Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

वृक्षदिंडीत रोपटय़ांचे वाटप
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे शहरात काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीत नागरिकांना रोपटय़ांचे वाटप करण्यात आले. दिंडीचे उद्घाटन महापौर माया इवनाते यांच्या हस्ते झाले.
या दिंडीत पर्यावरण संरक्षण व प्रदूषण नियंत्रणाचा संदेश देणारे फलक व देखावे, पर्यावरणविषयक गाणी व भजनांचा समावेश होता. या दिंडीत प्रदूषण मंडळासह शहरातील विविध उद्योग व पर्यावरण संरक्षणाचे कार्य करणाऱ्या संस्थांच्या सुमारे चाळीस वाहनांतून पंचेवीस हजारांवर रोपटय़ांचे नि:शुल्क वाटप करण्यात आले. ‘चला पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करू- पृथ्वीला प्राणपणाने जपू या’ यासारख्या घोषणा देत निघालेले कार्यकर्ते उद्योग भवन येथून एलआयसी चौक, कमाल टॉकीज चौक, गोळीबार चौक, अग्रसेन चौक, मेडिकल चौक, तुकडोजी चौक, छत्रपती चौक, लक्ष्मीनगर चौक, लॉ कॉलेज चौक या मार्गाने जागृतीचा संदेश देत होते. दिंडीच्या स्वागतासाठी विविध संस्थांनी जागोजागी कमानी व फलके उभारली होती. मेडिकल चौक व मानेवाडा मार्गावर ज्येष्ठ नागरिकांना रोपटय़ाचे वाटप करण्यात आले. लक्ष्मीनगर चौकात नगरसेविका छाया गाडे यांनी मंडळाचे प्रादेशिक अधिकारी वि.मो. मोटघरे व उप- प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सायंटिफिक सोसायटीचे पदाधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मराठा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वृक्ष वाटप मोहिमेत सहभाग घेतला. सायंकाळी पर्यावरण संकल्पनेवर आधारलेले देखावे खुल्या ट्रकवर मांडून फुटाळा तलाव, लक्ष्मीभुवन चौक, बजाजनगर चौक, लोकमत चौक, लोखंडी पूल, शुक्रवारी तलाव, मेडिकल चौक, राजीव गांधी चौक या मार्गाने फिरवण्यात आले. या कार्यक्रमांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. मंडळाचे एस.एस. गाढवे, उप-प्रादेशिक अधिकारी अ.नि. काटोले, हेमा देशपांडे, सुजीत सेनगुप्ता, संजय कोतवालीवाले, अमोल देशमुख यांनी दिंडीसाठी सहकार्य केले.