Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

आईचा संस्कार, गुरूंचा धाक मोलाचा - सचिन खेडेकर
प्रतिनिधी

 

अभिनय क्षेत्रात काम करत असलो, तरी यामागे माझ्या आईने दिलेले पाठबळ मला महत्त्वाचे वाटते. तिने मला न खचविता जो संस्कार माझ्यावर केला, त्यामुळे मी चित्रपट क्षेत्रातील वाटचाल यशस्वीपणे करू शकलो, असे प्रतिपादन अभिनेते सचिन खेडेकर यांनी येथे केले.
‘आरोग्य संस्कार’ परिवाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमानिमित्त सुयोग मंगल कार्यालयात सचिन खेडेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर यांनी खेडेकर यांची मुलाखत घेतली. यावेळी डॉ. उल्हास कोल्हटकर, यश वेलणकर, कांचन साने उपस्थित होते.
जोगळेकर यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात खेडेकर यांनी सांगितले की, लहानपणीच वडिलांचे निधन झाले, त्यामुळे एअर इंडियात नोकरीला असलेल्या आईने आमचा सांभाळ केला. जग पाहिलेल्या आईने आमचा सांभाळ केल्याने तिचा तेवढाच प्रभाव आमच्यावर होता. त्यानंतर अभिनय क्षेत्रातील गुरू विनय आपटे यांनी मोलाचे मार्गदर्शन मला केले. मराठी मालिकांमधील आताची मराठी भाषा पाहिली तर एक आनंदीआनंद असतो, पण आपटे यांनी मला सुरांसकट भाषा बोलण्याचे ज्ञान दिले. हे ज्ञान अशोक रानडेही देऊ शकतात.
पार्ले टिळक शाळेत शिक्षण झाल्यामुळे माझ्या जुन्या शिक्षिका आजही भेटल्या, तरी एक आदरयुक्त भीती मला वाटत असते. मी अभिनेता म्हणून त्यांच्यासमोर उभा राहिलो तरी त्यांच्याकडून माझ्या अभिनयाविषयी काय प्रतिक्रिया मिळते, याविषयी मला धाकधुक वाटत असते. मला रसिकांनी कितीही उचलून धरले, तरी शाळेच्या बाईंकडून माझ्या अभिनय, चित्रपटाविषयी मिळणारी प्रतिक्रिया मला खूप मोलाची वाटते. हा प्रभाव मला खूप काही शिकवून जात असतो. माझे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे, त्यामुळे मुलांनीही मराठीतून शिक्षण, मराठी वाचन करावे, असे मला सतत वाटत असते. पण माझे हे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत, कारण मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. त्यांनी मराठी वाचन करावे म्हणून मी प्रयत्न करतो, पण तेथेही माझा टिकाव लागत नाही, याचे वाईट वाटते असे त्यांनी सांगितले. कलाकार म्हणून वावरताना सतत मेकअप, धावपळ यामुळे शरीराकडे दुर्लक्ष होतेय असे वाटू लागते. या सगळ्या धबडग्यात आरोग्य संस्कार ही संकल्पना खूप मोलाची वाटते. आरोग्याची काळजी घेण्यासाठी एखादे चेकअप करून घेतले आणि त्यामधून काही उपटले तर काय करायचे, ही भीती मनाला सतत अस्वस्थ करत असते. तसेच आरोग्यविषयक पॉलिसी काढल्या जातात, त्याचे खूप वाईट अनुभव मिळाले, त्यामुळे याविषयी मी फार समाधानी नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात खेडेकर म्हणाले. मला स्वत:ला अपडेट करण्यासाठी मी सतत वाचत असतो, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पाहत असतो. मराठी नवनवीन पुस्तके वाचण्याचा मला छंद आहे. मला संधी मिळाली तर ‘टोकदार सावलीचे वर्तमान’ या विषयावर चित्रपट काढण्याचा विचार आहे. यावेळी डॉ. कोल्हटकर यांचे जीवन जगण्यातील कलागुण, जीवनाचे महत्त्व सांगणारे ‘जीवन एक रसिली मैफल’ या विषयावर व्याख्यान झाले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश खरे यांनी प्रयत्न केले.