Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

सक्करदरा तलाव सौंदर्यीकरणाचा पर्यटन विकास महामंडळाकडे प्रस्ताव
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

 

पुरातन इतिहासाचा वारसा लाभलेल्या सक्करदरा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी नागपूर सुधार प्रन्यासने १ कोटी ५५ लाख रुपयांचा प्रस्ताव
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास तलावाच्या सौंदर्यीकरणात अधिक भर पडणार आहे.
सुधार प्रन्यासने तयार केलेल्या प्रस्तावानुसार १ कोटी ५५ लाख रुपये खर्च करून तलावात रंगीत फवारे लावण्यात येतील. परिसरात विद्युत व्यवस्था केली जाईल. तसेच गणपती विसर्जनादरम्यान तलावात टाकण्यात येणाऱ्या निर्माल्यामुळे होणारे दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. सोबतच मूर्ती विसर्जनाकरिता स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.
निसग्रप्रेमी नरेश सेनासाहेब सुभा दुसरे रघुजी राजे यांनी १७८४ मध्ये सक्करदरा तलावाची निर्मिती केली होती. परंतु, हळूहळू या तलावाची स्थिती वाईट होत गेली. प्रन्यासने सहा-सात वर्षांंपूर्वी परिसरातील नागरिक व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने तलावाचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण करणारा मोठा प्रकल्प हाती घेतला. तलावाच्या परिसराचे एकूण क्षेत्रफळ २० एकर आहे. त्यापैकी १० एकर तलावाचे क्षेत्र असून उर्वरित क्षेत्रात प्रकल्पामध्ये असेलल्या उद्यानाकरिता चार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यापैकी राज्य शासनाने आतापर्यंत २ कोटी ३० लाख रुपये प्रन्यासला उपलब्ध करून दिले. उर्वरित खर्च प्रन्यासने केला. प्रकल्पाच्या प्रथम व दुसऱ्या टप्प्यामध्ये उद्यानाचे काम, तलावातील गाळ काढणे, इत्यादी कामांचा समावेश होता. त्यासाठी २ कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात तलावाच्या उत्तरेकडील भागात घाट, ६३ लहान दुकाने व सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून १ कोटी २८ लाख रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत.