Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

राज्य


सिंधुदुर्गच्या किनाऱ्यांवरील ‘ऑलीव्ह रिडले’ कासवांची फिल्म ग्रीन ऑस्करसाठी
अभिमन्यू लोंढे, सावंतवाडी, ९ जून

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अथांग सागरकिनाऱ्यावर आढळणाऱ्या ‘ऑलीव्ह रिडले’ (कासव)ची फिल्म ग्रीन ऑस्करसाठी वनखात्याने पाठविली आहे. उपवन संरक्षक नरेश झुरमुरे यांनी सागरकिनाऱ्यावर १४ वेळा जाऊन ही फिल्म तयार केली असून, ‘ग्रीन ऑस्कर’साठी फिल्म पाठविण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

पावसाच्या पाश्र्वभूमीवर चिपळूण बाजारपेठ सज्ज
चिपळूण, ९ जून/वार्ताहर

पावसाची चाहूल लागताच येथील बाजारपेठ पावसाळी वस्तूंनी सजून गेली आहे. यावर्षीही ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशा वस्तू व्यावसायिकांनी उपलब्ध केल्या आहेत. शाळांना होणारी सुरुवात व पावसाचे आगमन यामुळे दरवर्षी हा हंगाम व्यावसायिकांना लाखो रुपयांचे उत्पन्न देऊन जातो. त्यामुळे व्यावसायिकांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. वरुणराजाच्या आगमनापूर्वी आठ दिवस अगोदरच काही व्यावसायिकांनी विविध वस्तूंनी आपली दुकाने सजविली होती. याच दरम्यान शनिवारी पावसाने आपली जोरदार हजेरी लावल्यानंतर पावसाळी वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे.

रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय ठरणार राज्यातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक इमारत
अलिबाग, ९ जून / प्रतिनिधी

रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाची येथे बांधण्यात येणारी ५२ हजार चौरस फूट क्षेत्राची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक अशी ठरणार आहे. आठ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या इमारतीचे भूमीपूजन राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते उद्या, (बुधवार) दुपारी तीन वाजता हिराकोट तलावाशेजारील भूखंडावर होणार असल्याची माहिती रायगड जल्हा पोलीस अधीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी दिली.

कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकासाचा २०९९ कोटींचा प्रस्ताव वाऱ्यावर
कोल्हापूर, ९ जून /प्रतिनिधी

शहरात पाणीपुरवठा आणि सांडपाणी निचरा व्यवस्थेची सुरू असलेली सुमारे १०० कोटी रुपयांची कामे आणि २२० कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या २०९९ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला तातडीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी देऊनही प्रत्यक्षात नव्या अर्थसंकल्पात कोल्हापूरकरांचा भ्रमनिरास झाला आहे. निवडणुकांचे निमित्त काढून राज्यकर्त्यांनी जनतेला आश्वासनांच्या हिंदूोळ्यावर झुलवले असले, तरी अर्थसंकल्पीय तरतुदीत मात्र तोंडाला पाने पुसल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे कोल्हापुरात तीर्थक्षेत्राच्या निधीच्या मागणीवरून आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.

नाशिकमध्ये गुंडगिरीविरोधात भाजपचे आंदोलन
नाशिक, ९ जून / प्रतिनिधी

शहरातील चोऱ्या, घरफोडय़ा, खूनाशहरातील चोऱ्या, घरफोडय़ा, खूनाच्या घटना वाढण्यास पोलीस यंत्रणा संपूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप करीत भाजपच्या वतीने मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून पोलीस यंत्रणेच्या कार्यशैलीचा धिक्कार करण्यात आला. सत्ताधारी पक्षांकडून गुन्हेगारांना आश्रय मिळत असल्याने पोलीस यंत्रणा कारवाई करण्यास धजावत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. शहरातील जवळपास सर्वच भागात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना सिडको परिसरात एका टोळक्याने सुमारे ४० वाहनांची एकाचवेळी जाळपोळ करून पोलीस यंत्रणेला खुले आव्हान दिले. या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सागरीमार्गे केसर आंबा प्रथमच अमेरिकेकडे रवाना
नाशिक, ९ जून/प्रतिनिधी

