Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांचाही सहभाग घ्या -मिगलानी
पर्यावरण सप्ताहातील स्पर्धाचे पुरस्कार वितरण
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

 

पर्यावरणाबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी याप्रकारच्या उपक्रमात जास्तीतजास्त शाळकरी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात यावे, असे आवाहन कार्मिक विभागाचे संचालक ओ.पी. मिगलानी यांनी यावेळी केले.
वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित पर्यावरण सप्ताहातील स्पर्धाचे पुरस्कार वितरण नुकतेच करण्यात आले. यावेळी ते बोलत होत.
पर्यावरण दिनानिमित्त वेकोलिच्या १० प्रशासकीय क्षेत्रात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. वेकोलिचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डी.सी. गर्ग यांनी ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. पुरस्कार वितरणाला कार्मिक विभागाचे संचालक ओ.पी. मिगलानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विविध विभागांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या सप्ताहाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मिगलानी यांनी कौतुक केले. वेकोलिने २००९-१० हे वर्ष पर्यावरणीय व्यवस्थापन वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून मिगलानी म्हणाले, पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत मोठय़ा प्रमाणात कार्य करण्यात आले असले तरी, अजूनही अनेक प्रकारचे कार्य होणे बाकी आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी वेकोलिने अनेक धोरणे राबवली असून याद्वारे देशासाठी सुरक्षित पद्धतीने कोळसा काढण्याचे कार्यही सुरळीतपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
खनन करणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्या कार्यावर सतत टीका करण्यात येते. मात्र, त्यांनी पर्यावरणासंबंधी उपलब्धींवर कधीही चर्चा होत नाही. मात्र, असे असले तरी पर्यावरणाच्या संरक्षण ही वेकोलिची सर्वोच्च प्राथमिकता आहे, ज्यामुळे पर्यावरणाचे संतुलन कायम राहील, असा विश्वास कंपनीला आहे. यावेळी मोठय़ा संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.