Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

क्रीडा

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत नानाओचे पदक निश्चित
विजेंदरसिंग उपान्त्यपूर्व फेरीत
नवी दिल्ली, ९ जून/पीटीआय
भारताच्या थोकचोम नानाओसिंग याने आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळवित पदक निश्चित केले, तर ऑलिंपिक ब्रॉन्झपदक विजेत्या विजेंदरसिंगने उपान्त्यपूर्व फेरी गाठली. ही स्पर्धा झुहाई (चीन) येथे सुरू आहे. युवा गटात जागतिक स्पर्धा जिंकणाऱ्या नानाओसिंगने ४८ किलो गटात चीन-तैपेईच्या लुआन लुई याच्यावर मात केली. चुरशीची ही लढत त्याने ८-४ अशा गुणांनी जिंकली. पहिल्या तीन मिनिटांमध्ये तो पिछाडीवर होता. मात्र नंतरच्या दोन फेऱ्यांमध्ये त्याने जोरदार ठोशांचा उपयोग करीत विजयश्री खेचून आणली.

श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सने विजय
ऑस्ट्रेलियाचे पॅकअप
ट्रेन्ट ब्रिज, ९ जून/ पीटीआय
अजंथा मेंडिस आणि लसिथ मलिंगाचे प्रत्येकी तीन विकेट्स आणि सलामीवीर तिलकरत्ने दिलशान आणि कर्णधार कुमार संगकारा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सलामीची लढत सहा विकेट्सने जिंकून ऑस्ट्रेलियाचे ‘पॅकअप’ केले आहे. साखळी सामन्यातील दोन्हीही लढतीमध्ये पराभव झाल्याने ऑस्ट्रेलियाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. नाबाद अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संगकाराला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

आर्यलडविरुद्ध भारतीय संघ
गोलंदाजीवर तोडगा शोधणार
ट्रेन्ट ब्रिज, ९ जून/ पीटीआय

भारतीय संघाने ‘सुपर एट’ गटातील आपले स्थान पक्के केले असल्याने उद्या ‘अ’ गटातील आर्यलडविरुद्धच्या शेवटच्या लढतीत आपल्या गोलंदाजीतील समस्यांवर तोडगा शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. फलंदाजी हे भारताचे बलस्थान असून, धावांचा डोंगर उभा करण्याची किंवा कुठल्याही आव्हानाचा सामना करण्याची ताकद त्यांच्या फलंदाजीत आहे. स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग जायबंदी असूनही ते ही करामत करू शकतात.

पाकिस्तानचे ऐटीत ‘सुपर एट’; नेदरलॅण्ड्स बाहेर
लंडन, ९ जून / पीटीआय

इंग्लंडविरुद्ध पराभूत झाल्यानंतर ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या ‘सुपर एट’ साठी झगडत असलेल्या पाकिस्तानने अखेर नेदरलॅण्ड्सला ८२ धावांनी पराभूत करीत आपले स्वप्न पूर्ण केले. शाहिद आफ्रिदीने ११ धावांत घेतलेले चार बळी तसेच सईद अजमलच्या २० धावांतील तीन बळींमुळे पाकिस्तानने आपला विजय सहजसाध्य केला.

ज्युनिअर विश्वचषक हॉकी: न्यूझीलंडने भारताला बरोबरीत रोखले
सिंगापूर, ९ जून/पीटीआय

भारताने गोल करण्याच्या अनेक संधी दवडल्या, त्यामुळेच कनिष्ठ गटाच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत त्यांना न्यूझीलंडविरुद्ध २-२ अशी बरोबरी स्वीकारावी लागली. सेंगकांग क्रीडासंकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत न्यूझीलंडने मध्यंतराला २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यांनी हे गोल खुल्या संधीचा फायदा घेत केले. मात्र भारतास तशी संधी मिळूनही त्याचा लाभ घेता आला नाही. काल भारताने सिंगापूरविरुद्ध १०-० असा दणदणीत विजय मिळविला होता. या सामन्यात त्यांनी दाखविलेला अव्वल दर्जाचा खेळ आज त्यांना करता आला नाही.

सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा : श्रीधर मुख्य फेरीत; आनंद पवार पराभूत
नवी दिल्ली, ९ जून/पीटीआय

ऑलिम्पिकपटू अनुप श्रीधर याने सिंगापूर खुल्या बॅडिमटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविले, मात्र त्याचा सहकारी आनंद पवार याला पात्रता फेरीतच पराभव स्वीकारावा लागला. ही स्पर्धा सिंगापूर येथे सुरू आहे. पात्रता फेरीतील चुरशीच्या सामन्यात श्रीधरने चीनच्या यानबो क्वियू याला

संतोष कुमार घोष ओपन ट्वेण्टी-२०: काऊंटी क्रिकेट क्लबला विजेतेपद
मुंबई, ९ जून / क्री. प्र.

काऊंटी क्रिकेट क्लबने संतोष कुमार घोष ओपन ट्वेण्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविताना मुंबई पोलीस संघावर सात धावांनी सनसनाटी विजय मिळविला आणि ट्रॉफी, तसेच ७५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकाविले. उपविजेत्या मुंबई पोलीस संघाला मात्र ३३ हजार रुपयांच्या पारितोषिकावर समाधान मानावे लागले.

विश्वनाथन आनंदने लेकोविरुद्धची लढत जिंकली
मिसकोल्क (हंगेरी), ९ जून / पीटीआय

अखेरच्या दिवशी दोन्ही डाव बरोबरीत सोडवून भारताचा ग्रॅण्डमास्टर आणि विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने हंगेरीच्या पीटर लेकोला ५-३ अशा फरकाने पराभूत करीत रॅपिड बुद्धिबळाची ही लढत जिंकली. दोन्ही खेळाडूंमधील हे अखेरचे दोन डाव अटीतटीचे झाले. मात्र दोन्ही डाव शेवटी बरोबरीत सुटले. या सामन्यात भारताच्या आनंदने दोन डाव जिंकले होते तर सहा डाव त्याने बरोबरीत सोडविले. आनंदने आपली विजयाची मालिका कायम राखली आहे. क्रामनिकविरुद्ध जर्मनीतील बॉन येथे झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत आनंदने विजय मिळविला होता. त्यानंतर आता लेकोविरुद्धची लढत त्याने जिंकली आहे. लेकोसाठी मात्र हा सलग तिसरा पराभव आहे. २००६मध्ये अनातोली कारपोव्हविरुद्ध त्याने विजय मिळविला होता, पण त्यानंतर मात्र तो विजयाच्या प्रतीक्षेतच आहे.२००७मध्ये तो व्लादिमिर क्रामनिककडून पराभूत झाला होता तर २००८मध्ये नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने त्याला पराभूत केले होते.

रिआल माद्रिद मोजणार तब्बल नऊ कोटी डॉलर
काका बनला ट्रान्सफरमध्ये सर्वाचा ‘बाप’
माद्रिद, ९ जून / एपी

एसी मिलानचा स्टार खेळाडू व ब्राझीलचा तारा काका आता रिआल माद्रिद संघातून खेळणार असून त्यासाठी रिआल माद्रिद संघाने प्रचंड मोठी रक्कम मोजली आहे. मात्र ही रक्कम कोटय़वधी डॉलरच्या घरात असल्याचे समजते. जवळपास ६५ दशलक्ष पौंड (नऊ कोटी दोन लाख डॉलर) इतकी रक्कम काकासाठी माद्रिद संघ खर्च करील अशी अपेक्षा आहे. झिनेदिन झिदान या फ्रान्सच्या खेळाडूसाठी माद्रिदने २००१मध्ये सहा कोटी पाच लाख डॉलर इतकी रक्कम मोजली होती. त्यापेक्षा काका सरस ठरण्याची शक्यता आहे.स्वत: काकाने पत्रकार परिषदेत आपण रिआल माद्रिदकडून खेळणार असल्याचे सांगितले.

लाल मातीतील विजय ‘स्पेशल’- पेस
मुंबई, ९ जून/ क्री. प्र.