हवाई मालवाहतूक खर्चिक होत असल्याने अमेरिकेच्या बाजारात इतरांच्या तुलनेत महागडय़ा ठरलेल्या भारतीय आंब्याची चव तेथील खवय्यांना किफायतशीर दरात घेता यावी या उद्देशाने केंद्रीय कृषी मंत्रालय व ‘अपेडा’ यांच्यातर्फे सागरी मार्ग चाचपण्यात येत असून त्यानुसार केसर आंब्याचा देशातील पहिलाच कंटेनर आज दुपारी सागरी मार्गाने अमेरिकेला रवाना झाला.

जवान राकेश सावंत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
महाड, ९ जून/वार्ताहर

जम्मूत गस्तीवर असताना झालेल्या अपघातात शहीद झालेला पोलादपूर येथील जवान राकेश तात्याबा सावंत (२४) याच्या पार्थिवावर आज सकाळी शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. राकेशवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी शासनाकडून मानवंदना देण्यात येणार होती, परंतु अलिबाग येथून निघालेले पोलीस दल वेळेत पोहोचू शकले नाही. सावंतकोंड ग्रामस्थांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर स्थानिक पोलिसांकडून राकेशला मानवंदना देण्यात आली.

पर्यटनाच्या माध्यमातून तारकर्ली केंद्रास चांगले उत्पन्न
सावंतवाडी, ९ जून/वार्ताहर

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली पर्यटन केंद्राच्या माध्यमातून सुरू केलेल्या ‘स्नॉर्कलिंग’ व ‘हाऊसबोट’ या उपक्रमांतून सुमारे ४५ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न तारकर्ली केंद्राला झाले आहे. स्नॉर्कलिंग, हाऊसबोट, किल्ला भ्रमंती, बांबू हाऊस या अतिरिक्त उपक्रमांतून मालवणच्या पर्यटन उपक्रमाला चालना मिळाली असून लाखो रुपयांचा आर्थिक लाभ झाला आहे. ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंतच्या कालावधीत पर्यटन महामंडळाच्या स्नॉर्कलिंग सुविधेचा लाभ पाच हजार ६८२ पर्यटकांनी घेतला. प्रति पर्यटक २५० रुपये याप्रमाणे पर्यटन महामंडळाला या उपक्रमाद्वारे १४ लाख ५० हजार ५०० रुपये आर्थिक उत्पन्न मिळाले. एप्रिल २००८ ते मार्च २००९ या आर्थिक वर्षात हाऊसबोटच्या पर्यटनातून महामंडळाला सुमारे २५ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न प्रश्नप्त झाले. श्रीमंत पर्यटकांची हाऊसबोटला चांगली पसंती लाभली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची वाढती पसंती पाहता भविष्यात पायाभूत सुविधा प्रश्नप्त झाल्यास पर्यटकांची रीघ वाढेल. मालवण, सावंतवाडी, आरोंदा, तारकर्ली, वेळागर, आंबोली अशा विविध ठिकाणी पर्यटक आवर्जून भेटी देतात. पावसाळ्यात आंबोलीतही पर्यटक मोठय़ा प्रमाणात येतात.

कलररोप कंपनीत असंतोष; २९ कामगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
खोपोली, ९ जून/वार्ताहर

