Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

सहकार चळवळीच्या सक्षमतेसाठी सर्वाचेच सहकार्य हवे -जगताप
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

 

भविष्यातील स्पर्धा लक्षात घेऊन सहकाराची बांधणी केली असल्यामुळे आजच्या खाजगीकरणाच्या काळातही सहकार चळवळ टिकून आहे. या चळवळीला सक्षम करण्यासाठी नेते, अधिकारी व कार्यकर्त्यांनीही सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष अशोक जगताप यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघातर्फे नागपूर विभागातील जिल्हा सहकारी मंडळाचे जिल्हा सहकार विकास अधिकारी, सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अशोक जगताप बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सहकारी संघाचे मानद सचिव प्रकाश भिसीकर उपस्थित होते.
राज्याच्या सहकारी चळवळीचे नेतृत्व राज्य सहकारी संघाने केले आहे. सहकारी साखर कारखानदारीच्या उभारणीमध्ये राज्य सहकारी संघाने महत्तवाची भूमिका बजावली आहे. नवीन संस्था निर्माण करणे आणि भौगोलिक परिस्थीतीनुसार सहकाराची बांधणी केली असल्यामुळे आजच्या खाजगीकरणाच्या काळातही सहकार चळवळ टिकून आहे. ती सक्षमपणे चालवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, असेही जगताप म्हणाले.
यावेळी प्रकाश भिसीकर म्हणाले, सहकार चळवळ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम राज्य सहकारी संघाने करावे. यावेळी जगदीश किल्लोळ यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.एन.राऊत यांनी केले. यावेळी पी.के. कापडणीस, के.व्ही कुंभार, बी.बी.गुंजाळ, एल.एन. गुरव, बी.ए. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बी.ए. मुळीक यांनी केले.