Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

अ.भा. ग्राहक पंचायतच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजाभाऊ पोफळी यांची फेरनिवड
नागपूर, ९ जून/ प्रतिनिधी

 

अ.भा. ग्राहक पंचायतच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजाभाऊ पोफळी यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
संघटनेची सर्वसाधारण राष्ट्रीय सभा नुकतीच औरंगाबाद येथे झाली. त्यात देशभरातील विविध प्रांतांचे दीडशेवर प्रतिनिधी उपस्थित होते. दोन दिवसांच्या या सभेत पहिल्या दिवशी येत्या तीन वर्षांसाठी निवडणूक होऊन मावळते राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ पोफळी यांची पुन्हा अविरोध निवड झाली. मध्य भारताचे प्रतिनिधी दिनेश भागवत यांनी पोफळी यांचे नाव सुचवले, तर मध्य महाराष्ट्राचे शरद घळसासी यांनी त्याला अनुमोदन दिले. यावेळी पोफळी यांनी पुन्हा समोर येऊन तरुणातील कुणी समोर यावे, असे आवाहन केले. तेव्हा जयपूरचे दुर्गाप्रसाद सैनी यांनी राजाभाऊंच्या नावाला पुन्हा अनुमोदन दिले. इतर कुणाच्याही नावाचा प्रस्ताव न आल्यामुळे निवडणूक अधिकारी सुधाकर जकाते यांनी राजाभाऊंची अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
या बैठकीत येत्या वर्षांत ग्राहक जागरणाच्या काही मुद्यांवर भर देण्याचे ठरले. चिनी खेळणी आणि वस्तू खरेदी करण्यापूर्वी ग्राहकाने त्या वस्तूची गुणवत्ता तपासून घेणे गरजेचे आहे. स्वस्त असली तरी अपायकारक असलेल्या उत्पादनांपासून सुरक्षित राहण्यासाठी शाळा- कॉलेजेसच्या माध्यमातून जनजागरण मोहीम हाती घेण्याचे ठरवण्यात आले.
जलक्षेत्राच्या खाजगीकरणाला संघटनेने विरोध दर्शवला आहे. पाण्याच्या संदर्भात योग्य ते धोरण तयार व्हावे अशी संघटनेची मागणी आहे. बाटल्यांमधून विकल्या जाणाऱ्या पाण्याचे दर अवास्तव असून, रेल्वेस्थानक, बसस्थानक अशा सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, तसेच पेयजलाच्या बाटलीची किंमत वाजवी असावी अशी मागणी संघटनेने केली आहे.