Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

आनंदवनात अपंगांकरिता व्यावयायिक प्रशिक्षण
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

 

महारोगी सेवा समितीद्वारा संचालित आनंदवनातील संधिनिकेतन अपंगांच्या कार्यशाळेत अपंग मुलामुलींकरता विनामुल्य व्यावसायिक प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे.
अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे आणि महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांनी मान्यता दिलेल्या निवासी कार्यशाळेत १८ ते ३५ वयोगटातील अस्थिव्यंग, अंध व कर्णबधीर मुलामुलींना प्रवेश देण्यात येईल. सदर कार्यशाळेत बेसिक फॅशन डिझायनिंग, तारतंत्री, कर्णबधिरांसाठी लायसनशियट इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड रेडिओ सव्‍‌र्हिसिंग, हस्तकला तसेच, हातमाग-विणकाम आदी विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय एमएससीआयटी व एमएस ऑफिसचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रत्येक ट्रेडचा कालावधी एक वर्षांचा राहील. प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांना, प्रशिक्षण कालावधीत भोजन, निवास, गणवेश, वैद्यकीय सुविधा विनामुल्य पुरवण्यात येईल. मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. गरजू अपंग व्यक्तींनी स्वत:चे नाव, संपूर्ण पत्ता, वय, शिक्षण आणि अपंगत्वाचे सविस्तर वर्णनासह अधीक्षक, संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा, आनंदवन, ता. वरोरा, जिल्हा चंद्रपूर ४४२९१४ या पत्त्यावर अर्ज करावा, असे आवाहन संस्थेचे सहाय्यक सचिव कौस्तुभ आमटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कर्मशाळेचे अधीक्षक सदाशिव ताजने, ९०११०९४६०९ यांच्याशी संपर्क साधावा.