Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

ग्राहकांचे शोषण रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी -राजाभाऊ पोफळी
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

 

आपल्या देशातील दोषपूर्ण अर्थव्यवस्थेमुळे ग्राहकांचे शोषण होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थशास्त्रज्ञांचा समावेश असलेली स्वतंत्र यंत्रणा हवी, असे मत अ.भा. ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ पोफळी यांनी व्यक्त केले.नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना पोफळी म्हणाले की, राजकीय घडामोडींबाबत जागृत असलेला समाजातील सामान्य माणूस देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल जागृत नाही. शिवाय, अर्थव्यवस्थेतील दोषांमुळे ग्राहकांचे शोषण होत आहे. त्यामुळे अर्थविषयक घडामोडींवर प्रतिक्रिया देणारी स्वतंत्र यंत्रणा असावी. त्यात अर्थशास्त्रज्ञांसह व्यापारी, उद्योजक, शेतकरी या अर्थव्यवस्थेतील सर्वच घटकांचा समावेश असावा. सकल राष्ट्रीय उत्पन्न काढण्याची पद्धत चुकीची असून त्यात दुरुस्ती होणे गरजेचे आहे. औद्योगिक उत्पादनाच्या तुलनेत कृषी उत्पन्नाचा विचार होत नाही. उद्योजक व नोकरदार यांचे उत्पन्न विचारात घेतले जाते परंतु, शेतकऱ्यांचा मात्र विचार होत नाही. देशातील ६० टक्के ग्राहक खेडय़ात राहणारा असून त्याला या प्रक्रियेत प्रतिनिधित्व दिले जावे, अशी अपेक्षा पोफळी यांनी व्यक्त केली.
वस्तूंच्या किमती उत्पादन खर्चावर आधारित असाव्यात, यासाठी ग्राहक पंचायत प्रयत्न करत आहे. वस्तूचा उत्पादन खर्च आणि त्याची प्रत्यक्ष किंमत यात बरीच तफावत असते. त्यामुळे कमाल किरकोळ किमतीऐवजी (एमआरपी) उत्पादन खर्चावर आधारित किंमत छापली जावी, यासाठीचे विधेयक मागील सरकारच्या कार्यकाळात मांडले होते. ते अद्याप संमत व्हायचे आहे. कमी दर्जाच्या मोबाईल सेट्समुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. विषारी रंग असलेल्या स्वस्त व कमी दर्जाच्या खेळण्यांमुळे मुलांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. याबाबतही जागरुकता निर्माण होणे आवश्यक आहे. सामाजिक संघटनांनी घरोघरची चांगली खेळणी गोळा करून झोपडपट्टीत वाटावी, असे आवाहन राजाभाऊंनी केले.
ग्राहक पंचायत ही संघटना पत्रकारांचेच अपत्य असल्याचे सांगून, ग्राहक संरक्षण अधिनियम आणण्याचे श्रेय या संघटनेलाच आहे, असा दावा पोफळी यांनी केला. महाविद्यालये आकारत असलेल्या जादा शुल्काचा विषय संघटनेने पूर्वीच हाती घेतला आहे. या सर्व समाजोपयोगी कार्यांमध्ये पत्रकारांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. पत्रकार संघाचे सचिव संजय लोखंडे यांनी प्रास्ताविक, तर उपाध्यक्ष सुनील कुहीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.