Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

महामार्गावर भंगारमाफियांची लूटमार !
ट्रक-कंटेनरमधील मालावर डल्ला
शशिकांत कोठेकर
महामार्गावरून जाणाऱ्या ट्रक, कंटेनरमधील माल चोरून त्यातील सामानाची विक्री करणाऱ्या काही टोळ्या राजरोसपणे ठाणे जिल्ह्यातील महामार्गावर अद्यापही कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. ठाणे जिल्ह्यातून अहमदाबाद, आग्रा, कल्याण-नगर, पनवेल असे अनेक महत्त्वाचे महामार्ग जातात. या महामार्गावरून प्रवास करणारे ट्रकवाले रात्री विश्रांतीसाठी ढाब्यांवर थांबतात. ट्रक ढाब्यावर थांबले की, त्या ट्रकमधील सामानाची चोरी करायची, कंटेनर फोडायचा आणि त्यातील सामान चोरून पसार व्हायचे, एखाद्या ट्रकचालकाने चोरी थांबवायचा प्रयत्न केला तर, त्याला दमदाटी करून प्रसंगी मारहाण करून चोरी करायची असे प्रकार महामार्गावर होऊ लागले आहेत.

पालिका, रहिवाशांचा विरोध झुगारून हाजुरीत अनधिकृत बांधकाम
ठाणे/प्रतिनिधी

स्थानिक रहिवासी आणि महापालिकेचा विरोध झुगारून एका बिल्डरने हाजुरीत अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे. पोलीस आणि न्यायालय अशा दोन्ही पातळीवर या बिल्डरचे ‘उद्योग’ रोखण्याचा प्रयत्न करूनही तो ऐकत नसल्याने पालिकाही हवालदिल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हाजुरी रोड, मर्फी कंपनीजवळ, श्रीष को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी असून, तेथे सोसायटीच्या जागेत मे. वरद वास्तू कन्स्ट्रक्शन या बिल्डरने अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे.

१९ कोटीची उपकर थकबाकी ठाणे जिल्ह्याला मिळणार
ठाणे/प्रतिनिधी : जिल्ह्यातून घेतलेल्या पाण्यापोटी देय असलेली उपकराची १९ कोटींची थकबाकी लवकरात लवकर जिल्ह्यातील संबंधित संस्थांना देण्याची ग्वाही जलसंपदामंत्री अजित पवार यांनी दिली आहे. जिल्ह्यातील विविध धरणांमधून उचललेले पाणी लोकांना विकून श्रीमंत झालेल्या मुंबई महापालिका, एमआयडीसी आणि जलसंपदा विभाग यासारख्या संस्थांनी ठाणे जिल्हा परिषदेस देय असलेले उपकरापोटीचे ३० कोटी रुपये थकविले आहेत. यासंदर्भात ‘जिल्हा परिषदेच्या ३० कोटींवर बीएमसी जलसंपदा विभागाचा डल्ला’ या मथळ्याखाली ‘लोकसत्ता’त सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते.

स्वच्छतागृहांच्या ‘भ्रष्ट मैला’ मुळे शिवसैनिक संतप्त
अर्धवट कामांमुळे अधिकाऱ्यांनी घेतला धसका
ठाणे/प्रतिनिधी
निर्मल एम.एम.आर. अभियानांतर्गत ठाणे महापालिका हद्दीत बांधण्यात येणाऱ्या वस्ती स्वच्छतागृहांसाठी मंजूर झालेल्या निधीमधील करोडो रुपयांचा मलिदा हडप करण्याचा प्रयत्न उघड झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. या आर्थिक पिळवणुकीबाबत शिवसेनेचे स्थानिक नेते अवगत असताना शाखाप्रमुखांची फसवणूक कशी काय करण्यात आली, याची खमंग चर्चा शाखा-शाखांमधून ऐकायला येत आहे, तर पावसाळ्याच्या तोंडावर अर्धवट राहिलेली कामे आणि त्यांच्या गुणवत्तेबाबत पालिका अधिकाऱ्यांना चिंता भेडसावू लागली आहे.

