Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

निसर्गाच्या वैभवाला धोका -मारुती चितमपल्ली
पक्षिमेळा पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

 

निसर्गाने पशु, पक्षी, पाणी जंगल आदी दिले आहेत. परंतु निसर्गाने दिलेले हे वैभव भविष्यात आपण टिकवून ठेवूकिंवा नाही, हा धोका संभवतो. तथापि, हिरूरकरांसारखे वन्यजीव अभ्यासक जेव्हा पर्यावरण आणि पक्षावर जीव ओतून लिहितात तेव्हा, मनात कुठेतरी आशेचा किरण निर्माण होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांनी केले.
माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे अमरावती येथील लघुलेखक प्र.सु. हिरूरकर यांनी लिहिलेल्या पक्षिमेळा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहोळाप्रसंगी ते बोलत होते. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चित्तमपल्ली यांच्या निवासस्थानी हा छोटेखानी सोहोळा पार पडला. माहिती व जनसंपर्क नागपूर-अमरावती विभागाचे संचालक भि.म. कौसल, निवृत्त माहिती संचालक शरद चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी मोहन राठोड, नितीन खंडारकर आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी हिरूरकर यांनी पक्षी आणि वनाशी जुळलेल्या नात्याबद्दल माहिती सांगताना यापूर्वी अरण्यओढ, भुलनवेल या पुस्तकाची निर्मिती आपल्या हातून झाली. निसर्ग संशोधक डॉ. विजय इंगोले, ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या प्रोस्ताहनामुळे आणि माहिती विभागातील संचालक भि.म. कौसल व शरद चौधरी यांच्या सहकार्यामुळे मी लेखन करू शकलो. अगदी लहान असताना आई पक्षावर गाणी म्हणायची. तेच संस्कार मला पक्षी जीवनाचा अभ्यास आणि निरीक्षण करण्याच्या कामाला आले, असे ते म्हणाले.
हिरूरकरांनी नोकरी सांभाळत निसर्गावर प्रेम केले, नव्हे आपल्या निरीक्षणातून कसदार लिखाण केले, असे गौरवोद्गार काढून मारुती चितमपल्ली यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पूर्वी एकटय़ा भंडारा जिल्ह्य़ात दीड हजार तलाव होते. नवेगावबांध सारख्या तलावाच्या ठिकाणी आता देवधान कुठेही आढळताना दिसत नाही, त्याची जागा आता बेशरम या वनस्पतीने घेतली असल्याची खंत व्यक्त करून ते म्हणाले, ही वनस्पती पाणी दूषित करते. काही वर्षांपूर्वी सारस मोठय़ा प्रमाणात दिसायचे. ते आता दिसत नाहीत. मत्स्य पालनाच्या नावाखाली कार्प जातीच्या माशाचे बीज सोडले आहे. हे मासे विपूल प्रमाणात वाढणारी गाद व चिला या वनस्पती खातात. त्यामुळे या वनस्पती नष्ट होत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखणे ही सर्वाची जबाबदारी आहे.
शासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात विचित्र परिस्थितीला आपल्याला सामोरे जावे लागेल, असेही मारुती चितमपल्ली यावेळी म्हणाले.
यावेळी संचालक भि.म. कौसल व शरद चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी हिरूरकर यांनी मारुती चितमपल्ली यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.