Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

जीवनदर्शन
अनुभव

बृहदारण्यक उपनिषद प्रश्नचीन आहे. त्याची भाषा वैदिक आहे. त्यातील मंत्रांचे सामथ्र्य अलौकिक आहे. त्याचे अर्थ वेगळे आहेत. त्यावेळी ऋषींना जे अध्यात्मानुभव आले ते व्यक्त करणारी भाषा त्यांना तयार करावी लागली. त्यात यज्ञाच्या प्रतिमा अपरिहार्यपणे येतात. मात्र हे ऋषी अज्ञात जाणिवांचा शोध कसून घेतात. विश्वाचे रहस्य उकलण्यात हिंदू तत्त्वज्ञानाला आणि हिंदू

 

जीवनप्रणालीला खूपच स्वारस्य आहे. त्यामुळे अमूर्तातल्या अमूर्ताला शब्दातून व्यक्त करणे कठीणतम आहे. त्या काळात काहीही साधने हाताशी नसताना सृष्टीच्या निर्माणशक्तीची प्रक्रिया उलगडून सांगणे सोपे नाही. त्या निव्वळ कविकल्पना नाहीत. प्रकाशाला गती आहे. मन जेव्हा मृत्यूचे अतिक्रमण करून मुक्त होते तेव्हा तो चंद्रमा होतो. डोळा मृत्यूचे अतिक्रमण करून मुक्त झाला तेव्हा तो आदित्य झाला. या कल्पना मानवी अनुभव कक्षेच्या पलीकडल्या आहेत. कदाचित विज्ञानाच्या मते त्या अतिशयोक्त असतीलही; पण स्पर्श, संवाद, दृष्टी, चिंतन, स्वतंत्रता ही पाच अनुभवांची इंद्रिये ऋषींनी जोपासली. त्यांच्या मनाची प्रयोगशाळा त्यांनी आपल्या परीने समृद्ध केली आणि ती मनमोकळेपणाने सर्वासमोर मांडली. यातून त्यांनी मनाला देवताभावास पोहोचविले. असे अनुभव कितीही उच्च असले तरी सामान्याच्या जीवनात त्याचा प्रत्यय आल्याशिवाय त्या अनुभवातल्या खाचाखोचा कळत नाही. संतांनी आपल्या ग्रंथात ऋषींना आलेले अनुभव सुबोधपणे सांगितले. म्हणून ज्ञानेश्वरी, नाथभागवत, गाथा, दासबोध, तुलसी रामायण आदी संतग्रंथ समजण्यास श्रुतींचा परिचय आवश्यक आहे. शिवाय उपनिषदांचा भावार्थ लक्षात येण्यासाठी संतग्रंथांचा अभ्यास हवा, तरच वैदिक ऋषींच्या अलौकिक अनुभवाचे सामथ्र्य समजेल.
यशवंत पाठक

कुतूहल
कृष्णविवर- ८

कालांतराने संपूर्ण विश्व हे सर्व काही गिळंकृत करू शकणाऱ्या कृष्णविवरांच्या भक्ष्यस्थानी पडेल का?
आपल्याला माहीत आहे की, कृष्णविवरांची गुरुत्वाकर्षण शक्ती ही प्रचंड असते. आपल्याला ज्ञात असलेल्या सर्वात मोठय़ा कृष्णविवराचे वस्तुमान हे सूर्याच्या १८ अब्ज पट आहे. त्यामुळे आपल्याला असे वाटणे साहजिक आहे की, विश्वातील सर्व वस्तूंवर अशा प्रचंड कृष्णविवरांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव असेल. मात्र कृष्णविवराचे संपूर्ण वस्तुमान हे एका बिंदूत एकवटलेले असल्याने अशा अतिप्रचंड कृष्णविवरांच्या घटनाक्षितिजाचा आकार (आपल्या दृष्टीने कृष्णविवराची सीमा) हादेखील ताऱ्याताऱ्यांमधील अंतरांच्या मानाने खूपच छोटा असतो. आकडय़ांच्या भाषेत बोलायचे झाले तर या सर्वात मोठय़ा कृष्णविवराच्या सीमेएवढे अंतर पार करण्यासाठी प्रकाशाला फक्त वीस दिवस लागतात, तर आपल्या सूर्यापासून सर्वात जवळच्या ताऱ्यापर्यंत पोहोचण्यास प्रकाशाला सुमारे सव्वाचार वर्षे लागतात. इतक्या दूर अंतरावरील कृष्णविवरांच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम हा इतर साध्या वस्तूंच्या परिणामासारखाच असतो. आपण जसजसे दूर जाऊ, तसतसे गुरुत्वाकर्षणाचे बल अत्यंत कमी होत जाते. त्यामुळे या दूरच्या ताऱ्यांना कृष्णविवरे आपल्याकडे ओढून घेऊ शकत नाहीत.
आजपासून शेकडो अब्ज वर्षानी जर विश्वाचा वेध घेतला, तर विश्व हे कृष्णविवरे, न्यूट्रॉन तारे व श्वेतबटू ताऱ्यांनी भरून गेलेले स्मशान झालेले दिसेल. मात्र ही सर्व ताऱ्यांची कलेवरे एकमेकांपासून दूरदूर असल्याने एकमेकांवर कोणताही प्रभाव पाडणार नाहीत. अगदी आपल्यापुरता विचार करायचा झाला तरी आपला सूर्य हा कोणत्याही कृष्णविवराच्या जवळ नाही आणि वस्तुमानाच्या दृष्टीने तो छोटा तारा असल्याने त्याच्या जीवनान्ती त्याचे कृष्णविवर होणार नाही, तसंच आपली पृथ्वी कधीही आजूबाजूच्या कोणत्याही कृष्णविवराकडून गिळंकृत होणार नाही.
अनिकेत सुळे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दिन विशेष
बॉक्सर बंड