सावित्रीबाई फुले नाटय़गृहात दरवळला युगुलगीतांचा गंध
डोंबिवली/प्रतिनिधी - षड्ज पंचम संस्थेच्या माहेरतर्फे सावित्रीबाई फुले रंगमंदिरात वटपौर्णिमेनिमित्त ‘गंध फुलांचा’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. डोंबिवलीकर रसिकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये नवदाम्पत्य, मध्यमवयीन, वृद्धत्वाकडे झुकलेली जोडपी उपस्थित होती. या कार्यक्रमात सारेगमपमधील अजित परब, अमृता नातू, आनंदी जोशी आणि अभिजीत राणे सहभागी झाले होते. माहेर संस्थेच्या संचालिका अलका घाणेकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. या प्रेम, लग्न, मधुचंद्र या सगळ्या वातावरणाला बहर आणण्याचे काम निवेदिका समीरा गुजर आणि हेमंत बर्वे यांनी केले. या दोघांनी उपस्थित दाम्पत्यांना चिमटे काढत, प्रेमाचे जुने दिवस कसे असतात, कसे होते आणि त्यांनी काय केले, हे सांगत उपस्थितांना हसविले आणि कार्यक्रमाची रंगत वाढविली. गायकांनी ‘नवीन आज चंद्रमा’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘संधिकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा,’ ‘धुंद एकांत हा’, ‘एक लाजरा न साजरा मुखडा’, ‘शुक्रतारा मंद वारा’ आदी गाणी गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले.

प्रलंबित मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
ठाणे/ प्रतिनिधी

महाराष्ट्रातील चारही वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या नेतृत्वाखाली १० आणि ११ जून रोजी विविध ठिकाणी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवार १० जून रोजी ठाणे जिल्ह्य़ातील कळवा सबस्टेशनसमोर, तर ११ जून रोजी कल्याण येथील तेजश्री इमारतीतील विभाग कार्यालयासमोर कर्मचारी धरणे धरणार आहेत. वाशी, पनवेल, भांडूप येथील कार्यालयासमोरही आंदोलन केले जाणार आहे.१ एप्रिल २००८ पासून पगारवाढीचा करार व्हावा म्हणून पाठपुरावा करूनही दिरंगाई केली जात आहे. निवृत्तीवेतनाचा प्रश्न सोडविण्याऐवजी त्यात नाहक गुंतागुंत केली जात आहे. कामगारांची भरती, बढती, शैक्षणिक पात्रता याविषयी कामगार संघटनांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आक्षेप आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या अवलंबिताना नोकरी देणे, त्यांच्या राहत्या ठिकाणी बदल्या करणे आदी विविध मागण्यांचा पाठपुरावा संघटना शासनाकडे करीत आहे. याविषयी ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

बारावीत महेश अय्यरचे सुयश
डोंबिवली/वार्ताहर

मॉडेल कॉलेजचा विद्यार्थी महेश रामकृष्णन् अय्यर हा बारावी परीक्षेत वाणिज्य शाखेतून डोंबिवलीत पहिला तर ठाणे जिल्ह्यातून दुसरा आला. त्याला ९० टक्के गुण मिळाले. जुनी डोंबिवली येथील श्री महाराजा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महेशची सी. ए. होण्याची इच्छा आहे. त्याचे वडील रामकृष्णन् शीप ब्रेकिंग इंडस्ट्रीज या चौधरी ग्रुपच्या कंपनीत कार्यरत आहेत. त्याच्या या यशाबद्दल जुन्या डोंबिवलीतील नगरसेवक विश्वनाथ राणे, सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत, रमाकांत पेडणेकर, अजय पांचाळ, आशीर्वाद मित्र मंडळाचे शाम ढवळ, लोकसेवा समितीचे आत्माराम नाटेकर तसेच अनेक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्या घरी जाऊन महेशचे अभिनंदन केले.

