Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

उत्पन्न वाढीवर भर देण्याचा वॉर्ड सभापतींचा संकल्प
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

 

मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकांप्रमाणे नागपुरात उत्पन्न वाढविणारी कामे केली जातील. तेथील पाणी कर वसुलीची वार्षिक पद्धत अतिशय चांगली आहे. त्याबाबत प्रशासनाशी चर्चा करून त्या महापालिकांच्या धोरणानुसार नागपुरात पाणी कर वसूल करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा सूर अध्यक्षांनी व्यक्त केला.
महापालिकेतील नवनिर्वाचित वॉर्ड समिती अध्यक्षांनी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकांचा अभ्यास दौरा अलीकडेच केला. या दौऱ्यात त्यांनी तेथील कामांची पाहणी केली. या दौऱ्यात प्रकाश तोतवानी, मंजूषा बंगाले, डॉ. कल्पना पांडे, अविनाश ठाकरे, रूपेश मेश्राम, बंडू राऊत, प्रवीण सांदेकर, प्रवीण झिलपे, प्रल्हाद दुर्गे आणि हरीश ग्वालबंशी या दहा वॉर्ड समिती अध्यक्षांचा समावेश होता. वॉर्ड समितीमुळे या तीनही महापालिकेचे काम सुरुळीत झाले असून आर्थिकदृष्टय़ा त्या मजबूत झाल्याचा दावा, अविनाश ठाकरे, हरीश ग्वालबंशी, मंजूषा बंगाले या वॉर्ड सभापतींनी केला आहे. पुणे महापालिकेत १९९७ पासून वॉर्ड समिती अध्यक्ष पद्धत लागू आहे. नगापुरात वॉर्ड समिती अध्यक्षांना पाच लाखांपर्यंत कामे करण्याचा अधिकार आहे. परंतु, मुंबईमध्ये तेथील वॉर्ड अध्यक्षांना दहा लाख रुपयांपर्यंत कामे करण्याचा अधिकार आहे. पुण्यात त्याहून अधिक अर्थात १० ते २५ लाख रुपयांपर्यंत अधिकार आहे. त्यामुळे वॉर्डातील विकासकामे तातडीने होतात. पुणे आणि मुंबई महापालिकेत मालमत्ता कर, अतिक्रमण, आरोग्य या सर्व विभागांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. रस्ते, पावसाळी नाल्या, मलवाहिन्या यांचे वेगळे विभाग करण्यात आले आहेत.
त्यामुळे प्रत्येक कामावर लक्ष देणे व ते पूर्ण करणे सहज शक्य होते. याशिवाय पाणी आणि मालमत्ता कर पद्धत अतिशय चांगली आहे. फ्लॅट योजनेत असलेल्या प्रत्येक फ्लॅटधारकाकडून एकाचवेळी वर्षांला पाण्याचे १ हजार ५०० रुपये आणि मालमत्ता कराचे मूल्यांकनानुसार कर घेतला जातो. आपल्या इथे मात्र तीन महिन्यातून एकदा पाण्याचे बिल वसूल केले जाते. नागपुरात अशी पद्धत लागू करण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. अंतिम निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे, असे नवनियुक्त सभापती म्हणाले.