लाल मातीत खेळविण्यात येणारा फ्रेंच ओपनमधील विजय हा माझ्यासाठी ‘स्पेशल’ आहे, असे मत भारताचा आघाडीचा टेनिसपटू लिएंडर पेसने भारतात परतल्यावर व्यक्त केले आहे. पेसचे हे तिसरे फ्रेंच ओपनचे जेतेपद असून त्याने यावेळी हे जेतेपद त्याचा झेक प्रजासत्ताकचा सहकारी लूकास ड्लोहीबरोबर जिंकले आहे. तर पेस-ड्लोही जोडीचे हे पहिले गॅ्रण्ड स्लॅम जेतेपद आहे. फ्रेंच ओपनच्या जेतेपदाचे श्रेय पेसने कठोर मेहनत आणि फिटनेसला दिले आहे. हे माझ्या कारकिर्दीतले तिसरे फ्रेंच ओपनमधले जेतेपद असल्याने ते माझ्यासाठी ‘स्पेशल’ आहे. त्याचबरोबर कोलकोता येथे गवतावर खेळून मी मोठा झालो असून या लाल मातीतील विजयाचा आनंद माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. गवतापेक्षा लाल मातीमध्ये खेळताना जास्त स्टॅमिना लागतो. त्यामुळे यावेळी फिटनेसवर आम्ही जास्त भर दिला होता आणि त्यासाठी चांगलाच घाम देखील गाळला होता, असे पेसने सांगितले. पेस-ड्लोही जोडीने डिक नॉर्मन आणि वेस्ले मूडी यांचा ३-६, ६-३ आणि ६-२ असा पराभव करूनजेतेपद पटकाविले होते.

इंग्लिश प्रसारमाध्यमांनी उडविली कांगारुंची खिल्ली
लंडन, ९ जून / एएफपी

रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियन संघाला प्रश्नथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागल्यामुळे इंग्लिश प्रसारमाध्यमांनी कांगारुंची खिल्ली उडविली आहे. ‘आयर्लंडनेही ‘सुपर एट’ फेरीत स्थान मिळविले, पण ऑस्ट्रेलियाला ते जमले नाही,’ अशी शब्दांत ‘द सन’ या वर्तमानपत्राने ऑस्ट्रेलियन संघाची चेष्टा केली आहे. डेली मिररला तर चिंता लागून राहिली आहे. त्यांनी चिमटा काढणारा सवाल उपस्थित केला आहे की, ऑस्ट्रेलियन संघ आता काय करणार? प्रेक्षकाची भूमिका बजावणार का? एका समालोचकाने लिहिले आहे की, इंग्लंडमध्ये १२ दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियन संघ दाखल झाल्यापासून सारे काही ठरल्याप्रमाणे होते आहे..इंग्लंडच्या योजनेप्रमाणे. पुढील महिन्यापासून पाच कसोटी सामन्यांच्या प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात होत असून ऑस्ट्रेलियाचा संघ ही मालिकाजिंकण्याचा कसोशीने प्रयत्न करणार आहे. डेली एक्स्प्रेसने ऑस्ट्रेलियन संघाला वेळ घालविण्यासाठी काही उपाय सुचविले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आता थीम पार्कला किंवा लंडन आयला भेट द्यावी. भरपूर नेट प्रॅक्टिस करण्याचीही त्यांना संधी आहे.

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर
पुणे ९ जून/क्री. प्र.

गोंडा (उत्तर प्रदेश) येथे ११ ते १४ जून दरम्यान होणाऱ्या कुमारांच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र संघ-: ५० किलो- शरद पवार (लातूर), तुकाराम कांबळे (पुणे), ५५ किलो-शिवशंकर भावळे (कोल्हापूर), बळीराम यादव (मुंबई), ६० किलो- अमोल पाटील (जळगाव), युवराज पाटील (कोल्हापूर), ६६ किलो- सागर पाटील (कोल्हापूर), अभिषेक तुरकेवाडकर (मुंबई), ७४ किलो- भरत लिम्हण (पुणे), किसन शेळके (पुणे), ८४ किलो- विवेक यादव (मुंबई) महेश वरुटे (कोल्हापूर), ९६ किलो- सचिन मोहोळ (पुणे), ज्ञानेश्वर गोचडे (पुणे), ९६ किलोवरील- विनायक काकडे (पुणे), पंकज हारगुडे (पुणे), मुली-५१ किलो- देवकी रजपूत (मुंबई), ५५ किलो- पुष्पा मोरे (कोल्हापूर), ५९ किलो- पूजा परिट (अहमदनगर), ६३ किलो- शीतल टिंगरे (पुणे), ६७ किलो- रेश्मा कदम (सातारा) प्रशिक्षक- हर्षनंद भक्त (जालना), संदीप पठारे (अहमदनगर), श्याम काबुलीवाले (जालना),