युरोपियनांच्या जुलमी अत्याचाराच्या विरोधात १० जून १९०० साली चीनमध्ये बॉक्सर बंड उठावाला सुरुवात झाली. युरोपियन संस्कृती, मिशनऱ्यांचा धर्मप्रचार यांच्या विरोधात ‘ई हो च्युआन’ म्हणजे ‘नैतिक मिलाफाची मुष्टी’ या नावाची संघटना स्थापन झाली. जादूटोणा हा या संघटनेचा पाया होता. बंदुकीच्या गोळय़ांपेक्षा आपल्या नेत्यांच्या केवळ एका मुष्टीने युरोपियन गारद होऊ शकतात, असा विश्वास या संघटनेच्या अनुयायांना होता. मुष्टीवरूनच पुढे बॉक्सर हा शब्द रूढ झाला. १० जून १९०० या दिवशी बंडखोरांनी अगदी नियोजनपूर्वक ख्रिस्ती मिशनरी, चर्च, विशेषत: बाटलेल्या ख्रिस्त्यांवर हल्ले केले. त्यात शेकडोंचा बळी गेला. बॉक्सरांनी रेल्वे, तारयंत्रणा विस्कळीत केली. बंडाचा उठाव इतका तीव्र होता की, जपान व जर्मनीच्या राजदूतांना ठार मारण्यात आले. हजारो युरोपियन व बाटलेल्या चिनी ख्रिस्त्यांना जाळण्यात आले. परिस्थितीचा फायदा घेऊन चिनी सरकारने २१ जून रोजी परकियांविरुद्ध युद्ध घोषित केले. तथापि बंडाचे लोण जसे उत्तरेत होते तसे दक्षिणेत नव्हते. दक्षिणेतल्या चिनी गव्हर्नरांनी युरोपियनांच्या संरक्षणाची हमी घेतली. बॉक्सर राजधानी पेकिंगमध्ये पोहोचले होते. पण प्रसंगावधान राखून अमेरिका, जपान व इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी या युरोपियन राष्ट्रांनी आपले सैन्य चीनमध्ये उतरवले. १५ ऑगस्ट रोजी त्यांनी राजधानी पेकिंगवर ताबा मिळवला आणि मग युरोपियन संस्कृतीचे चीनला दर्शन झाले. १५ हजार चिनी बंडखोर मारले गेले. ‘चिन्यांवर एवढा सूड उगवा की, पुढच्या हजार वर्षात चिन्यांनी जर्मनीकडे मान वर केली नाही पाहिजे’, असा आदेश जर्मन सम्राटाने दिला होता. आता आपली धडगत नाही हे मांचू सरकारच्या लक्षात आले. सुरुवातीला बंडाला पाठिंबा देणाऱ्या मांचूने बॉक्सरांना वाऱ्यावर सोडले. चिनी सम्राज्ञीने मानहानिकारक बॉक्सर करार करून स्वत:चे आसन मात्र अबाधित ठेवले.
संजय शा. वझरेकर

गोष्ट डॉट कॉम
मला उडायचंय
‘परी खरी असते का रे आज्या?’ चेतनने गंभीरपणे प्रश्न केला. ‘हो, असते ना! पण ती फक्त लहान मुलांनाच दिसते बरं का.’ चेतनला फारच महत्त्वाची माहिती मिळाली. ‘म्हणजे मला पण दिसेलच की ती?’ ‘दिसेल बुवा, नक्कीच दिसेल’, आजोबांनी चेतनला खात्रीच देऊन टाकली. ‘पत्ता सांगता तिचा?’ आजोबा जरा गोंधळात पडले. ‘आत्ता एकदम माझ्या लक्षात नाही रे येत. वय झालं तुझ्या आज्याचं. अरे, माझ्या चष्म्याचा नंबरही बदललाय वाटतं हल्ली. दिसत नाही नीट. जायला पाहिजे डोळे तपासायला’. आजोबांनी एकदम विषयच बदलून टाकला होता. पण चेतनच्या डोक्यातून परी गेली नव्हती. परीला भेटून त्याला माहिती करून घ्यायचं होतं की, उडायचं कसं. मग त्यानं खूप मज्जा केली असती. उडत नलूमावशीच्या गावाला गोव्यात गेला असता. खूप फणस, आंबे खाल्ले असते. करवंद, आळू तोडले असते. समुद्रकिनाऱ्यावर वाळूचा खूप मोठा किल्ला बांधला असता. कॉमिक्समधल्या हीरोंचं आपलं बरं असतं. ‘अप! अप! अँड अबोव्ह’ म्हटले की, चालले आकाशात. आणि ते गॅसचे फुगेपण कसले मस्त तरंगत राहातात आभाळात. त्यांच्यात म्हणे हवा नाही भरत, गॅस भरतात. चेतन विचारात पडला. फुग्यात गॅस भरतात, तसा माणसात भरता येत असेल का? मग मलाही छानपैकी उडता येईल. पण नकोच. गॅस भरल्यावर फुगा केवढातरी फुगतो. मीही तसाच फुगलो तर? नको रे बाबा! वर्गातल्या त्या जाडय़ा शेट्टय़ासारखं सगळी मुलं मलाही चिडवतील आणि मग मला रडू येईल. चेतनने गॅसची आयडिया डोक्यातून काढून टाकली. हताशपणे तो खिडकीतून बाहेर पाहात बसला. आकाशातून उडणारे पक्षी पाहून त्याच्या डोक्यात चांदणी चमकली. पक्षी काय बरे खातात? मी तेच खाल्ले की झाले काम! मलाही उडता यायला लागेल. शीळ घालत, गाणी म्हणत नुसतं आकाशभर भराऱ्या मारायच्या. दमलं की, झाडावर बसायचं. घरसुद्धा झाडावरच. कसलं छान! कधीतरी मनात आलं की, आपलं उतरायचं जमिनीवर. आज्याला, आईबाबांना भेटायचं आणि मग भुर्रकन् उडून जायचं. रात्री जेवताना चेतनने आपली कल्पना सगळय़ांना सांगून चकित करायचं ठरवलं. त्याला खात्री होती की, आई जरा घाबरेल. आपण उडताना पडू-बिडू म्हणून नकोच म्हणेलपण. आज्या आणि बाबा मात्र आपल्या कल्पनेवर बेहद्द खूश होतील. म्हणतील, आम्हाला पण नेत जा रे अधूनमधून उडायला. रात्री बाबांनी चेतनची कल्पना ऐकली. ते गप्प झाले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाबा चेतनला हाका मारतच घरी आले. हातातले पाकीट फडफडवत म्हणाले, ‘हे बघ, तुझ्यासाठी पंख आणलेत सोन्या!’ ..आणि आठवडय़ाच्या शेवटी सगळे विमानात बसून गोव्याला निघाले. टीव्ही, म्युझिक व्हिडीओज, कार्टून चॅनेल्स पाहाणं एवढंच न करता तुमची कल्पनाशक्ती वापरायला हवी. वेगळय़ा प्रकारे विचार करायला हवा. स्वप्ने पाहावीत, कल्पनेच्या राज्यात भराऱ्या माराव्यात, त्यातले काही ना काही सत्यात उतरेल असा विश्वास बाळगा.
आजचा संकल्प : मी कल्पनाशक्ती वापरून कविता लिहीन, चित्रे काढीन, गोष्टी लिहीन.
ज्ञानदा नाईक

dnyanadanaik@hotmail.com