Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

बाल मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

 

आईसकँडी कारखान्यातील एका बाल मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास बोरियापुरामध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या बालमजुराच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांनीही आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शहरात अनेक उद्योगांमध्ये बाल मजुरांचे शोषण होत असताना कामगार खाते तसेच इतरही संबंधित शासकीय खात्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेने दाखवून दिले आहे.
मोहम्मद शहबाज शेख छोटू हे मरण पावलेल्या बाल मुजराचे नाव आहे. बोरियापुरा वीज केंद्रासमोल मोहम्मद अयुब अब्दुल शकूर याचा घरीच आईस कॅन्डी तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात मोहम्मद शहबाज शेख छोटू हा पंधरा वर्षांचा मुलगा यंत्रावर काम करीत होता. सोमवारी सायंकाळी अचानक त्याला विजेचा धक्का बसल्याने तो दूर फेकला गेला. मोहम्मद शहबाजला लगेचच मेयो रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केल़े या घटनेने तेथे काम करणारे इतर मजूर हादरून गेले. मोहम्मद शहबाज त्या कारखान्यात गेल्या दोन महिन्यांपासून काम करीत होता़ या घटनेची माहिती मेयो पोलीस चौकीतून समजताच तहसील पोलीस मेयो रुग्णालयात पोहोचले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो उत्तरीय तपासणीसाठी शव विच्छेदन गृहात पाठवला. या प्रकरणी तहसील पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
बाल मजूर कामाला ठेवल्याप्रकरणी कारखान्याच्या मालकाला अटक व्हायला हवी होती. तहसील पोलिसांनी केवळ मोहम्मद शहबाजच्या मृत्यूनंतर आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याची शंका या परिसरातील नागरिकांनी बोलून दाखवली. मुळात या कारखान्याला परवानगी होती काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
घरगुती उद्योग असला तरी, मोहम्मद अयुब अब्दुल शकूर याने किमान गुमास्ता परवाना तरी काढला होता काय, आईस कँडीचा कारखाना असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र घेतले होते काय, यंत्र असल्याने विजेचे मीटर कुठले होते, आदी प्रश्न उपस्थित होतात. या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी आता पोलिसांचीच असून संबंधित खात्याच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची वेळ आली तरी, पोलिसांनी कचरता कामा नये, अशी संतप्त भावना या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
सोळा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींकडून काम करवून त्यांचे शोषणकेले जाते. त्यास आळा घालण्यासाठी शासनाने कायदा केला असून बाल मजुरांकडून कामे करवून घेणाऱ्याची कारागृहात रवानगी केली जाते. केवळ मोमीनपुराच नव्हे तर, शहरातील अनेक भागात छोटे उद्योग, हॉटेल्समध्ये अनेक बाल मजूर काम करताना दिसून येतात. कामगार खात्याचे याकडे दुर्लक्ष असल्याने कारखानदारांचे फावते. कारखाना निरीक्षक, कामगार निरीक्षक याकडे डोळेझाक करीत असल्याचे या घटनेने दाखवून दिले आहे.
बोरियापुरातील आईसकँडी कारखान्यात घडलेल्या घटनेची अधिक माहिती जाणून घेतल्यानंतर तसेच शव विच्छेदन अहवाल आल्यानंतर सखोल चौकशी केली जाईल. केवळ याच कारखान्यात नाही तर या परिसरात बाल मजुरांकडून काम करवून घेतले जात आहे का, याचाही तपास केला जाईल. पण मुळात केवळ पोलिसांचीच ही जबाबदारी नसून इतरही संबंधित खात्यांच्या मदतीने संयुक्त मोहीम हाती घेण्याची गरज आहे. त्या दिशेने निश्चित प्रयत्न केले जातील, असे कोतवाली विभागाचे सहायक पोलीस आयुक्त जीवराज दाभाडे यांनी यासंदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.