Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

तपासात पक्षपात करणाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

 

शेतीची बेकायदेशीररित्या विक्री करण्यात आल्याच्या प्रकरणात नरखेड पोलीस पक्षपात करत असल्याने संबंधित पोलिसांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी धनराज खोजरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
इंजिनियर असलेले धनराज खोजरे यांनी सांगितले की नरखेड तालुक्यातील इंदोरा गावातील हुकुमचंद सूर्यवंशी यांचे शेत खरेदी करण्यासाठी मी करार केला होता. याबाबत वाद निर्माण झाल्यामुळे मी सूर्यवंशी यांच्याविरुद्ध दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. मात्र त्यावर काही निर्णय होण्यापूर्वीच सूर्यवंशी यांनी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये बेकायदेशीररित्या या शेताची विजय मेंडोलिया यांना विक्री केली. या संदर्भात मी गेल्या मार्च महिन्यात नोंदवलेल्या तक्रारीची नरखेड पोलिसांनी काहीच दखल घेतली नाही. मात्र मेंडोलिया यांच्या एका खोटय़ा तक्रारीवरून तपास न करताच पोलिसांनी मला व माझ्या भाच्याला अटक करून कोठडीत टाकले. याप्रकरणी पोलिसांनी पैसेही वसूल केले, असा आरोप खोजरे यांनी केला.
या शेताचा ताबा माझ्याकडेच असला तरी तो बळजबरीने मेंडोलिया यांना देण्यासाठी नरखेड पोलीस माझी सामाजिक प्रतिष्ठा डागाळण्याचे काम करत आहेत. माझ्या ताब्यातील शेत जबरीने ताब्यात घेतले जाऊ शकते किंवा मला शारीरिक त्रासही दिला जाऊ शकते. यासंदर्भात पोलीस महानिरीक्षक, नागपूरचे पोलीस अधीक्षक व काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवूनही काही उपयोग झालेला नाही. या प्रकरणात पक्षपात करणारे नरखेडचे ठाणेदार गजानंद कंकाळे व हेड कॉन्स्टेबल प्रताप राऊत यांना निलंबित करावे, अशी मागणी खोजरे व मुन्ना तिवारी यांनी केली.