Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

नव्याने कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पाच हजाराचेच कर्ज
विदर्भ जनआंदोलन समितीचा आंदोलनाचा इशारा
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

 

जिल्हा सहकारी बँकांनी नव्याने कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाधिक पाच हजार रुपयांपर्यंत पीक कर्ज देण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांना परत आत्महत्येकडे वळणारा असून याविरोधात सहकारी बँकांच्या संचालकांच्या घरासमोर १२ जूनपासून आंदोलन करण्याचा इशारा विदर्भ जनआंदोलन समितीने दिला आहे.
राज्याने ६ हजार २०८ कोटी रुपयांची विस्तारित कर्जमाफी केल्यानंतर नव्याने कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला. जिल्हा सहकारी बँका सोसायटीमार्फत ७० टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज देते. कर्जमाफीनंतर नव्याने पात्र झालेल्या १ लाख ८० हजार शेतकऱ्यांमधून ७० टक्के शेतकरी सहकारी बँकांकडून कर्जासाठी पात्र आहेत. त्यांना नियमानुसार हेक्टरी २० हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणे आवश्यक आहे. मात्र, त्याच बँका आता पाच हजार रुपये कर्ज देणार आहे. यासाठी जिल्हा उपनिबंधक कारयाई का करत नाही, असा सवाल समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.
नव्यावे कर्ज घेणाऱ्या पात्र शेतक ऱ्यांना कापसासाठी हेक्टरी २० हजार रुपये आणि सोयाबीनसाठी हेक्टरी १६ हजार रुपये कर्ज देण्याचा निर्णय न घेतल्यास सहकारी बँकांच्या संचालकांच्या निवासस्थानासमोर येत्या १२ जूनपासून डफडे वाजवून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तिवारी यांनी दिला आहे.