Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

महापालिकेच्या सर्व निविदा २५ जूनपासून ‘ऑनलाइन’
‘टेंडर सेल’नव्हे; मलई खाण्याचा कक्ष

पुणे, ९ जून / प्रतिनिधी

निविदा भरताना होणारे कंत्राटादारांचे संगनमत किंवा दहशत, दादागिरी असे प्रकार टाळण्यासाठी निविदा स्वीकारण्याची संपूर्ण प्रक्रिया ‘ऑनलाइन’ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून २५ जूनपासून कंत्राटदारांना त्यांच्या सर्व निविदा ‘ऑनलाइन’ भरता येणार आहेत.महापालिकेच्या निविदा भरताना कंत्राटदारांकडून होणारे गैरप्रकार सर्वश्रुत असून ‘टेंडर सेल’ ताब्यात घेणे, छोटय़ा कंत्राटदारांना दहशतीने पळवून लावणे यासारखे प्रकार अजूनही सुरू असल्याचे गेल्या आठवडय़ात टिळक रस्ता कार्यालयात पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

पुण्यातील मेट्रोसाठी ‘दिल्ली मेट्रो पॅटर्न’
पिंपरी-स्वारगेट व वनाज-रामवाडी असे दोन मार्ग प्रथम बांधणार
पुणे, ९ जून/प्रतिनिधी

पुण्यात मेट्रोचा प्रकल्प यशस्वी करायचा असेल, तर दिल्लीच्या धर्तीवर ‘पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.’ अशी कंपनी स्थापन करून त्या कंपनीमार्फत मेट्रोचा प्रकल्प राबवावा, असा अहवाल दिल्ली मेट्रोने महापालिकेला दिला आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी असे ३१ किलोमीटर लांबीचे दोन मार्ग सुचविण्यात आले असून त्यासाठी आठ हजार ४०१ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. पुणे शहरातील सातत्याने वाढती लोकसंख्या विचारात घेता प्रवासाचा वेळ, अपघात, प्रदूषण यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे जलद व सुरक्षित सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो रेल्वे प्रस्तावित करण्यात आली आहे.

ऐतिहासिक इमारतीच्या शताब्दीचा ससून प्रशासनाला विसर!
पुतळ्यावरील धूळ हटली

मुस्तफा आतार
पुणे, ९ जून

ससून रुग्णालयाच्या उभारणीमध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या डेव्हिड ससून यांच्यासह जेकब ससून यांनी उभारलेल्या सध्याच्या बर्न विभागाच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण होत असताना त्याचा महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनास विसर पडला. एका ब्लॉगवर मात्र यासंदर्भात तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली असून ‘विस्मृतीत गेलेले अविस्मरणीय’ या शीर्षकाखाली या विसराळूपणाचे काहीच कसे वाटत नाही असा सवाल करीत यातून भारतीय मानसिकतेचे दर्शन जगभर घडविल्याची कडवट प्रतिक्रिया नोंदविण्यात आली आहे.

लाचखोर आयुक्तांकडे ३४ लाखांची मालमत्ता
गुरुवापर्यंत कोठडी
पुणे, ९ जून/प्रतिनिधी
दीड लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले सहकार खात्याचे अतिरिक्त आयुक्त मनोहर भागुजी त्रिभुवन (वय ५३, रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) यांच्या घरात सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रकमेसह ३४ लाख ७६ हजार ७१० रुपयांची मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात अकरा जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश पी. आर. बोरा यांनी आज दिले.

नदीपात्रालगतची अतिक्रमणे काढून टाकण्याचे आयुक्तांचे आदेश
शहरात १२ मदत केंद्रे; १६ जूनपासून यंत्रणा सज्ज

पिंपरी, ९ जून / प्रतिनिधी

ऐन पावसाळ्यात यापूर्वी आलेले अनुभव लक्षात घेता नदीपात्रालगतची सर्व अतिक्रमणे तातडीने काढून टाकण्याचे आदेश आयुक्त आशिष शर्मा यांनी प्रशासनास दिले आहेत. पावसाळ्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी शहरात १२ मदत केंद्रे उभारण्यात येणार असून येत्या १६ जूनपासून पूरनियंत्रणाची यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.

