने
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सर्व मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या केल्या. त्यालाही तीन दिवस उलटून गेले. तरी ‘बेस्ट’ प्रशासनाने सदर बसमार्ग पूर्ववत केलेले नाहीत, अशी कैफियत काही स्थानिकांनी ‘लोकसत्ता’कडे मांडली. दत्ताराम लाड मार्गाने डाऊन दिशेच्या बसेसची वाहतूक बंद असल्याने या मार्गावरील प्रवाशांखेरीज जयहिंद सिनेमा, बावन चाळ, चिंचपोकळी, लालबाग मार्केट, गणेश टॉकिज या भागातील नागरिकांना बस पकडण्यासाठी उन्हातान्हातून भारतमाता अथवा काळाचौकी गाठावे लागते.
दादरच्या दिशेने जाणाऱ्या बसेस डॉ. आंबेडकर मार्गावरुन पकडता येतात. परंतु वरळी, प्रभादेवी, वडाळा, अ‍ॅन्टॉप हिल या भागांकडे जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होतात. या भागांतून ‘बेस्ट’च्या बसने दादर, परळ, माटुंगा भागातील शाळा-कॉलेजात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बसमार्ग अद्यापही पूर्ववत न झाल्याने पालकवर्गामध्येही चिंतेचे वातावरण असून, ‘बेस्ट’ प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबद्दल स्थानिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
‘लालबाग परिसरातील पायाभूत सोयी-सुविधांची कामे मार्गी लागावी, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही निमुटपणे त्रास सहन केला. ‘बेस्ट’ प्रशासनाला मात्र त्याचे सोयरसुतक नाही. हे बसमार्ग पूर्ववत करण्याचा ‘बेस्ट’च्या अधिकाऱ्यांना विसर पडला असून, ते बहुधा आता प्रवाशांच्या सहनशक्तीचा अंत पाहत आहेत’, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.