Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

शेतकऱ्यांना योग्य मोबदला व पुनर्वसनस्थळी सर्व सोयी देण्याची मागणी
गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांनी मांडली पत्रकारांपुढे कैफियत
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

 

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची पत्रकारांना माहिती देण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर प्रकल्पग्रस्तांनी आज त्यांची कैफियत मांडली. दारिद्रय़ रेषेखालील रेशन कार्ड, प्रकल्पबाधित असल्याचे प्रमाणपत्र, रोजगाराची सोय, पेयजल, वीज आदी अनेक समस्यांकडे गावकऱ्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. जिल्हा प्रशासन व विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या वतीने गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकारांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक छगन वाकडे देखील या दौऱ्यात उपस्थित होते, हे विशेष. भिवापूर (खास) येथे घाटऊमरी आणि गाडेघाट या दोन गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. महामंडळाच्या वतीने या ठिकाणी १३ नागरी सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत पण, गावकऱ्यांचे त्यामुळे समाधान न झाल्याने आणखी पाच सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी प्रवीण दराडे आणि महामंडळाचे अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर हे समाज भवनात पत्रकारांना माहिती देत असतानाच गावकऱ्यांनी तेथे गर्दी केली. मात्र, पोलिसांच्या उपस्थितीमुळे गावकरी शांत होते. गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे नेते विलास भोंगाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पस्थळी निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, पुनर्वसनस्थळी सर्व सोयी उपलब्ध करून द्याव्या, या मागण्यांवर आम्ही ठाम असून कोणत्याही स्थितीत धरणात पाणी अडवू दिले जाणार नाही, असा इशारा भोंगाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
दोन ते पाच एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांची शेती गेल्याने ते आता भूमीहिन झाले आहेत. मात्र, रोजगाराची कोणतीच संधी उपलब्ध नसल्याने जगायचे कसे, असा सवाल गावकऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. गावात रस्ते नाहीत, पाण्याची भीषण स्थिती आहे, आरोग्याची सोय नाही व रोजगाराचे साधन नाही, असे गाडेघाटच्या सरपंच संगीता नारवेलवार यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र मिळत नाही, असे उज्ज्वला शेंडे व सुनील मेश्राम यांनी सांगितले. शेती गेली, पोटापाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा या चिंतेने दिवस काढत आहोत, असे नारायण डहाके, सकुबाई कुसराम यांनी सांगितले. पथ दिवे आहेत पण, ते बंद असतात, याकडे ग्रामपंचायत सदस्य धम्मपाल वानखेडे यांनी लक्ष वेधले.

*दारिद्रय़रेषेखालील रेशन कार्ड तात्काळ देण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी गावकऱ्यांच्या व्यथा जाणून घेताच तहसीलदारांना दिले. तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेद्वारे काम उपलब्ध करून द्यावे तसेच, राज्य आणि केंद्राच्या संजय गांधी निराधार योजना, भूमिहिनांसाठीच्या योजनांसह इतर सर्व योजना गावकऱ्यांपर्यंत तात्काळ पोहोचवण्याची सूचनाही त्यांनी केली. ग्रामीण रोजगार योजनेत काम उपलब्ध असून गावकऱ्यांनी मागणी केल्यास तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाकडे विचारणा केल्यावर निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
भिवापूर खास येथे ३१३ भूखंड असून त्यापैकी २८५ भूखंडांचे वाटप झालेले आहे. घाटऊमरीत १३८ आणि गाडेघाटमधील १३० कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. घाटऊमरीतील बहुतांश कुटुंबे स्थलांतरित झाली असून गाडेघाटमधील रहिवाशांनीही तयारी दर्शवलेली आहे. त्यांचेही लगेच पुनर्वसन करण्यात येईल. गावकऱ्यांना पाच सोयी महामंडळ नव्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर यांनी सांगितले.