पौड रस्ता, कर्वेनगरमध्ये उद्या पाणीपुरवठा नाही
पुणे, ९ जून / प्रतिनिधी

वारजे जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या सबस्टेशनमध्ये विद्युतविषयक देखभाल-दुरुस्तीची कामे गुरुवारी (११ जून) केली जाणार असल्यामुळे पौड रस्ता, कर्वेनगर, डहाणूकर कॉलनीसह अनेक भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी दिवसभर बंद राहणार आहे. गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत. पौड रस्ता, भुसारी कॉलनी डावी व उजवी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रस्ता, सूस रस्ता, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे महामार्ग परिसर, कर्वेनगर, डहाणूकर कॉलनी, गांधी भवन आणि महात्मा सोसायटी.

कार्ला तलावात बुडून पुण्यातील युवकाचा मृत्यू
लोणावळा, ९ जून / वार्ताहर

मित्रासमवेत आई एकवीरेच्या दर्शनाकरिता काल्र्यात आलेला पंकज प्रीतम नागपुरे (वय -२३ रा. कसबा पेठ पुणे) या युवकाचा काल्र्याच्या तलावात गाळात अडकल्याने मृत्यू झाला.
आई एकवीरेचे दर्शन घेऊन मळवली रेल्वे स्थानकाकडे जाताना महामार्गालगत असलेल्या कार्ला तलावात पंकज मित्रासमवेत उतरला मात्र त्यास पोहता येत नसल्याने व तलावातील गाळात त्याचे पाय अडकल्याने त्याची दमछाक झाली. त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. पण त्यापूर्वी तो मृत पावला होता. सहायक पोलीस निरीक्षक ए. डी. फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. विजय मालुसरे तपास करीत आहेत.

ग्राहक पेठेकडून संस्कारक्षम मुखपृष्ठाच्या वह्य़ा
पुणे, ९ जून / प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या पुढे वह्य़ांच्या माध्यमातून चांगला संस्कार व्हावा या हेतूने ग्राहक पेठ यांनी संस्कारक्षम मुखपृष्ठ वह्य़ा विक्रीची परंपरा या वर्षीही सुरू ठेवली आहे, अशी माहिती ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी दिली.या वह्य़ांच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, बाबा आमटे तसेच किल्ल्यांची छायाचित्रे आहेत. वह्य़ांबरोबरच कंपास बॉक्स, लंच बॉक्सेस, दप्तरे, वह्य़ा, वॉटर बॉटल, शालेय स्टेशनरी सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.

मंगला फाऊंडेशनच्या वतीने १५ पासून नेत्रतपासणी शिबिर
पुणे, ९ जून / प्रतिनिधी

मंगला परांजपे यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त मंगला फाऊंडेशनच्या वतीने मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १५ ते २५ जून रोजी हे शिबिर होणार असून सवलतीच्या दरात मोतीिबदू शस्त्रक्रि या करण्यात येणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. मोहन परांजपे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ट्रस्टचे विश्वस्त बिपीन देशमुख उपस्थित होते. यानिमित्त १४ जून रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता मित्रमंडळ सभागृह येथे डॉ. अभिजित वैद्य यांचे ‘हृदयविकार व मानसिक आरोग्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या वेळी रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल विनय कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. या वेळी डॉ. परांजपे लिखित ‘तुमच्या डोळ्याविषयी, थोडक्यात पण महत्त्वाचे ’या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. वैद्य व कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. शिबिराचा लाभ घेण्यासाठी व नाव नोंदणीसाठी मंगला फाऊंडेशन, यशवंत आय क्लिनिक व हॉस्पिटल, मित्रमंडळ सभागृह, दूरध्वनी क्रमांक २४४४३४५५ / २४४४६४००४ वर संपर्क साधावा.

विरोधी पक्षनेते, प्रभाग अध्यक्षांसाठी पिंपरीत नवी मोटार
िपपरी, ९ जून / प्रतिनिधी

िपपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते संतोष बारणे, अ प्रभागाचे अध्यक्ष दत्ता साने आणि नगररचना विभागाचे उपसंचालक अविनाश पाटील यांच्यासाठी नवीन ‘अ‍ॅम्बेसिडर’ मोटार खरेदी करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. यासाठी होणाऱ्या १५ लाख खर्चास मान्यताही देण्यात आली.अविनाश पाटील यांच्यासाठी नवीन मोटार खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून आयत्यावेळी मांडण्यात आला असता सदस्यांनी त्यास बारणे आणि साने यांच्यासाठी मोटार खरेदी करण्याची उपसूचना मांडली. त्यानुसार, प्रत्येकी पाच लाख याप्रमाणे १५ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.आजच्या बैठकीत एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मान्यता देण्यात आली. ‘स्त्रीभ्रूण हत्या’ या विषयावर पथनाटय़ाद्वारे जनजागृती करण्याचा खासगी संस्थेचा प्रस्ताव तहकूब करण्यात आला.