Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

खते व बियाणांच्या टंचाईमुळे शेतकरी अस्वस्थ
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

 

कर्जमाफीच्या फसव्या घोषणेमुळे नाराज झालेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना आता बियाणे व खताच्या तुटवडय़ामुळे पेरणीसाठी आवश्यक वस्तू उपलब्ध होत नसल्याने भटकंती करण्याची वेळ आली आहे. बियाणे व खते असली तरी ती दर्जेदार व परिचित उत्पादक कंपनीची नसल्याने शेतकरी उपलब्ध माल खरेदी करण्यास धजत नाही. मात्र, टंचाईच्या संधीचा (गैर) फायदा घेऊन धूर्त व्यापारी दर्जाहीन माल खपविण्यासाठी सक्रिय झाल्याचेही दिसून येते.
विदर्भात मान्सूनला अजून प्रारंभ झाला नसला तरी पेरणीसाठी लागणारे खत आणि बियाण्यांचा विदर्भातील काही भागात मोठय़ा प्रमाणात तुटवडा दिसून येत आहे. काही जिल्ह्य़ात अनेक दुकानदार बनावट खत व बियाण्यांची विक्री करीत असल्याचे दिसून आले आहे. भंडारा, गोंदिया, यवतमाळ, बुलढाणा, अकोला या ठिकाणी बियाण्यांचा आणि खतांचा तुटवडा असल्यामुळे अनेकजण नागपुरात विक्रीसाठी येत आहेत पण, नागपुरात तीच परिस्थती आहे. कॉटेनमार्केट परिसरातील दुकानात खत व बियाण्यांच्या विक्रीसाठी ग्रामीण भागातून शेतकरी येत आहेत पण, त्यांना खत मिळत नाही. दुकानदार खताची टंचाई असल्याचे सांगतात. भंडारा जिल्ह्य़ातील एक शेतकऱ्याने सांगितले, मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे शेतीमध्ये पेरणीला सुरुवात करण्यात आली आहे पण, खाताची टंचाई असल्यामुळे पाहिजे तेवढे खत मिळत नाही. बी-बियाण्यांचा तुटवडा अनेक दुकानात दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात दूध, भाज्या व धान्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी कुटुंबातील समस्या अधिक वाढली आहे. विशेष म्हणजे, पेरणीची सिद्धता करून कामास लागलेला शेतकरी गावातील सहकारी संस्थेकडून कर्ज वितरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे पहावयास मिळाले. मात्र, कर्जमाफीची घोषणा व त्यानंतर त्या योजनेच्या अंमलबजावणीचा घोळ शासकीय पातळीवर अजूनही चालू असल्याने कर्ज वितरणाच्या प्रक्रियेत बाधा आली. यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचे दिसून येते.
आगामी विधानसभा निवडणुका बघता राजकीय वर्तुळात ग्रामीण परिसरातील सत्तारूढ पक्षाचे नेतेमंडळी कर्जमाफीच्या घोषणेनंतर श्रेय प्राप्तीबरोबरच शेतकरी व मजूरवर्गाशी जवळीक साधण्याच्या दृष्टीने सक्रिय झाले होते. नेतेमंडळींच्या सूचनेवरून निवडणुकीवर लक्ष ठेवून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्नही या मंडळींनी सुरू केला मात्र, कर्जमाफीची घोषणा फसवी ठरल्याचे स्पष्ट झाल्यावरून अनेक मंडळी तोंड चुकवून फिरण्याचा पवित्रा घेत असल्याचे दिसून येत आहे.