कलररोप प्रश्न. लि. कंपनीतील कामावरून कमी करण्यात आलेल्या व कामावर नव्याने भरती करण्यात आलेल्या कामगारांच्या दोन गटांत संघर्ष सुरू झाल्यामुळे कारखाना परिसरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. कलररोप कंपनीच्या व्यवस्थापनाने मंदीमुळे कारखाना डबघाईला आल्याचे कारण पुढे करून एक ते चार वर्षे कायमस्वरुपी काम करणाऱ्या १९ कामगारांना कामावरून कमी केले होते. व्यवस्थापनाने ठेकेदाराला हाताशी धरून प्रत्यक्षात नवीन कंत्राटी कामगारांची भरती केल्याचे आढळून आल्यामुळे कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांमध्ये असंतोष पसरला. या असंतोषग्रस्त संतप्त कामगारांनी नव्याने भरती झालेल्या कंत्राटी कामगारांना कामावर जाण्यास मज्जाव केल्यामुळे दोन गटांत तणाव निर्माण झाला. व्यवस्थापनाने पोलीस यंत्रणेशी संपर्क साधल्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान दोन्ही गटांतील कामगारांनी परस्पर विरोधात तक्रारी दाखल केल्या.

चंद्रसेन पवार यांची बदली
खालापूरचे नायब तहसीलदार चंद्रसेन पवार यांची पनवेलचे नायब तहसीलदार (महसूल) म्हणून बदली झाली. पवार यांनी आपल्या पदाचा अतिरिक्त कार्यभार खालापूरचे निवडणूक नायब तहसीलदार नंदकुमार बडे यांना सुपूर्द केला.

मातृमंदिरतर्फे ‘शेवगा’ कलमे
देवरुख, ९ जून/वार्ताहर

मान्सूनच्या पावसाला चांगली सुरुवात होताच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, वेळेवर सुरू झालेल्या पावसाचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी बागायतदार लागवडीसाठी पुढे सरसावले आहेत. देवरुखच्या मातृमंदिर संस्थेने यावर्षी आंबा, काजू व नारळाच्या कलमांसमवेत शेवग्याच्या शेंगांची कलमेही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करून दिली. उन्हाळी भाजीपाला, हायब्रीड बियाणी, शेतीपासून कंदपिकांच्या लागवडीचे अनेक प्रयोग संस्थेने यशस्वी केले आहेत. शेवगा उत्पादन हा त्याचाच एक भाग म्हणून प्रयोगासाठी निवडण्यात आले आहे. शेवग्याची ‘पीएमके-१’ ही विशिष्ट जात संस्थेतर्फे कलमांच्या माध्यमातून विकसित करण्यात आली आहे. या जातीची शेवग्याची शेंग अडीच फूट लांबीची असून, चवीला गोड असते. वर्षातून दोन वेळा हे कलम भरघोस उत्पादन देते. कोकणामध्ये भाजीपाल्यामध्ये शेवग्याच्या शेंगेला (डांबा) मोठी मागणी असते. त्यामुळेच शेवगा लागवडीला प्रश्नेत्साहन देण्यासाठी शेवग्याच्या कलमांची मुबलक तैनात संस्थेच्या रोपवाटिकेत करण्यात आली आहे. मातृमंदिरतर्फे साडवली शेतीफार्मवर पॉली हाऊसमध्ये तीन हजार ‘जरबेरा’ कलमांची लागवड करण्यात आली आहे. फळफळावळीसह असंख्य शोभेच्या फुलांची कलमेही संस्थेने किफायतशीर दरात उपलब्ध केली आहेत. लाखो कलमे बहुतांशी मोफत, तर अत्यल्प दराने संस्थेने शेतकऱ्यांना वितरित केली आहेत. या उपक्रमाची दखल घेऊन मातृमंदिरला ‘उद्यान पंडित’ हा बहुमानाचा पुरस्कारही मिळाला आहे.

