Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

विदर्भातील गुणवंत झाले कामयाब
समाज कार्याची संधी -अतुल भडांगे
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

 

राज्यलोकसेवा आयोगातर्फे २००६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी १७ उमेदवारांपैकी विदर्भातून या पदासाठी अतुल भडांगे हा एकमेव उमेदवार पात्र ठरला आहे. अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापूर येथील रहिवाशी असलेल्या अतुलने तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली. सध्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत असून दुसऱ्या प्रयत्नात अतुलने मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र, मुलाखतीमध्ये निवड न झाल्याने पुन्हा युपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरू केली आहे. अमरावतीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामधून स्थापत्य अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अतुलने इतिहास आणि तत्त्वज्ञान विषय घेऊन तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी पात्र ठरला आहे. बीई असूनही या क्षेत्राकडे वळल्याबद्दल विचारले असता, प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी करण्याची संधी याद्वारे मिळत असल्याने सुरुवातीपासूनच या क्षेत्राबद्दल विशेष आकर्षण असल्याचे अतुलने सांगितले. एमपीएससी आणि युपीएससी परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच झाल्याने विद्यार्थ्यांना सोईच झाल्याचेही तो म्हणाला.
स्थैर्य व समाजसेवा -सुरज गोहाड
अमरावती जिल्ह्य़ातील मोर्शी तालुक्यातील बेनोडा शहीद तालुक्यातील सुरज गोहाड याने पहिल्याच प्रयत्नात राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी (प्रथम श्रेणी) पदासाठी पात्र ठरला आहे.
शिवाजी विद्यापीठातून बी.ई मेकॅनिकलपर्यंतचे शिक्षण सुरजने पूर्ण केले आहे. सध्या सुरज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत आहे. एकीकडे स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये जावून परीक्षेसाठी मार्गदर्शन घेण्याची प्रथा असताना कुठल्याही अशा केंद्राचा आधार न घेता स्वत:च अभ्यास करून सुरजने परीक्षा उत्तीर्ण केली. बीई असूनही या क्षेत्राकडे वळल्याबद्दल विचारले असता, खाजगी क्षेत्रापेक्षा या क्षेत्रात असलेली स्थिरता आणि प्रशासकीय माध्यमातून समाजासाठी काहीतरी करण्याची संधी याद्वारे मिळत असल्याने सुरुवातीपासूनच या क्षेत्राबद्दल विशेष आकर्षण असल्याचे सूरजने सांगितले. त्यामुळे या परीक्षेसाठी भूगोल आणि लोकप्रशासन हे विषय घेतले आहे. त्यातच एमपीएससी आणि युपीएससी परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच असल्याने दोन्ही परीक्षांची तयारी करण्यासाठी याचा चांगलाच उपयोग होत असल्याचे सूरजने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. .
स्पर्धा परीक्षा अधिक शिस्तबद्ध व्हावी -नितीन व्यवहारे
मूळ अकोल्याच्या नितीन व्यवहारेने एमपीएससीत राज्यातून संवर्गनिहाय अव्वल स्थान पटकावले. बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित ही पहिलीच परीक्षा होती. या अभ्यासक्रमाबाबत नितीनने समाधान व्यक्त केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या र्सवकष ज्ञानाला वाव देणारा हा अभ्यासक्रम असल्याचे सांगतानाच एमपीएससी स्पर्धा परीक्षा अधिक शिस्तबद्ध व्हावी, असे परखड मतही त्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारामध्ये काहीशी प्रगती जाणवली असली, तरी त्यांनी अधिक शिस्तबद्ध होण्याची गरज आहे. विशेषत: परीक्षांचे वेळापत्रक पाळण्याबाबत दक्ष राहण्याची गरज आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे वेळापत्रक एक ते दीड वर्षांमध्ये पूर्ण होते. ‘एमपीएससी’चा घोळ चार-पाच वर्षे सुरू राहतो. तो किमान दोन वर्षांवर आणण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे मुख्य परीक्षा, मुलाखतींनंतर निकाल जाहीर करण्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम तत्परतेने पाळावा. तसे केल्यास उमेदवारांमधील संभ्रम, साशंकतेचे वातावरण दूर होईल. परीक्षेची विश्वासार्हता वाढवण्यासाठीही ते उपयुक्त ठरेल, असेही नितीन म्हणाला.
चांगल्या योजना राबवण्याचे ध्येय -डॉ.नीलेश बारब्दे,
