Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

बॅबेसियाच्या संसर्गाने विदर्भातील नीलगायींचे अस्तित्व धोक्यात
विक्रम हरकरे
नागपूर, ९ जून

 

विदर्भातील जंगलात असलेल्या नीलगायींमध्ये गोचिडांपासून होणाऱ्या संसर्गजन्य बॅबेसिया रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे. विदर्भातील जंगलांमध्ये नीलगायींची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने बॅबेसियाला वेळीच आळा घालण्यासाठी वन विभाग, पशुवैद्यक विद्यापीठे तसेच, अनुभवी आणि होतकरू संशोधकांनी एकत्र येऊन उपाय शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा, बॅबेसियाचा संसर्ग असाच पसरत राहिल्यास नीलगायींचे अस्तित्व भविष्यात धोक्यात येऊ शकते, अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे.
बॅबेसियाचा संसर्ग म्हशी, मेंढी, बक ऱ्या, कुत्रे, मांजरी या पाळीव प्राण्यांमध्ये तसेच, हिंस्र सस्तन प्राण्यांना होत असल्याचे यापूर्वीच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे परंतु, विदर्भातील जंगलांमध्ये असलेल्या नीलगायींमध्ये पहिल्यांदाच बॅबेसियाचा संसर्ग दिसून आला. पाळीव प्राण्यांमधील बॅबेसियावर पुरेसे संशोधन उपलब्ध आहे. मात्र, जंगली प्राण्यांमध्ये याचा प्रादुर्भाव होत असतानाही यासंदर्भातील ठोस संशोधन आतापर्यंत झालेले नव्हते. नीलगायींवरील नवे संशोधन डॉ. बहार बावीस्कर, कैलास इंगळे, प्रिया गावंडे, सचिन राऊत, प्रा. कीर्ती सिरोथिया आणि प्रा. अरुण भांडारकर या पशुवैद्यकांनी केले असून हा शोधप्रबंध ‘थ्रिटन्ड टॅक्झा’ या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. डॉ. बहार बावीस्कर हा तरुण संशोधक विदर्भाच्या जंगलातील प्राण्यांचा अनेक वर्षे अभ्यास करत असून बॅबेसियावरील पुढील संशोधनासाठी अमेरिकेला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ातील जंगलात ६-७ वर्षांची एक नीलगाय काही महिन्यांपूर्वी मृत्युमुखी पडली. ही नीलगाय शवचिकित्सेसाठी नागपूरच्या पशुवैद्यक महाविद्यालयात आणल्यानंतर तिच्या शरीरातील रक्ताचे नमुने तपासत असताना लाल रक्तपेशींमध्ये बॅबेसियाचे सूक्ष्म परजीवी आढळले. हे परजीवी गोचिडांच्या विविध प्रजातींपासून हिंस्र आणि तृणभक्षींच्या रक्तात प्रवेश करतात. ‘ग्लोबल वार्मिग’मुळे गोचिडांचे जीवनचक्र अचानक बदलले असून अनुकूल हवामानामुळे त्यांची प्रजननक्षमता वाढली आहे. ‘बॅबेसिया’चा फैलाव होण्यामागे गोचिडांची वाढती संख्या हे प्रमुख कारण आहे, असेही डॉ. बावीस्कर यांनी सांगितले.
बॅबेसियाचा संसर्ग झालेल्या प्राण्याच्या शरीरातील लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी होते. परिणामी शुद्ध रक्ताचे
प्रमाण घटते. जनावराची प्रतिकारशक्ती कमी होते, त्याला लकवा होण्याची शक्यता असते. शेवटी तो कोमात जातो आणि मृत्युमुखी पडतो. जगभरातील जंगलांमधील कोल्हे, झेब्रा, रेनडिअर, ठिपकेवाले हरीण, गेंडा, जंगली मांजरी तसेच अगदी अलीकडे विदर्भातील जंगलांमध्ये वास्तव्यास असलेल्या बिबटय़ांच्या शरीरातही बॅबेसियाचे परजीवी आढळले आहेत. मात्र, आता याचा संसर्ग नीलगायींनाही झाल्याने पर्यावरणतज्ज्ञांच्या चिंतेत भर पडली आहे.
ओरिसातील भुवनेश्वरच्या नंदनकानन बॉयोलॉजिकल पार्कमध्ये बॅबेसियाने ग्रासलेल्या एडक्याला डिमिनाझीन अ‍ॅसिटय़ूरेटचे दोन डोज पाजून सुदृढ स्थितीत आणण्यात तेथील डॉक्टरांना यश आले. ही एक केस वगळता बॅबेसियावर रामबाण लस अद्याप सापडलेली नाही. नागझिराच्या जंगलातील रानगवे मध्यंतरी अचानक मृत्युमुखी पडू लागले होते. पाळीव जनावरांची कुरणे या भागापासून जवळच असल्याने पाळीव जनावरांना होणाऱ्या तोंडखुरी-पायखुरीचा प्रादुर्भाव रानगव्यांमध्ये झाला होता. यासाठी पाळीव जनावरांचे लसीकरण करण्याची मोहीम वन विभागाने हाती घेतली होती. यानंतर अशा संसर्गजन्य रोगांना आळा घालणाऱ्या उपायांची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. जगभरातील वन्यजीव संवर्धन व्यवस्थापनाच्या बदलत्या वाटचालीत वन्यप्राण्यांमधील रोगांवरील संशोधनाचा अंतर्भाव करण्यात आला असताना भारतात याविषयी अद्यापही फारसे संशोधन करण्यात येत नाही. परिणामी, भारतातील वन्यजीव संवर्धनाच्या मार्गातील हा सर्वात मोठा अडसर ठरत आहे. यासाठी वन विभाग आणि पशुतज्ज्ञांनी समन्वयाने उपाययोजना आखण्याची गरज आहे.
पाळीव प्राण्यांची चराऊ कुरणे संरक्षित वन्यक्षेत्राच्या बरीच दूर ठेवण्याची गरज आहे कारण, पाळीव जनावरांमधील संसर्गजन्य रोग वन्यप्राण्यांमध्ये पसरू लागले आहेत आणि ही स्थिती आरोग्यदायी पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे, असे महाराजबागेचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर आणि वन्यजीवतज्ज्ञ कुंदन हाते यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.