Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

शॉर्ट टर्म कोर्सेस ठरले फायदेशीर
नागपूर, ९ जून/ प्रतिनिधी

 

कला शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी हमखास रोजगार पुरवणाऱ्या शॉर्ट टर्म कोर्सेसकडे आकर्षित होऊ लागले असून त्यांना चांगल्या रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्याने असे शॉर्ट टर्म कोर्सेस विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयांसाठीही फायदेशीर ठरू लागले आहेत.
६० ते ८० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षीच काही हजारांच्या घरात जाते. सर्वच विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअरच होतील, असेही नाही. कला शाखेत शिक्षण घेतानाच दोन महिन्यांपासून ते एक वर्षांपर्यंतचे शॉर्ट टर्म कोर्सेस विद्यार्थ्यांना हक्काचा रोजगार मिळवून द्यायला फायदेशीर ठरू लागले आहेत. त्याकडे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनी लक्ष पुरवण्याची गरज आहे. मुलींच्या बाबतीत तर पालकांनी अशा शॉर्ट टर्म कोर्सेसचा आवर्जून विचार करायला हवा. आजही नागपूरच्या आजूबाजूच्या खेडय़ातून शहरात शिकायला येणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे. मुलींना चांगले स्थळ मिळावे, याच इच्छेपोटी मुलीला शिक्षण देणारे अनेक पालक असल्याने त्यांच्यासाठी करिअर फार दूरची गोष्ट असते. यासंदर्भात महिला महाविद्यालयात काही दिवसांपूर्वी एक सव्‍‌र्हे घेण्यात आला होता. त्यात ९८ टक्के पालक मुलींना केवळ चांगले स्थळ मिळावे म्हणून शिकवतात, अशी कबुली दिली. त्यातच विद्यार्थ्यांने शिक्षण घेताना कमावणे ही संकल्पना आपल्याकडे अद्याप रुजली नसल्याने अनेक चांगले शॉर्ट टर्म कोर्सेस दुर्लक्षित असल्याची खंत स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
कलाशाखेत शिकताना शॉर्ट टर्म कोर्सेस ताबडतोब रोजगार उपलब्ध करण्यासाठी वरदान ठरू शकतात. सध्या कलाशाखेचे प्रवेश सुरू आहेत. शॉर्ट टर्म कोर्सेस चालवणाऱ्या अनेक महाविद्यालयांनी प्रवेश देणेही सुरू केले आहे. शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये बिझिनेस कम्युनिकेशन, सेल्फ हेल्प ग्रुप, लाईव्हहूड स्कील, हर्ब अ‍ॅण्ड हर्बल, मेडिसिन मार्केटिंग, व्हर्मिकंपोजिंग, न्युट्रिशन, टॅली अकाउंटिंग, इन्शूरन्स वुईथ नेटवर्किंग, बँकिंग फायनान्स, ट्रान्सलेशन, रायटिंग फॉर मिडिया वगैरेंसारखे अभ्यासक्रम येतात. पदवी अभ्यासक्रम करता करताच हेही अभ्यासक्रम त्याच महाविद्यालयात करता येतात, हे विशेष.
तीन महिन्यांपासून ते एका वर्ष कालावधीचे हे अभ्यासक्रम आहेत. त्यासाठी १,००० ते १५०० पर्यंत शुल्क आकारले जाते. अभ्यासक्रम केल्यानंतर ३,००० ते ५,००० रुपयापर्यंत सहज रोजगार उपलब्ध होऊ शकतो, अशी आजची स्थिती असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांच्याकडील टॅली अकाउंटिंग करणाऱ्या ३७ पैकी १५ विद्यार्थी चार्टर्ड अकाऊंन्टकडे पाच हजार रुपयांची कमाई करीत आहेत. तसेच, रायटिंग फॉर मिडिया, ट्रान्सलेशन, मेडिसिन मार्केटिंग या शॉर्ट अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थिनींपैकी प्रत्येक अभ्यासक्रमातील एक किंवा दोन विद्यार्थिनी ३,५०० पर्यंत उत्पन्न मिळवत आहेत, हे विशेष