व्यवसायाने डॉक्टर असलेला पण, प्रशासकीय सेवेत जाऊन नागरिकांसाठी चांगल्या योजना राबवण्याचे ध्येय असल्याने या क्षेत्राकडे वळल्याचे नगरपरिषद मुख्याधिकारी द्वितीय श्रेणीतील पदासाठी पात्र ठरलेल्या डॉ. नीलेश बारब्दे याने लोकसत्ताशी बोलताना सांगितले.
मुळचा अमरावतीचा असलेल्या निलेशच्या घराला वैद्यकीय क्षेत्राचा वारसा लाभला आहे. त्यामुळे समाजासाठी काही तरी करण्याच्या ध्यासाने या क्षेत्राकडे आकर्षित केले. व दुसऱ्याच प्रयत्नात नीलेशने ही परीक्षा उत्तीर्ण करून मुख्याधिकारी पदासाठी पात्र ठरला आहे. जैवशास्त्र आणि मानसशास्त्र विषय घेऊन नीलेशने परीक्षा उत्तीर्ण केली. मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी कुठल्याही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सहाय्य घेतले नाही. मात्र, मुलाखत तंत्रासाठी अमोल पाटील यांच्या युनिक अकादमीची मोठय़ा प्रमाणात मदत झाल्याचे नीलेशने सांगितले. सध्या डॉ. नीलेश युपीएससीच्या परीक्षेची तयारी करीत असून भारतीय सनदी सेवेत जाण्याचे उद्दिष्ट आहे.
अथक परिश्रमाचे फळ -पिंकी चिरडे
प्रशासकीय सेवेचे आकर्षण शालेय जीवनापासूनच होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या गाडय़ा, झेंडा फडकवण्याचा मिळणारा सन्मान हे सारे बघून निर्णय पक्का झाला आणि त्यादृष्टीने वाटचाल सुरू झाली. गेल्या दोन वर्षांच्या अथक परिश्रमाचे फळ मिळाले पण, आज हे यश साजरे करायला वडील हयात नाहीत.
राज्य लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या पिंकी चिरडे हिच्या वडिलांचे, निकालाच्या अवघ्या १५ दिवसांपूर्वीच हृदयविकाराने निधन झाले. यशाचा आनंद साजरा करायला ते नाहीत पण, त्यांनी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले, या शब्दात पिंकीने तिच्या भावना व्यक्त केल्या.
पिंकीच्या वडीलांचा भिवापूर येथे पानांचा व्यवसाय तर आई गृहिणी. दोन मोठय़ा बहिणींची लग्न झालेली आणि भाऊ खासगी नोकरीत. कुटुंबात कुणीही प्रशासकीय सेवेच्या वाटय़ाला गेलेले नसताना, पिंकीला तिच्या कुटुंबाकडून पूरेपूर सहकार्य मिळाले. दहावीची परीक्षा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण करणाऱ्या पिंकीने बारावीच्या परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. ही श्रेणी तिने कला शाखेत पदविका मिळवेपर्यंत कायम ठेवली. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा पहिला प्रयत्न फसला मात्र, दुसऱ्या प्रयत्नात हे अपयश धुवून काढले.
मुळची भिवापूर शहरातील पिंकीने दोन वर्षांपूर्वी नागपूरची वाट पकडली ती तीच्या शिक्षकांच्या आग्रहामुळे. नागपूरात पाऊल ठेवल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी खऱ्या अर्थाने सुरू झाली. शहर नवीन आणि ओळखीचे कुणी नाही अशा परिस्थितीत सुरुवातीला परिक्षेशी संबंधीत पुस्तके मिळवताना अडचणी आल्या.
हा प्रश्न सोडविण्यासाठी वाचनालयाचा आधार घेतला. ‘घर ते वाचनालय’ या प्रवासात सुमारे बारा तासांचे अभ्यासाचे गणित बसवले. कला शाखेत इतिहास आणि समाजशास्त्र हे विषय असल्याने कला शाखेतून असण्याचा बराच फायदा झाल्याचे पिंकीने सांगितले. स्वत:च नोट्स काढून त्याला स्वयंअध्ययनाची जोड दिली, त्यामुळेच हे यश आज पदरात पाडून घेता आले, असे पिंकीने सांगितले. नाथे करिअर अकादमी आणि तिथल्या शिक्षकांचासुद्धा यशात महत्त्वाचा वाटा असल्याचे पिंकीने मान्य केले.
प्रशासकीय सेवेचेच ध्येय होते -प्रशाली जाधव
एमपीएससी परीक्षेत राज्यात दुसरी आलेली प्रशाली जाधव ही नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनमध्ये तंत्रसहायक म्हणून काम करीत आहे. ती सातारा जिल्ह्य़ातील कोडोली गावची रहिवासी असून तिचे आई-वडील शेतकरी आहेत. तिने अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून हॉर्टिकल्चर अभ्यासक्रमाची पदवी मिळवली आहे. ती तीन वर्षे अकोल्यात शिकली.
प्रशासकीय सेवेत जाण्याचा तिने आधीपासूनच निर्धार केला होता. बारावीला भरपूर अभ्यास केला, पण ऐन परीक्षेच्या वेळेला टेन्शन आल्याने गुण कमी मिळाले. परिणामी, तिला घरापासून दूर अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये हॉर्टिकल्टचर अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागला. नेटाने अभ्यास करीत ती राज्यात पहिली आली आहे आणि २००७ साली पुण्याला एमएसस्सी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्या दरम्यान तिने एमपीएससीचा अभ्यास सुरूच ठेवला होता.