कल्याणचा तेजस समेळ होणार उपजिल्हाधिकारी
कल्याण प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तेजस किरण समेळ (२९) यांनी महाराष्ट्रातून १२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे.गेल्या तीन वर्षांंपूर्वी तेजसने लोकसेवा आयोगाची शासनाच्या वर्ग १ व वर्ग २ पदासाठीची परीक्षा दिली होती. यामध्ये उपजिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस अधीक्षक आदी पदांचा समावेश होता. तेजसला जनतेची सेवा करण्याची खूप इच्छा होती. त्यासाठी उपजिल्हाधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. या पदीच नियुक्ती झाल्याने त्याचे स्वप्न साकार झाले आहे.परीक्षेसाठी तेजसने भूगोल व सामान्य प्रशासन हे विषय निवडले होते. पुणे येथे खासगी शिकवणी वर्ग लावले होते. घरातूनही आपणास या सेवेसाठी पाठिंबा मिळाला आहे. महाराष्ट्रात आपण कोठेही सेवा देण्यास तयार आहोत, असे तेजसने सांगितले. तेजसचे वडील किरण समेळ हे माजी नगरसेवक आहेत.

सत्ताधारी आदर्श पॅनेलने मारली बाजी
बदलापूर/वार्ताहर : येथील आदर्श विद्या प्रसारक संस्थेच्या त्रवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी आदर्श पॅनेलने बाजी मारली. मात्र विरोधी परिवर्तन पॅनेलचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. संस्थेची त्रवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली.आदर्श पॅनेलचे विजयी उमेदवार- जनार्दन घोरपडे, तुषार आपटे, संजय गायकवाड, पांडुरंग कोशिंबे, दीपक काटदरे, रघुनाथ पाटील, यशवंत वैद्य, उदय केळकर आणि उदय कोतवाल. परिवर्तन पॅनेल- मनोहर आंबवणे, श्रीकांत जोशी.रमेश बुटेरे आणि सुरेश ब्रह्मपुरीकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

अ‍ॅड. राजन ठाणगे यांचा मनसेत प्रवेश
बदलापूर/वार्ताहर : गेल्या सुमारे २२ वर्षांंपासून शिवसेनेत सक्रीय असलेले आणि सावरा ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अ‍ॅड. राजन ठाणगे यांनी अलिकडेच शिवसेनेचा त्याग करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसेचे ज्येष्ठ नेते सतीश प्रधान यांच्या कार्यालयात जाऊन अ‍ॅड. ठाणगे यांनी मनसेत प्रवेश केला. बदलापूर शहर अध्यक्ष विकास गुप्ते, तसेच ठाण्याचे राजन गावंड, राजन राजे, डी. के. म्हात्रे आदी याप्रसंगी उपस्थित होते. ग्रामीण भागात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केले तथापि गेल्या काही दिवसांपासून मुख्य प्रक्रियेतून डावलले गेल्याची खंत सहन न झाल्यामुळेच अ‍ॅड. ठाणगे मनसेत दाखल झाल्याचे समजते.

ग्रंथायनतर्फे स्पर्धेचा निकाल जाहीर
ठाणे : ग्रंथायनतर्फे मुंबई व बाहेरील नवोदित लेखकांसाठी कादंबरी- कथा- कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून ग्रंथायनने निकालासाठी नामवंत परीक्षकांची टीम निवडली होती. या स्पर्धेत आलेल्या तीन कादंबऱ्यांपैकी एकही बक्षीसपात्र न वाटल्याने त्यांची निवड होऊ शकली नाही. मात्र मधु कुळकर्णी, सावंतवाडी यांच्या कवितेला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. त्याचप्रमाणे आलेल्या कथांमध्ये बऱ्याच कथा व्यक्तिचित्रण व आठवणीवजा लेखासारख्या वाटत होत्या, त्यामुळे रवि सावंत, कोल्हापूर यांच्या कथेला तृतीय क्रमांक व पांडुरंग कांबळे, नाशिक यांच्या कथेला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले