Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

एक्स्प्रेस इन्व्हेस्टिगेशन
‘एनएसजी’पुढे आव्हानांचा डोंगर..
प्रणव धल सामंता, नवी दिल्ली, ९ जून

 

‘ताज’च्या दोन वेगवेगळ्या इमारती आहेत; तसेच प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यापूर्वी ‘नरिमन हाऊस’ भोवतालच्या रहिवासी इमारती रिकाम्या करून घ्याव्या लागतील. त्यासाठी बराच वेळ लागेल याचीही ‘एनएसजी’ला कल्पना नव्हती. प्रत्यक्षात या इमारती रिकाम्या करून घेण्यात, तेथील रहिवाशांना इतरत्र हलविण्यात एक पूर्ण दिवस गेला.
‘एनएसजी’ म्हणजे दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला नेटाने करणारे आपल्या देशातील सर्वात शक्तिशाली, प्रभावी दल.. परंतु मुंबईतील ही कारवाई त्यांनाही कठीण भासत होती. कारण एकच- मिळणारी माहिती त्रोटक स्वरूपाची होती. निश्चित स्वरूपाची नव्हती. माहितीत बऱ्याच त्रुटी होत्या. मुंबई पोलीस, लष्कर, मरिन कमांडोज हे रात्रीपासून वेगवेगळ्या ठिकाणी तैनात असूनसुद्धा ही परिस्थिती होती ही बाब सर्वात धक्कादायक म्हणावी लागेल.
‘एनएसजी’च्या अगतिकतेची ही तर नुसती सुरुवात होती. दहशतवाद्यांबद्दल अद्यावत, संपूर्ण माहिती ‘एनएसजी’ला मिळण्याच्या दृष्टीने समन्वय, माहिती आदान-प्रदान केंद्र उभारण्यात आले नव्हते; तसेच कारवाईसुद्धा संयुक्त स्वरूपाची नव्हती. दहशतवादी गोळीबार करीत हॉटेल इमारतींमध्ये कसे शिरले याची माहिती मुंबई पोलिसांनी ‘एनएसजी’ला दिली. आठ दहशतवादी पाकिस्तानातील आपल्या कर्त्यांधर्त्यांशी कसे संपर्क साधून होते; त्यांच्या संभाषणावर आपण कसे लक्ष ठेवून होतो, तसेच दोन्ही हॉटेल्समध्ये मरिन कमांडो तळमजल्यापर्यंतच पोहोचू शकले; पुढे कसे जाऊ शकले नाहीत याची माहिती गुप्तचर संस्थांनी ‘एनएसजी’ला दिली; परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे दहशतवाद्यांच्या हालचालींसंबंधीची माहिती! आणि नेमकी तीच ‘एनएसजी’ला मिळाली नाही. दहशतवादी नेमके किती आहेत, त्यांचे डावपेच, तसेच इमारतींच्या अंतर्गत रचनेसंबंधीचा तपशील मिळणे आवश्यक होते. ही माहिती मिळाली असती, तर ‘एनएसजी’ला कारवाई करणे सुलभ झाले असते. ‘नरिमन हाऊस’ आणि ‘ताज’पासून केवळ १० मिनिटांच्या अंतरावर कुलाब्यात लष्कराने स्वत:साठी एक मध्यवर्ती कारवाई केंद्र (ऑपरेशन हब) उभारले होते हेसुद्धा नंतर कळले. वास्तविक हेच केंद्र संयुक्त कारवाई आणि माहिती केंद्र म्हणून उपयोगात आणता आले असते; तथापि परस्पर समन्वयाअभावी ते झाले नाही. कळस म्हणजे मरिन कमांडो तैनात करण्यात आले आहेत, तसेच ‘एनएसजी’लासुद्धा पाचारण करण्यात आले आहे याची लष्कराला कल्पनाही नव्हती. या सर्व त्रुटींचा परिणाम म्हणजे ‘एनएसजी’ची कारवाई लांबत गेली. नेमके काय आणि कसे करायचे याचा अंदाज ‘एनएसजी’ला आला नाही. बरेच तास ते दहशतवाद्यांशी लढत राहिले. हा केवळ उंदीर-मांजराचा लपंडाव होता म्हणा ना! ‘ताज’च्या दोन्ही भागांमध्ये कारवाई करताना फक्त एकच इलेक्ट्रॉनिक ‘मास्टर-की’ (सर्व खोल्या उघडता येऊ शकतील अशी गुरुकिल्ली) उपलब्ध होती. अधिक असत्या तर काम लवकर झाले असते. एकच ‘मास्टर-की’ असल्याने काही खोल्यांचे दरवाजे तोडावे लागले. एकटय़ा ‘टॉवर सेक्शन’मध्ये ३२३ खोल्या आहेत. त्याव्यतिरिक्त उपहारगृह, बार, दुकाने वेगळी! प्रत्येक खोली उघडून तपासणे आवश्यक होते. एका खोलीच्या तपासणीसाठी किमान चार ते पाच मिनिटे लागत होती. ‘इलेक्ट्रॉनिक स्वाईप-की’चा दुसरा सेट करून आणता येईल का हे रात्रभर कोणाच्या डोक्यातही आले नाही. शुक्रवार, २८ नोव्हेंबरला सायंकाळी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील ‘वसाबी’ उपहारगृहात आपण सर्व दहशतवाद्यांना एकत्र गाठले आहे, असे ‘एनएसजी’ला वाटले; परंतु हॉटेलच्या अंतर्गत रचनेची माहिती ‘एनएसजी’ला नव्हती. कमांडो पुढे सरकले, तसे उपहारगृहाला लागून असलेल्या नागमोडी वळणाच्या, चक्राकार जिन्याचा आश्रय दहशतवाद्यांनी घेतला. हा जिना खाली ‘हार्बर बार’मध्ये उघडतो. ‘एनएसजी’ला ही माहिती नव्हती. ते उपहारगृहाच्या दिशेने गोळीबार करीतच राहिले. चक्राकार जिना असल्याचे त्यांच्या खूप उशिरा, उपहारगृहाच्या आत अगदी जवळ पोहोचल्यावर लक्षात आले. त्यामुळे अखेरचा हल्ला ‘हार्बर बार’वर करणे क्रमप्रश्नप्त होते. ते अनेक तासांनी शक्य झाले. इकडे ओबेरॉय हॉटेलमध्ये आतील भागांत मोकळा अ‍ॅट्रियम आहे आणि निवासी खोल्या त्यासभोवताल आहेत, तसेच एकीकडच्या प्रत्येक मजल्यावरून समोरच्या भागातील सर्व मजले दिसतात, अशी रचना आहे. ‘अ‍ॅट्रियम’ असल्याचे ‘एनएसजी’ला सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे आत शिरलेल्या ‘एनएसजी’ कमांडोंना त्वरित मागे फिरावे लागले. ‘ओबेरॉय’मधील अंतर्गत रचना दहशतवाद्यांच्या पथ्यावर पडल्यासारखे झाले. फाहदुल्ला आणि अब्दुल रहमान छोटा या दोन दहशतवाद्यांना वरच्या मजल्यांवर जाऊन लपणे शक्य झाले. तेथे पोहोचून हॉटेलमधील लोकांना ओलीस ठेवून पोलीस किंवा ‘एनएसजी’वर गोळीबार करणे सहजशक्य झाले. ‘एनएसजी’ने कारवाई सुरू केली तेव्हा हे दोन दहशतवादी हॉटेलमध्ये एका कोपऱ्यात लपून बसले होते. एक एक खोली उघडून तपासत कमांडो पुढे सरकू लागले; तसा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यामुळे ‘एनएसजी’चे काम अधिक जिकिरीचे होऊन बसले. दहशतवादी त्वरेने पुढच्या मजल्यावर पोहोचून गोळीबार करीत आणि हातबॉम्ब फेकत.
