Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

करसवलतीचा लाभ खाजगी जिनिंगलाच
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

 

राज्यातील रसातळाला गेलेल्या जिनिंग प्रेसिंग उद्योगाला आधारी देण्यासाठी राज्य शासनाने यंत्रसामुग्रीवरील करात दिलेल्या सवलतीचा लाभ खाजगी जिनिंग प्रेसिंगलाच अधिक होणार आहे. राज्यात सरासरी २२५ जिनिग प्रेसिंग खाजगी आहेत तर, शासनाच्या फक्त सहा जिनिंग आहेत, हे येथे उल्लेखनीय.विदर्भ आणि मराठवाडय़ात मोठय़ा प्रमाणात कापसाचे उत्पादन होते, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुरू झालेले जिनिंग प्रेसिंग उद्योग स्वाभाविकपणे याच भागात अधिक आहेत. यात सहकारी तत्वावर चालणाऱ्या जिनिंग प्रेसिंगचा समावेश अधिक आहे. वीज दरात झालेली वाढ आणि इतरही कारणामुळे गेल्या दोन दशकापासून हा उद्योग डबघाईस आला होता. त्यामुळे राज्यशासनाने खाजगी जिनिंग प्रेसिंगला परवानगी दिली. सध्या खाजगी, सहकारी आणि शासनाचे मिळून २०० ते २२५ जिनिंग प्रेसिंग आहेत. त्यापैकी काही बंद पडले आहेत तर, काही जिनिंगमधील यंत्रसामुग्री जुनाट झाल्याने ते पूर्ण क्षमतेने काम करीत नसल्याने मालकांना त्या चालवणे आर्थिकदृष्टय़ा परवडण्या सारखे नव्हते. कापसाचा हंगाम हा वर्षभर चालणारा नसल्याने आणि कापसाच्या गाठींना उठाव नसल्याने त्याचाही या उद्योगावर परिणाम झाला. विदर्भात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कापसाचे उत्पादन या पाश्र्वभूमीवर या उद्योगाला चालना देण्याची गरज होती.
त्यासाठी राज्य शानाने जिनिंग प्रेसिंगमध्ये अत्याधुनिक यंत्र सामुग्री लावण्यासाठी यंत्रावरील करात आठ टक्के सुट दिली आहे. पूर्वी १२.५ टक्के कर आकारण्यात येत होता नव्या अर्थसंकल्पात तो चार टक्के करण्यात आला आहे. या उद्योगाला चालना देण्याची भूमिका करसवलत देण्यामागे सरकारची असली तरी राज्यात फक्त सहाच सरकारी जिनिंग आहे. त्यात एक यवतमाळ जिल्ह्य़ात आहे, सहकारी आणि खाजगी जिनिंगची संख्या अधिक आहे, त्यामुळे या करसवलतीचा फायदा खाजगी जिनिंगलाच मिळण्याची शक्यता आहे.
मागील हंगामात कापसाला चांगली किंमत मिळाल्याने मोठय़ा प्रमाणात खरेदी झाली, नाफेडकडे सध्या कापसाच्या गाठी कुठे ठेवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यापूर्वी जिनिंगची संख्या कमी असल्याने गाठी तयार करण्याची प्रक्रिया लांबली होती. त्यामुळे मधल्या काळात कापसाची खरेदीही नाफेडने थांबवली होती.