Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

(सविस्तर वृत्त)

एअर व्हाईस मार्शल रमेश राय यांनी सूत्रे स्वीकारली
नागपूर, ९ जून/ प्रतिनिधी

 

भारतीय अनुरक्षण मुख्यालयाचे एअर व्हाईस मार्शल रमेश राय यांनी अनुरक्षण मुख्यालयाच्या वरिष्ठ वायु व प्रशासकीय अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली.
राय यांनी २९ डिसेंबर १९७६ साली लढाऊ विमानाचे पायलट म्हणून भारतीय वायुसेनेच्या सेवेत असताना त्यांना कमिशन मिळाले. तसेच राष्ट्रीय रक्षा अकादमीचे विद्यार्थी असताना त्यांना राष्ट्रपतींकडून देण्यात येणाऱ्या कास्य पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांनी त्यांच्या वायुसेनेतील कार्यकाळात लढाऊ, प्रशिक्षणार्थी आणि परिवहन अशा सर्वच प्रकारच्या विमानांचे सारथ्य केले आहे. १९९९ मध्ये राय यांनी कारगिल युद्धात सक्रिय सहभाग घेतला. एक उत्तम प्रशिक्षित फ्लाईंग इन्स्ट्रक्टर असून एक उत्तम टेस्ट पायलट म्हणून वायुसेनेत प्रसिद्ध आहेत. त्यांनी जॅग्वार विमानाचे स्क्वाड्रन लीडर म्हणून कार्य केले आहे. तसेच ते चेन्नई येथील फ्लाईंग इन्स्ट्रक्टर अकादमीच्या सहसंचालक पदावरही अनेक वर्ष कार्यरत होते. राय यांनी कारकिर्दीतील तीन वर्षे इस्त्रायलमधील तेल अव्हीव येथे भारतीय दुतावासात अधिकारी पदावर काम केले आहे. वायुसेनेत हॉक अ‍ॅडव्हान्स जेट ट्रेनरचा ज्यावेळी समावेश करण्यात आला त्यावेळी बिदर येथे स्थापन करण्यात आलेल्या एअरफोर्स स्टेशनचे कमांडिग ऑफिसर म्हणून राय यांची नियुक्ती करण्यात आली होती.
१९७९ मध्ये त्यांना वायुसेनेच्या वायु विभागाचे वायु अधिकारी कमांडिंग इन चीफ आणि १९९६ मध्ये वायुसेनाध्यक्षांच्या कमेंडेशन सन्मानाने गौरवण्यात आले. उल्लेखनीय कामगिरी व कुशल नेतृत्व गुणासाठी त्यांना १९९८ मध्ये वायुसेना पदकाने सन्मानित करण्यात आले.