Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

कामापेक्षा वाद जास्त !
चंद्रशेखर बोबडे

 

नागपूर हे देशाच्या मध्यभागी असल्याने ते हृदयस्थान मानले जाते, त्याच प्रमाणे नागपूरचा मध्यभाग म्हणजेच मध्य नागपूर हेही शहराचे खऱ्या अर्थाने हृदयस्थान. सरासरी २ लाख २० हजार मतदार असलेल्या या मतदारसंघाचा परिसीमनानंतर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुख्यालयासह महाल भागातील अनेक हिंदू वस्त्या जोडल्याने त्याचा चेहरा आता मुस्लिम बहुल राहिला नाही.
आमदार अनिस अहमद १९९७ पासून सलग तीन वेळा या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या राजकारणापासून तर राज्याच्या मंत्रीपदापर्यंत अशी त्यांची कारकीर्द आहे. सलग दहा वर्षांपासून ते मंत्रीही आहेत. मात्र काही कामांचा अपवाद वगळता आमदार अनिस अहमद या मतदारसंघाचा चेहरा बदलू शकले नाहीत. अतिशय दाटीवाटीच्या वस्त्या असलेल्या मतदारसंघात अनेक ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. शहरी मतदारसंघ असल्याने महापालिकेच्या माध्यमातून आणि आमदार फंडातून कामे झालेली आहेत. रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहेत. पाण्याची समस्या या भागात कायम आहे. स्वच्छतेबाबत तर न बोललेलेच बरे.
आमदार अनिस अहमद यांच्या मंत्रीपदाचा विशेष लाभ मतदारसंघाला झाला नाही. आमदार अनिस अहमद यांनी मतदारसंघात काही कामे केली आहेत. नागपूरच्या मुस्लिम बांधवांना थेट हजला जाता यावे यासाठी त्यांनी विमानसेवा सुरू केली. हज यात्रेकरूंसाठी अनिस अहमद यांनी नागपुरात हजहाऊस बांधण्यासाठीही प्रयत्न केले. मध्य नागपुरात असलेले शहरातील दुसरे मोठे रुग्णालय मेयोच्या आधुनिकीकरणासाठी आमदार अनिस अहमद यांनी नेटाचे प्रयत्न केले.
वादग्रस्त ‘मेटास’ या कंपनीकडे रुग्णालयाचे कंत्राटही देण्यात आले होते. मात्र नंतर गाडी रुळावरून घसरली ती अद्याप जागेवरच यायची आहे. मध्य नागपुरातील महापालिकेच्या सर्व शाळांचे संगणीकरण केल्यांचा आमदार अनिस अहमद यांचा दावा आहे. या शिवाय मदरसे, समाजभवन, पिण्याच्या पाण्यासाठी नवीन जलवाहिन्या, उद्यानाच्या सौंदर्यीकरणाची कामे अहमद यांच्या विकास कामांच्या यादीत समाविष्ट आहेत. दूध व्यवसाय व मत्सोद्योग खाते त्यांच्याकडे असताना नागपूर येथे पशुवैद्यकीय विद्यापीठ सुरू झाले हे येथे उल्लेखनीय.
लोकसेवा केंद्राच्या माध्यमातून बेरोजगारांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केल्याचाही दावा आमदार अनिस अहमद करतात. असे असले तरी विकास कामांची चर्चा होण्याऐवजी इतर वादग्रस्त उद्योगामुळेच अनीस अहमद चर्चेत राहतात. अधिकाऱ्यांच्या बंगल्याचा ताबा घेणे, पत्नीच्या नावाने असलेल्या संस्थेसाठी शासकीय जागा घेण्याचा प्रयत्न करणे आदींचा त्यात समावेश करता येईल. विदर्भातून विधानसभेत गेलेले एकमेव प्रतिनिधी असल्याने त्यांना हमखास मंत्रीपदही मिळत आले, त्याचा फायदा मतदारसंघाला होऊ शकला नाही, असे त्यांचे राजकीय विरोधक सांगतात. मतदारसंघातील चित्रही विरोधकांच्या म्हणण्याला दुजोरा देणारेच आहे. मध्य नागपुरातील मुस्लिम बहुल वस्त्यांची आजची स्थिती पाहीली तर अजूनही इंग्रजाचा काळ आठवावा अशीच आहे, उघडय़ावर मांस विक्री, गुन्हेगारी आणि अतिक्रणाने संपूर्ण रस्त्यांचा ताबा घेतला आहे. लहान मतदारसंघ असतानाही त्याचा नियोजनबद्ध विकास करता आला नाही, डोबीनगर झोपडपट्टीचा प्रश्न अद्याप कायम आहे. हज हाऊसचे श्रेय अनिस अहमद घेत असले तरी विरोधक त्यांचा दावा मान्य करीत नाही, एम्प्रेस मिलच्या जागेवर हज होणार होते, मात्र एकूण जागेच्या फक्त एक हेक्टरवर ते आता होणार असून त्यासाठी अनिस अहमदच जबाबदार असल्याचा आरोप विरोधक करतात. मुस्लिमांचा मुळ उद्योग पॉवरलूम आहे, अनेक पॉवरलूम सध्या बंद आहेत. त्याकडे अनिस अहमद यांनी कधीच लक्ष घातले नाही. त्यांच्या पक्षनिष्ठेविषयीही नेहमीच प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी पहिल्या टप्प्यात प्रचारात सहभाग घेतला नव्हता. त्यामुळेही काँग्रेसचेच कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत. आयआरडीपी रस्त्याच्या कामाला सर्वप्रथम मध्य नागपुरातून सुरुवात झाली होती, मात्र गोळीबार चौकाच्यापुढे रस्त्याचे काम पुढे सरकू शकले नाही, आतापर्यंत मुस्लिम मतांच्या जोरावर निवडणूकजिंकत आलेल्या अनिस अहमद यांना मतदारसंघातील फेररचना डोकेदुखी वाढवणारी आहे. त्यामुळे ते मतदारसंघ बदलवण्याची शक्यता आहे. मतदारसंघात केलेल्या कामाबाबत त्यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी व्यस्त असल्याचे कारण देऊन याविषयावर बोलणे टाळले.

मार्गी लागलेली कामे
*हजसाठी विमानसेवा सुरू
* मदरसे, समाजभवन बांधले
* पिण्याच्या पाण्यासाठी नवीन जलवाहिन्या
* उद्यानाच्या सौंदर्यीकरणाची कामे
अपूर्ण राहिलेली कामे
* रस्त्याची कामे अपूर्ण
* हज हाऊस
* मेयोचे आधुनिकीकरण
* रेल्वे उड्डाण पुल (लक्ष्मण झुला)
मतदारसंघातील प्रमुख प्रश्न
* रस्ते, पाणी, आरोग्य व प्राथमिक शिक्षणाच्या सुविधां
* अरुंद रस्ते आणि अतिक्रमण
* खुल्या जागेवर मांस विक्री
* हलबांचे प्रश्न
* बंद पडलेले पॉवरलूम
पुन्हा निवडून आल्यास
याबाबत बोलण्यास अनिस अहमद यांनी नकार दिला.