Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

गोसीखुर्द धरणाचे काम पूर्ण, ऑगस्टमध्ये पाणी अडवणार
* एकूण ८५ गावांचे पुनर्वसन * यंदा १७५० कोटी मिळण्याची अपेक्षा
नितीन तोटेवार
नागपूर, ९ जून

 

पूर्व विदर्भातील खास करून नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या बहुप्रतिक्षित गोसीखुर्द प्रकल्पाच्या धरणाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या ऑगस्टमध्ये या प्रकल्पात पाणी साठवण्यात येणार असून त्यापासून सुमारे २५ हजार हेक्टर शेतीला लाभ होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी प्रवीण दराडे आणि विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
येत्या पाच वर्षांत २०१४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊन सुमारे अडीच लाख हेक्टर शेती ओलीताखाली येईल. याशिवाय जवाहरनगर दारुगोळा कारखाना, मौदा येथील नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशनचा वीज प्रकल्प आणि गोसीखुर्द जलविद्युत प्रकल्पासाठी पाणी उपलब्ध होईल. या भागात सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रासारखी भरभराट येऊ शकते, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षांत या प्रकल्पाची खरी प्रगती झाली आहे. त्यापूर्वी निधीच्या कमतरेमुळे कामे रेंगाळली, अशी कबुली देऊन, प्रकल्पग्रस्तांना नव्याने मोबदला देण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.
केंद्र सरकारने राष्ट्रीय प्रकल्प म्हणून या प्रकल्पाला मान्यता दिल्यानंतर गेल्या मार्चमध्ये ४५० कोटी रुपये दिले. यावर्षी १ हजार ७५० कोटी रुपयांची मागणी केली आहे. २०१०-११ मध्ये ९२० कोटी रुपये, २०११-१२ मध्ये ६६७ कोटी रुपये, ४६४ कोटी रुपये आणि २०१३-१४ मध्ये २२७ कोटी रुपये असे एकूण ४ हजार ८१ कोटी रुपये केंद्राकडून मिळण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत ३ हजार २९१ कोटी रुपये खर्च झाले असून प्रकल्पाची सध्याची किंमत ७ हजार ७७८ कोटी रुपये आहे, असे संजय खोलापूरकर यांनी सांगितले.
वैनगंगा नदीवरील ९९१ कोटी रुपयांच्या या धरणाची लांबी ११.३५ किलोमीटर आहे. उजवा कालवा १०७ किलोमीटर आणि डावा कालवा २३ किलोमीटर लांबीचा आहे. दोन्ही कालव्यांचे काम प्रगतीपथावर आहे. धरणाची एकूण साठा क्षमता १ हजार १४६ दशलक्ष घनमीटर, तर विसर्ग क्षमता ६७ हजार ३०० दशलक्ष घनमीटर आहे. ऑगस्टमध्ये १० सहस्त्र दशलक्ष घनफूट पाणी साठवण्यात येणार आहे. धरणाला एकूण ३३ दारे असून राज्यात सर्वात मोठी दारे असल्याचा दावा खोलापूरकर यांनी केला.
या प्रकल्पात एकूण ८५ गावे पूर्णपणे बुडणार असून १०४ गावातील जमीन पाण्याखाली येणार आहे. ८५ गावांच्या पुनर्वसनासाठी ६३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच, पाच आणखी नवीन ठिकाणे शोधण्यात येणार आहेत. तीन टप्प्यात पुनर्वसन करण्यात येणार आहे. सर्व प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात आला आहे, असा दावाही खोलापूरकर यांनी केला.
राजीव टेकडीच्या पायथ्याशी जलविद्युत प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून येत्या तीन वर्षांत पूर्ण होईल. याशिवाय, धरणाजवळच अन्य एका टेकडीचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. आंभोरा, मोखाबर्डी, पागोरा आणि टेकेपार या चार उपसा सिंचन योजना आहेत, असेही खोलापूरकर यांनी सांगितले. यावेळी कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, एच.बी. मेंढे, सी.आर. उत्तरवार आणि उमरेडचे उपविभागीय अधिकारी संजय धिवरे आदी उपस्थित होते.