Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

दिल्ली दरवाजाबाहेरील रस्तारुंदीकरण ठप्प
गाळ्यांच्या वादाचे भिजत घोंगडे
नगर, ९ जून/प्रतिनिधी
प्रश्न निर्माण झाला, मात्र त्याचे उत्तर शोधण्याची कोणाचीच तयारी नाही. त्यामुळे दिल्ली दरवाजा ते पत्रकार चौक या सुमारे साडेसहा कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम नीलक्रांती चौकापर्यंत येऊन तेथेच थांबले आहे. त्यापुढे थेट दिल्ली दरवाजापर्यंत असलेल्या गाळ्यांचे काय करायचे, असा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. मनपा प्रशासनाने या व्यावसायिकांना गाळे खाली करण्याविषयी नोटिसा बजावून आपल्या बाजूने वाट शोधली होती. मात्र, ‘सन ८२पासून या गाळ्यांमध्ये व्यवसाय करत असलेल्यांनी आता ऐनवेळी जायचे कुठे?’ या प्रश्नाचे राजकारण झाले व रस्त्याचे काम रेंगाळले.

श्रीगोंद्याच्या आजी-माजी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव
बेकायदा सेवावर्ग
नगर, ९ जून/प्रतिनिधी
राजकीय वरदहस्तातून झालेल्या दौलत ओगले या प्राथमिक शिक्षकाच्या बेकायदा सेवावर्ग प्रकरणी श्रीगोंदे पंचायत समितीतील सध्याचे गटशिक्षणाधिकारी गवळी व पूर्वीचे गटशिक्षणाधिकारी पवार या दोघांवर कारवाईच्या शिफारशीचा प्रस्ताव सरकारला पाठवण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने यांनी आज प्राथमिक शिक्षण विभागास दिला.
श्रीगोंद्यातील बेकायदा सेवावर्ग प्रकरणी दडपण आणणारा जि. प. पदाधिकारी नामानिराळा राहिला, मात्र अधिकारी कारवाईच्या कचाटय़ात सापडले आहेत. पूर्वीचे गटशिक्षणाधिकारी पवार सध्या पुण्यात नियुक्त आहेत.

प्राथमिक शिक्षक संघाला जिल्हाध्यक्ष निवडीचे वेध
जि. प. शिक्षण समितीवर शेळकेंच्या नियुक्तीस हरकत
नगर, ९ जून/प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील प्राथमिक शिक्षकांत सर्वात प्रबळ असणाऱ्या जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाला नवीन जिल्हाध्यक्ष निवडीचे वेध लागले आहेत. विद्यमान जिल्हाध्यक्ष सुभाष खोबरे यांनी पदाचा राजीनामा दिला असून, प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून संजय मोहन शेळके यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर शेळके यांची सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी, असे पत्र संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.

.. आम्ही अंतराळवीर झालो!
नगर, ९ जून/प्रतिनिधी

‘‘शटल राईड’चा अनुभव घेण्यासाठी आम्ही पोझीशन घेतली. यान थोडे व्हायब्रेट झाले. जोरदार आवाज होऊन आम्ही अवकाशात जाऊ लागल्याचा भास झाला. मग आम्ही स्पेस वॉक सुरू केला. झिरो ग्रॅव्हिटीमुळे आमच्या डोक्यावरचे केस उभे राहिले. हवेत तरंगायला लागलो. आम्ही अंतराळवीरच झालो होतो. काही क्षणांकरिता का होईना.. केसरी टूर्स आयोजित ‘नासा सहली’ला जाऊन आलेली भक्ती डांगे ही दहावीतील विद्यार्थिनी सहलीचे अनुभव पत्रकारांना सांगत होती.

ठेकेदाराच्या गलथानपणामुळे कामगाराचा मृत्यू
‘महावितरण’च्या परवानगीविना दुरुस्ती
नगर, ९ जून/प्रतिनिधी
प्रेमदान चौकातील वेदांतनगरजवळील विजेच्या खांबावर दुरुस्तीसाठी चढलेल्या दत्तात्रेय जगन गिते (वय २६, रा. कुटेवाडी, ढवळपुरी, ता. पारनेर) या ठेकेदार कंपनीच्या कामगाराचा काल दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात ठेकेदार नरेंद्र नगरकर (सिन्क्रोलेक कंपनी) यांच्या गलथानपणामुळे झाला असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. दरम्यान, गिते याच्या मृत्युमुळे त्याचे अपंग आई-वडील, २ लहान मुले व पत्नी उघडय़ावर पडले असून त्याचे पुढे काय, हा प्रश्न उभा राहिला आहे. ठेकेदारांकडे काम करणाऱ्या रोजंदारीवरील कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

‘भरतीमध्ये गैरप्रकार झाल्यास जि. प. अधिकाऱ्यांना घेराव’
ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा इशारा
नगर, ९ जून/प्रतिनिधी
जिल्हा परिषदेत नोकरभरती करताना नियमाप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतून १० टक्के जागा भरण्यासाठी पारदर्शकता ठेवून सेवाज्येष्ठतेनुसार यादी तयार करावी. भरतीबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आल्यास अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल, असा इशारा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने दिला.

त्र्यंबकराव जगदाळे यांचे अल्प आजाराने निधन
कोपरगाव, ९ जून/वार्ताहर
येथील कुंभार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते त्र्यंबकराव मारूती जगदाळे यांचे अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यामागे १ मुलगा, ५ मुली, नातू असा परिवार आहे.(कै.) जगदाळे यांनी २५ वर्षे पंढरपूरच्या पायी दिंडीत सहभाग घेतला. नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती संजय जगदाळे यांचे ते वडील होत.त्यांच्या निधनाबद्दल साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव बिपीन कोल्हे, नगराध्यक्ष मंगेश पाटील, माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी दुख व्यक्त केले.

शांतिलाल लोहाडे यांना पुरस्कार; दि. १२ ला वितरण
कोपरगाव, ९ जून/वार्ताहर

येथील व्यापारी व बँकिंग क्षेत्रातील अभ्यासक शांतिलाल लोहाडे यांना विष्णूअण्णा पाटील जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी (दि. १२) होणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी दिली. या वेळी जलसंपदामंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. श्री. लोहाडे यांचे ज्येष्ठ नेते शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, आमदार अशोक काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव बिपीन कोल्हे, नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

‘घरसंसार’ मालिका उद्यापासून सह्य़ाद्रीवर
नगर, ९ जून/प्रतिनिधी
येथील निर्माते-दिग्दर्शक विजयराज नवले यांची ‘घरसंसार’ ही कौटुंबिक मालिका गुरुवार (दि. ११)पासून मुंबई दूरदर्शनच्या सह्य़ाद्री वाहिनीवरून सायंकाळी ५ वाजता प्रसारित होणार आहे.दर गुरुवारी प्रसारित होणाऱ्या या मालिकेत अभिनेते विजय चव्हाण, रवींद्र बोर्डे, कल्पना साठे, डॉ. उत्कर्षां नाईक यांच्यासह जिल्ह्य़ातील पोपट चव्हाण, नीळकंठ चौरे, उज्ज्वला शिंगाडे हे कलाकार आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबावर आधारित या मालिकेची कथा, पटकथा व संवाद अनिल कालेलकर यांचे आहेत. एन. एम. बोरा फिल्म असोसिएट्स प्रस्तुत ‘नऊनी’ फिल्मस निर्मित या मालिकेचे कार्यकारी निर्माते निवास नाईक व सिनेअभिनेत्री प्रेमाकिरण आहेत.

तांबटकर मळ्यात ३४ हजारांची घरफोडी
नगर, ९ जून/प्रतिनिधी
बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरटय़ाने ३४ हजार ७०० रुपयांचा ऐवज लांबविला. गेल्या शनिवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. राजीव विलासचंद्र शितोळे (रा. तांबटकर मळा) यांनी फिर्याद दिली. ते आपल्या कुटुंबीयांसमवेत आठवडाभर पुण्याला गेले होते. शनिवारी रात्री ते घरी परतल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरटय़ांनी कटावणीने कुलूप तोडून कपाटातून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा ३४ हजार ७०० रुपयांचा ऐवज लांबविला. तपास तोफखाना ठाण्याचे उपनिरीक्षक अहिरराव करीत आहेत.

बसंताबाई मुथा यांचे संथारा व्रतात निधन
नगर, ९ जून/प्रतिनिधी

श्रीमती बसंताबाई मुथा (९२ वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी संथारा व्रतात निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा पत्रकार वसाहत (माणिकनगर) येथून काढण्यात आली.
वांबोरी येथील दिवंगत स्वातंत्र्यसैनिक उत्तमचंदजी मुथा यांच्या त्या पत्नी होत. नगर टाईम्सच्या संचालिका मीना मुनोत, गौतम मुथा, अजय मुथा, विनोद मुथा, चंद्रकांत मुथा, सुशील मुथा यांच्या त्या आजी होत.

‘राजमाता जिजाऊंसारख्या रणरागिणी तयार व्हाव्यात’
नगर, ९ जून/प्रतिनिधी

शिवाजीमहाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊंसारख्या हिंदू स्त्रिया तयार करणे हे हिंदू रणरागिणी समितीचे उद्दिष्ट असेल, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे नगर-पुणे जिल्हा संघटक सुनील धनवट यांनी केले. ‘हिंदू युवतींनो रणरागिणी बना’ या कार्यक्रमाचे आयोजन समितीतर्फे सुयोग मंगल कार्यालयात करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी धनवट बोलत होते. वारकरी संप्रदायाच्या प्रभा भोंग, अंजली जोशी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. श्रीमती भोंग म्हणाल्या की, आजच्या काळात स्त्री शिक्षणामध्ये पुढे गेली, पण संस्कारात मागे राहिली. हिंदू संस्कृतीनुसार कृती करून संघटित झाले पाहिजे. श्रीमती जोशी यांनी स्वातंत्र्य व स्वैराचार यातील फरक समजून घ्यायला हवा. ते केवळ आपल्या धर्माचे शिक्षण घेऊनच होऊ शकते, असे सांगितले. सूत्रसंचालन पूनम चौरासिया यांनी केले. प्रास्ताविक मनीषा कावटे यांनी केले.

मुंबईत दि. १२ला राज्य युवा धोरण माहिती परिषद
नगर, ९ जून/प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या (मुंबई) वतीने १२जूनला मुंबईत राज्य युवा धोरण माहिती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. नवमहाराष्ट्र युवा अभियानांतर्गत प्रतिष्ठानने ही परिषद आयोजित केली असून, त्यासाठी राज्यभरातून अनेक युवक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अभियानचे नगरचे संघटक गुरूदत्त टेमकर यांनी दिली. नगर शहर व जिल्ह्य़ातूनही युवकांनी या परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्याला युवाधोरण असावे यासाठी प्रतिष्ठान प्रयत्न करीत आहे. प्रतिष्ठानच्या विश्वस्त खासदार सुप्रिया सुळे या परिषदेत युवकांशी संवाद संधतील. त्यातून प्रतिष्ठान युवाधोरणाचा आराखडा व मसुदा तयार करून तो सरकारला सादर करेल, असे टेमकर यांनी सांगितले.

सडे शिवारात तरुणाचा मृतदेह आढळला
देवळाली प्रवरा, ९ जून/वार्ताहर

राहुरी शहरातून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सडे गावच्या शिवारात मुळा उजव्या कालव्यात आढळला. शहरातील बागवान बिल्डिंगमध्ये राहणारा हर्षवर्धन अनिल आखमोडे (वय १९) हा तरुण राहत्या घरातून ३१ मेपासून बेपत्ता होता. आज सकाळी सडे गावच्या शिवारात त्याचा मृतदेह आढळला. पोलीस पाटील अण्णासाहेब पानसंबळ यांनी याबाबत पोलिसांना खबर दिली. आज सकाळी १० वाजता तालुक्यातील दवणगाव शिवारात विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दवणगाव येथील अनिल जालिंदर होन शेतात काम करीत असताना विजेचा धक्का बसून ते जागीच ठार झाले. बाळासाहेब होन यांनी खबर दिली.

‘सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेल्यांसाठी स्वेच्छा तडजोड’
नगर, ९ जून/प्रतिनिधी

सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेले अनेक बंदी तुरुंगात आहेत. त्यांनी गुन्ह्य़ासंबंधी स्वेच्छा तडजोड योजनेचा फायदा घ्यावा, मात्र महिला व १४ वर्षांखालील बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्य़ांना ही योजना लागू नाही, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश पंकज शहा यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शहर वकील संघ व मध्यवर्ती कारागृहातर्फे आयोजित स्वेच्छा तडजोड योजनेंतर्गत कायदेविषयक शिबिरात शहा बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. भटेवरा, सरकारी वकील सुरेश लगड, केंद्र सरकारचे वकील सुभाष भोर, सचिव सतीश गुगळे, कारागृह पर्यवेक्षक डी. डी. काळे, न्यायालय अधीक्षक आर. जे. दाणी, वैद्यकीय अधिकारी रवींद्र सोनार, दीपक वावरे आदी उपस्थित होते.

महावितरण प्रशासनाविरुद्ध उद्या नाशिकला धरणे
नगर, ९ जून/प्रतिनिधी

कामगारांच्या प्रश्नांबाबत नकारात्मक भूमिका घेणाऱ्या महावितरणच्या प्रशासनाविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यासाठी गुरुवारी (दि. ११) नाशिक झोन कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे झोनल सचिव सुरेश सोनार यांनी दिली.आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी महासंघातर्फे जिल्ह्य़ात संपर्क अभियान सुरू आहे. त्याअंतर्गत स्टेशन रस्त्यावरील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर आयोजित द्वारसभेत सोनार बोलत होते. महासंघाचे झोनल सहसचिव एल. व्ही. कुलकर्णी, नगर सर्कल सचिव सुभाष जगदाळे, कार्याध्यक्ष हेमंत धर्माधिकारी, सुहास गटणे आदी या वेळी उपस्थित होते.
वीज कर्मचाऱ्यांची पगारवाढ, पेन्शन, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी, पदोन्नती, बदल्या, तांत्रिक कामगारांची सुरक्षा आदी प्रश्नांवर सोनार यांनी मार्गदर्शन केले.