पत्रकारांना आवाहन
चिपळूण, ९ जून/वार्ताहर

मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या अभिव्यक्ती समर्थन या पत्रकार संघटनेने सदस्यत्वासाठी पत्रकारांना आवाहन केले आहे. विधिमंडळ स्तरावर काम करणाऱ्या मुंबईतील समर्थन या संस्थेने राज्यभरातील पत्रकारांमधून गेल्या १० वर्षात मानवी हक्क वार्ता पुरस्काराने गौरविलेल्या पत्रकारांनी दोन वर्षापूर्वी अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेची स्थापना केली. महाराष्ट्रातील २० जिल्ह्यात संघटना कार्यरत आहे. संघटनेने शोषित, पीडित, मागास, दलित वर्गाचे प्रश्न धसास लावले आहेत. या संघटनेचे काम रत्नागिरी जिल्ह्यातही सुरू आहे. संघटनेतर्फे वर्षभरापूर्वी जिल्हास्तरीय कार्यशाळा घेऊन नवीन विषय पत्रकारांसमोर मांडण्यात आले. स्थानिक समस्या व प्रश्नांना वाचा फोडण्यात आली आहे. आता साऱ्या जिल्ह्यात संघटन निर्माण करण्यासाठी सदस्य मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक, मुक्त आणि दूरचित्रवाणीतील पत्रकारांनी संजय सुर्वे, प्रदेश सहचिटणीस संदेश पवार यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदस्य मोहिमेनंतर महिनाभरात नूतन जिल्हा व तालुकानिहाय कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.

युवा धोरण माहिती परिषद
चिपळूण, ९ जून/वार्ताहर

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात १२ जून रोजी राज्य युवा धोरण माहिती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत खा. सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील युवकांसोबत संवाद साधणार आहेत. राज्य सरकारने अद्याप अधिकृत युवा धोरण जाहीर केले नाही. सरकारने हे धोरण जाहीर करावे आणि १३ ते ३५ वयोगटातील युवकांसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे युवा धोरण जाहीरनामा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गत राज्याच्या युवा धोरणाचा आदर्शवत आराखडा व मसुदा प्रतिष्ठानतर्फे सरकारला सुपूर्द करण्यात येणार आहे. यासाठी प्रतिष्ठानने युवा धोरण मसुदा समिती स्थापन केली आहे. समितीचे सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत. राज्यातील वेगवेगळ्या विभागांमधून शेकडो युवक-युवती या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमात कोरो, युवा नवनिर्माण संस्था, सीवायडीए, टीआयएसएस, अनुभव शिक्षा केंद्र आदी संस्था, संघटना सहभागी होत आहेत. राज्यातील विविध भागातील युवकांनी या परिषदेस मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विभागीय समन्वयक अमित सावंत व संघटक अभिजीत खानविलकर यांनी केले आहे.

कलिंगडांच्या तपासणीसाठी कृषी पथक आज रानगावमध्ये
नालासोपारा, ९ जून/वार्ताहर

‘वसई तालुक्यातील रानगावची कलिंगड शेती नष्ट होण्याच्या मार्गावर’ या वृत्ताची दखल कृषी संशोधन केंद्र पालघर व कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यांनी घेतली असून उद्या (बुधवारी) त्यांची तुकडी रानगाव येथे जाणार आहे. रानगावची कलिंगडे प्रसिद्ध आहेत. या कलिंगडांना बाजारात खूप मागणी आहे, पण यंदा कलिंगडप्रेमींना त्यांचा आस्वाद घेता आला नाही. कारण हळदा रोग आल्यामुळे जे पीक आले, ते खाण्याच्या लायकीचे नव्हते. त्यामुळे ऐन मोसमात शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसला. मात्र याची दखल संबंधित स्थानिक खात्यांनी घेतली नाही. त्यामुळे शेतकरी निराश झाले. हे वृत्त आजच्या दै. ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल कृषी संशोधन केंद्र पालघर व कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्यांनी घेतली. उद्या १० रोजी रानगावच्या या शेतीवर जाऊन तेथील माती, पान व फळ यांचे नमुने ते घेणार आहेत व त्यावर संशोधन करणार आहेत, अशी माहिती कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. गुणाजी देसाई व कोकण कृषी विद्यापीठाचे ठाण्याचे कार्यकारी परिषद सदस्य मिलिंद पाटील यांनी दिली.