तिसरीकडे ‘नरिमन हाऊस’मधील चित्र आणखी वेगळे होते. ‘नरिमन हाऊस’ ही इमारत लहान आहे, तसेच अडगळीच्या गल्लीत आहे. त्यामुळे ‘एनएसजी’ समोर तेथे अनेक आव्हाने उभी ठाकली. पाच मजली ‘नरिमन हाऊस’च्या भोवती मर्चण्ट हाऊस, बात्रा हाऊस आणि कस्तुरी हाऊस या तीन इमारती आहेत आणि त्या ‘नरिमन हाऊस’ला अगदी लागूनच असल्याने ‘एनएसजी’ची कारवाई सुरू होण्यापूर्वी या तीन इमारती रिकाम्या करून घेणे अनिवार्य होते. आता ‘एनएसजी’ हे दल गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील असले, तरी इमारतींमधील रहिवाशांना अन्यत्र हलवून इमारती रिकाम्या करून घेण्याचा अधिकार या दलाला नाही. पोलिसांना हा अधिकार आहे; पण ‘एनएसजी’ला नाही ही आणखी एक अडचण! या इमारतींमधील रहिवासी तसे खूप समंजस होते, सहकार्य करण्याची त्यांची तयारी होती; परंतु इमारत रिकामी करण्यास ते तयार नव्हते. अखेर पोलिसांना बोलाविण्यात आले. इमारतींमधील रहिवाशांना इतरत्र हलविण्याचा, त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. पोलीस आल्यानंतर आसपासच्या इतर इमारतींमधील रहिवाशांशी चर्चा करण्यात आली. रिकाम्या होणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांना आपल्या इमारतींमध्ये तात्पुरते राहू देण्यास आसपासच्या इतर इमारतींमधील लोक तयार झाले. ही सर्व प्रक्रिया होण्यात एक पूर्ण दिवस गेला. आता ‘नरिमन हाऊस’मध्ये जाऊन कारवाई सुरू करणे दुसऱ्या दिवशीच शक्य होणार होते. दहशतवादी हे पाकिस्तानातील आपल्या ‘कर्त्यांधर्त्यां’शी मोबाईल फोनवरून सतत संपर्क साधून आहेत आणि त्यांचे संभाषण ‘टॅप’ केले जात आहे हे ‘एनएसजी’, गुप्तचर संस्था आणि स्थानिक पोलिसांना चांगले माहिती होते. दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील कर्तेधर्ते भारतीय टी. व्ही. वाहिन्यांवर सर्व घटना पाहात होते आणि त्याबरहुकूम दहशतवाद्यांना माहिती देत होते, सूचना देत होते याचीही पोलीस, गुप्तचर यंत्रणा आणि ‘एनएसजी’ला कल्पना होती. तरीही ‘नरिमन हाऊस’च्या गच्चीवर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे ‘एनएसजी’ कमांडो उतरविण्याचे ठरले, तेव्हा ही कारवाई टी. व्ही. कॅमेऱ्यांना टिपू देऊ नये; असा विचार कोणाच्या डोक्यात आलाच नाही. ‘एनएसजी’ कमांडोंची कारवाई दहशतवाद्यांच्या पाकिस्तानातील सहानुभूतीदारांना, कर्त्यांधर्त्यांना दिसायला नको याचे भान कोणाला राहिले नाही.
‘एनएसजी’ कमांडो भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून ‘नरिमन हाऊस’च्या गच्चीवर उतरल्याचे पाहून पाकिस्तानातील ‘त्या’ लोकांनी दहशतवाद्यांना ती माहिती कळविली आणि काही सूचनाही केल्या. दोन दहशतवादी ‘नरिमन हाऊस’च्या चौथ्या मजल्यावर लपून बसले होते. कमांडो गच्चीवर उतरल्याची माहिती मिळताच दहशतवादी सावरले आणि ‘तयार’ होऊन कमांडोंच्या रस्त्याकडे लक्ष ठेवून बसले. पाचव्या मजल्यावरून कमांडो खाली चौथ्या मजल्यावर उतरताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर जोरदार गोळीबार केला. गजेन्द्रसिंग हा कमांडो दहशतवाद्यांच्या गोळीबारात ठार झाला.
(क्रमश:)