Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

विदर्भातील गुणवंत झाले कामयाब
समाज कार्याची संधी -अतुल भडांगे

नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

राज्यलोकसेवा आयोगातर्फे २००६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी १७ उमेदवारांपैकी विदर्भातून या पदासाठी अतुल भडांगे हा एकमेव उमेदवार पात्र ठरला आहे. अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापूर येथील रहिवाशी असलेल्या अतुलने तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली. सध्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत असून दुसऱ्या प्रयत्नात अतुलने मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र, मुलाखतीमध्ये निवड न झाल्याने पुन्हा युपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरू केली आहे.

ग्राहकांचे शोषण रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी -राजाभाऊ पोफळी
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

आपल्या देशातील दोषपूर्ण अर्थव्यवस्थेमुळे ग्राहकांचे शोषण होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थशास्त्रज्ञांचा समावेश असलेली स्वतंत्र यंत्रणा हवी, असे मत अ.भा. ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ पोफळी यांनी व्यक्त केले.नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना पोफळी म्हणाले की, राजकीय घडामोडींबाबत जागृत असलेला समाजातील सामान्य माणूस देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल जागृत नाही. शिवाय, अर्थव्यवस्थेतील दोषांमुळे ग्राहकांचे शोषण होत आहे.

बाल मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

आईसकँडी कारखान्यातील एका बाल मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास बोरियापुरामध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या बालमजुराच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांनीही आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शहरात अनेक उद्योगांमध्ये बाल मजुरांचे शोषण होत असताना कामगार खाते तसेच इतरही संबंधित शासकीय खात्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेने दाखवून दिले आहे.

करसवलतीचा लाभ खाजगी जिनिंगलाच
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

राज्यातील रसातळाला गेलेल्या जिनिंग प्रेसिंग उद्योगाला आधारी देण्यासाठी राज्य शासनाने यंत्रसामुग्रीवरील करात दिलेल्या सवलतीचा लाभ खाजगी जिनिंग प्रेसिंगलाच अधिक होणार आहे. राज्यात सरासरी २२५ जिनिग प्रेसिंग खाजगी आहेत तर, शासनाच्या फक्त सहा जिनिंग आहेत, हे येथे उल्लेखनीय.विदर्भ आणि मराठवाडय़ात मोठय़ा प्रमाणात कापसाचे उत्पादन होते, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुरू झालेले जिनिंग प्रेसिंग उद्योग स्वाभाविकपणे याच भागात अधिक आहेत.

बॅबेसियाच्या संसर्गाने विदर्भातील नीलगायींचे अस्तित्व धोक्यात
विक्रम हरकरे
नागपूर, ९ जून

विदर्भातील जंगलात असलेल्या नीलगायींमध्ये गोचिडांपासून होणाऱ्या संसर्गजन्य बॅबेसिया रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे. विदर्भातील जंगलांमध्ये नीलगायींची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने बॅबेसियाला वेळीच आळा घालण्यासाठी वन विभाग, पशुवैद्यक विद्यापीठे तसेच, अनुभवी आणि होतकरू संशोधकांनी एकत्र येऊन उपाय शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

कामापेक्षा वाद जास्त !
चंद्रशेखर बोबडे

नागपूर हे देशाच्या मध्यभागी असल्याने ते हृदयस्थान मानले जाते, त्याच प्रमाणे नागपूरचा मध्यभाग म्हणजेच मध्य नागपूर हेही शहराचे खऱ्या अर्थाने हृदयस्थान. सरासरी २ लाख २० हजार मतदार असलेल्या या मतदारसंघाचा परिसीमनानंतर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुख्यालयासह महाल भागातील अनेक हिंदू वस्त्या जोडल्याने त्याचा चेहरा आता मुस्लिम बहुल राहिला नाही.

गोसीखुर्द धरणाचे काम पूर्ण, ऑगस्टमध्ये पाणी अडवणार
* एकूण ८५ गावांचे पुनर्वसन * यंदा १७५० कोटी मिळण्याची अपेक्षा

नितीन तोटेवार
नागपूर, ९ जून

पूर्व विदर्भातील खास करून नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या बहुप्रतिक्षित गोसीखुर्द प्रकल्पाच्या धरणाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या ऑगस्टमध्ये या प्रकल्पात पाणी साठवण्यात येणार असून त्यापासून सुमारे २५ हजार हेक्टर शेतीला लाभ होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी प्रवीण दराडे आणि विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

शेतकऱ्यांना योग्य मोबदला व पुनर्वसनस्थळी सर्व सोयी देण्याची मागणी
गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांनी मांडली पत्रकारांपुढे कैफियत
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची पत्रकारांना माहिती देण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर प्रकल्पग्रस्तांनी आज त्यांची कैफियत मांडली. दारिद्रय़ रेषेखालील रेशन कार्ड, प्रकल्पबाधित असल्याचे प्रमाणपत्र, रोजगाराची सोय, पेयजल, वीज आदी अनेक समस्यांकडे गावकऱ्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. जिल्हा प्रशासन व विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या वतीने गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकारांचा दौरा आयोजित करण्यात आला होता.

नव्याने कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पाच हजाराचेच कर्ज
विदर्भ जनआंदोलन समितीचा आंदोलनाचा इशारा
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

जिल्हा सहकारी बँकांनी नव्याने कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाधिक पाच हजार रुपयांपर्यंत पीक कर्ज देण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांना परत आत्महत्येकडे वळणारा असून याविरोधात सहकारी बँकांच्या संचालकांच्या घरासमोर १२ जूनपासून आंदोलन करण्याचा इशारा विदर्भ जनआंदोलन समितीने दिला आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांचाही सहभाग घ्या -मिगलानी
पर्यावरण सप्ताहातील स्पर्धाचे पुरस्कार वितरण
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी
पर्यावरणाबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी याप्रकारच्या उपक्रमात जास्तीतजास्त शाळकरी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात यावे, असे आवाहन कार्मिक विभागाचे संचालक ओ.पी. मिगलानी यांनी यावेळी केले. वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित पर्यावरण सप्ताहातील स्पर्धाचे पुरस्कार वितरण नुकतेच करण्यात आले. यावेळी ते बोलत होत.

मृगाच्या हलक्या सरी कुठेकुठेच
नागपूर, ९ जून/ प्रतिनिधी

मृगाचा पाऊस आज आला मात्र तो सार्वत्रिक नव्हता, त्यामुळे पाऊस आल्याचा आनंद झाला मात्र समाधान झाले नाही.मान्सून लवकर येणार म्हटल्यावर सर्वाच्याच नजरा त्याच्याकडे लागल्या होत्या. सात जून कोरडा गेल्याने चिंता वाढली, आज तर उन्हाची तीव्रता अधिक होती. विदर्भात चंद्रपूर, गोंदिया आणि ब्रम्हपुरी येथे पारा ४४ अंशावर गेला होता. नागपुरातही सकाळपासूनच उन्हांचे चटके जाणवू लागले होते. येथे दिवसभराचे तापमान ४३ अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले. आजचाही दिवस कोरडा जाणार असेच वातावरण असताना साडेचारच्या दरम्यान नागपुरातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी आल्या. गार वारेही वाहू लागले. हलक्या कां होईना बरसलेल्या मृग सरींनी वातावरणातील उकाडा काही काळासाठी दूर झाला. रस्ते पावसाने भिजून गेले. पाऊस वाढेल अशी अपेक्षा असतानाच पावसाचा जोर कमी झाला. शेतकऱ्यांना सध्या जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे, पाऊस झाला की पेरणीला वेग येईल. पण पावसाची कुठलेही चिन्ह अद्याप दिसू लागले नाही. उलट उन्हं वाढत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

रमेश साठे यांची मंगळवारी माधव नेत्रपेढीला भेट
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

अल्पदृष्टी (लो व्हिजन) उपकरणांचे जागतिक कीर्तीचे संशोधक रमेश साठे (पुणे) हे मंगळवारी, ९ जूनला माधव नेत्रपेढीला भेट देणार आहेत. जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त ‘सक्षम’च्या विद्यमाने लो व्हिजन उपकरणांचे निर्माते व संशोधक रमेश साठे हे येत्या मंगळवारी १६, देवदत्त भवन, प्रतापनगर चौक येथील माधव नेत्रपेढीला भेट देणार आहेत. दुपारी ४ वाजता आयोजित कार्यक्रमात ते या उपकरणांचे प्रात्यक्षिक सादर करतील. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आणि इंटरनॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ काँप्लिमेंटरी मेडिसिनद्वारे ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या पदवीने विभूषित करण्यात आलेले साठे प्रथमच नागपुरात येत आहेत. लो व्हिजन ग्रस्तांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी कार्यक्रमाला हजर राहावे, असे आवाहन नेत्रपेढीने केले आहे.

११ गाडय़ांमध्ये दोन अतिरिक्त साधारण कोच
नागपूर, ९ जून/प्रतिनिधी

गोंदिया- बल्लारशहा मार्गावर धावणाऱ्या गाडय़ांमध्ये असणारी गर्दी बघता दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने ११ गाडय़ांमध्ये दोन अतिरिक्त साधारण कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे जास्तीतजास्त प्रवाश्यांना या गाडय़ांद्वारे प्रवास करणे शक्य होईल.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेनुसार १० जून पासून १ जीएनबी (बल्लारशहा-गोंदिया), २ जीएनबी (गोंदिया-बल्लारशहा), ४ जी.सी (गोंदिया-चांदफोर्ट), ४ जी.बी. (बालाघाट-गोंदिया), ६ जी.डब्ल्यू (गोंदिया-वडसा), तर ११ जूनपासून १ सीबी (बल्लारशहा-चांदाफोर्ट), २ सीबी (चांदाफोर्ट-बल्लारशहा), ३ सीबी (बल्लारशहा-चांदाफोर्ट), ३ जी.सी (चांदाफोर्ट-गोंदिया), ८ डब्लूसी (वडसा-चांदाफोर्ट) आणि ५ जी.सी (चांदाफोर्ट- गोंदिया) पॅसेंजर गाडय़ांना दोन अतिरिक्त कोच लावण्यात येणार आहे. यामुळे आता प्रत्येक गाडीत १४ कोच राहतील.

पार्किंगच्या नावावर होणारी लूट थांबवण्याची मागणी
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

शहरातील खाजगी इमारतींमध्ये वाहनधारकांकडून पार्किंगच्या नावावर वसुली करण्यात येत असून ही लूट त्वरित थांबवावी, अशी मागणी जनमंचतर्फे करण्यात आली आहे.सध्या आयसीआयसीआय बँकेच्या सिव्हील लाईन्स येथील इमारतीत पार्किंगच्या नावाखाली वसुली सुरू आहे. तसेच सदर येथील श्रीराम टॉवर आणि अनेक रुग्णालयांमध्ये पार्किंग शुल्क आकारण्यात येत आहे. प्रत्येक इमारतीचा नकाशा मंजूर करताना महापालिकेच्या नगररचना विभागाद्वारे पार्किंगसाठी जागा सोडण्याची सक्ती करण्यात येते. त्याशिवाय इमारतीचा नकाशाच मंजूर होत नसताना बिल्डर्स पार्किंगची जागा घशात घालतातच कसे, हा संशोधनाचा विषय आहे. अनेक ठिकाणी पार्किंगच्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्यात येत आहेत. तेथे वाहन ठेवायला जागाच नसते. जेथे जागा आहे, तेथे पार्किंग शुल्क उकळण्याचा धंदा काहींनी सुरू केला आहे. वास्तविक या प्रकारावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बंदी आणणे गरजेचे असताना ते दुर्लक्ष करीत असल्याने लूट करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. हे नियमबाह्य़ प्रकार थांबवावे, अशी मागणी जनमंचचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे, डॉ. अशोक लांजेवार, राजीव जगताप, मनोहर खोरगडे, एस.सी. वर्मा, मयूर वाणी, प्रकाश पंत, शंकर गुलाणी, डॉ. गजानन झाडे, मोहन शिंदे, मनोज चटप आदींनी केली आहे.

विदर्भ मोलकरीण संघटनेचे शुक्रवारी निदर्शने
जातीनिहाय आरक्षणासह महिला आरक्षण विधेयक पारित करण्याची मागणी
नागपूर, ९ जून / प्रतिनिधी

जातीनिहाय आरक्षणासकट महिला आरक्षण विधेयक पारित करावे, या मागणीसाठी विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे शुक्रवारी, १२ जूनला दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून महिला आरक्षण विधेयक संसदेत रखडले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व डाव्या पक्षांचा पाठिंबा असूनही केवळ मुलायमसिंग व शरद यादव यांच्या विरोधामुळे हे रखडल्याचा आरोप सत्ताधारी करीत असले तरी या दोन्ही नेत्यांचीच रास्त आहे. कारण जातीव्यवस्था बळकट असलेल्या या देशात शोषित घटक खुल्या स्पर्धेत टिकाव धरू शकणार नाहीत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शोषित समाजातील उमेदवारांच्या दारुण पराभवावरून हेच सिद्ध होत असून महिला विधेयक आहे तसे पारित करणे म्हणजे महिलांच्या क्षेत्रात उच्चवर्गीय व उच्चवर्णीय महिलांची मक्तेदारी टिकवणे होय. यासाठी अंतर्गत आरक्षणासह महिला आरक्षण विधेयक पारित करावे, अशी मागणी संघटनेच्या नेत्या डॉ. रूपा कुळकर्णी व विलास भोंगाडे यांनी पत्रकाद्वारे केली असून येत्या शुक्रवारी होणाऱ्या निदर्शनामध्ये महिलांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

डॉ. श्याम सिंह यांना नॅशनल अकादमी ऑफ सायन्सची फेलोशिप
नागपूर, ९ जून/प्रतिनिधी

राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ. श्याम सिंह यांना दिल्लीच्या कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीतर्फे नॅशनल अकादमी ऑफ सायन्सची फेलोशिप प्रदान करण्यात आली. संस्थेच्या महासंचालिका डॉ. मंगला राय यांच्या हस्ते डॉ. सिंह यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. फलोत्पादन क्षेत्रात ३७ वर्षांत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. श्याम सिंह यांनी आतापर्यंत ९३७ संशोधन लेख, फलोत्पादनासंबंधी पत्रिका व १२१९ लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये प्रकाशित केले आहे. आतापर्यंत त्यांना ५३ पुरस्कार मिळाले असून यात फकरुद्दीन अली अहमद पुरस्कार, उत्कृष्ट संशोधन पुरस्कार, वसंतराव नाईक कृषी अनुसंधान आणि शेती पुरस्कार, हरी ओम आश्रम ट्रस्ट अवॉर्ड आदीचा समावेश आहे.