हागणदारी मुक्ततेविरोधातच खोपोली न.पा.ची कृती
खोपोली, ९ जून/वार्ताहर

‘हागणदारी मुक्तता’ या उपक्रमाच्या विरोधात खोपोली न. पा. प्रशासनाची कृती निदर्शनास आल्यामुळे सुभाषनगर परिसराबरोबरच आता मोगलवाडी परिसरातील नागरिकही तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. सुभाषनगर परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी चार सीटऐवजी दहा सीटची शौचालये उपलब्ध करून देण्याची घोषणा सहा महिन्यांपूर्वी करण्यात आली. पर्यायी व्यवस्था न करताच अस्तित्वात असलेली चार सीटची सार्वजनिक शौचालये जमिनदोस्त करण्यात आली. आजमितीस सहा महिने झाले, शौचालयांच्या बांधकामाचा पत्ता नाही. परिसरातील सुमारे दोन हजार नागरिकांना शौचालयासाठी उघडय़ा परिसराचा आधार घ्यावा लागत असून, प्रश्नधान्याने महिला वर्गाची त्यामुळे मोठी कुचंबणा होत असते. सुभाषनगरचे प्रकरण ताजे असतानाच आता न.पा. प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या दबावापोटी मोगलवाडी परिसरातील चार सीटची सार्वजनिक शौचालये जमिनदोस्त केली असून, लवकरच १० सीटची शौचालये बांधून देण्याची घोषणा केली आहे. पावसाळा कोणत्याही क्षणी सुरू होण्याची परिस्थिती असताना व पर्यायी व्यवस्था न करताच अस्तित्वात असलेली शौचालये पाडण्यात आल्यामुळे प्रभाग क्र. २५ व २६ मधील सुमारे १५०० नागरिकांना आता शौचविधीसाठी उघडय़ावर जावे लागते. त्यामुळेच सुभाषनगर परिसर हागणदारी परिसर होऊन बसला आहे. आता मोगलवाडीही हागणदारी परिसर करण्याचा घाट घालण्यात आला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

इचलकरंजी अर्बन बँकेच्या संचालकांनी कर्जवसुलीसाठी उद्योजकाला कोंडले
इचलकरंजी, ९ जून/वार्ताहर

बडय़ा कर्जदारांच्या थकबाकीमुळे त्रस्त झालेल्या इचलकरंजी अर्बन सहकारी बँकेच्या संचालक व कर्मचाऱ्यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांचे भागीदार व सोलापूरचे वस्त्र उद्योजक शिवराम बाहेती यांना दिवसभर मुख्य कार्यालयात कर्जवसुलीसाठी कोंडून ठेवले. व्यवस्थापनाने कर्जवसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेताना अधिवेशन काळात आमदार मधुकर पिचड यांच्या मुंबईतील निवासस्थानी चार कोटी रुपयांचे कर्ज वसूल होण्यासाठी शंखध्वनी करण्याचा निर्णय जाहीर केला. माजी मंत्री मधुकर पिचड, त्यांचे पुत्र, कुटुंबीय व बाहेती यांच्या नावाच्या सहा विविध फर्मसाठी अर्बन बँकेने २००६ साली चार कोटी ५५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. वैभव मधुकर पिचड, जितेंद्र पिचड, हेमलता मधुकर पिचड, हेमंत पिचड या चालकांकडे, तसेच त्यांचे भागीदार श्रीकांत बाहेती यांची दोन फम्र्स अशा सर्व फम्र्सचे मार्च २००९ अखेर चार कोटी १० लाखांचे कर्ज थकबाकी आहे.

रखडलेल्या जादूटोणाविरोधी विधेयकासाठी आज सत्याग्रह
सातारा, ९ जून / प्रतिनिधी

गेली दहा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार जादूटोणा प्रतिबंधक कायदा करण्याची इच्छाशक्ती दाखवत नाही इतके ते निर्लज्ज आहेत, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सांगितले. बुधवारी १० जूनला मुंबईतील आझाद मैदानावर त्यासाठी सत्याग्रह होणार आहे.