Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

व्यक्तिवेध

ऑस्ट्रेलियातील भारतीय विद्यार्थ्यांवर सातत्याने होत असलेल्या वांशिक हल्ल्यांमुळे, उभय देशांतील उद्विग्न मानस अधिकाधिक अस्वस्थ होत चालले आहे. अशावेळी भारतीय वंशाच्या वरिष्ठ राजनीतिज्ञाला उच्चायुक्त म्हणून भारतात पाठविण्याचा निर्णय घेऊन ऑस्ट्रेलियन सरकारने वातावरणातला तणाव हलका करण्यासाठी एक हळुवार फुंकर मारणारे पाऊल टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री स्टीफन स्मिथ यांनी ही घोषणा केली आहे. पीटर जोसेफ नुझूमरी वर्गिस हे ते अधिकारी होत. पंतप्रधान केव्हिन रूड

 

यांच्या अत्यंत विश्वासातील व्यक्ती म्हणून पीटर वर्गिस यांचा ऑस्ट्रेलियन राजकारणात लौकिक आहे. ओएनए किंवा ऑफिस ऑफ नेट अ‍ॅसेसमेंटस या ऑस्ट्रेलियन केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख म्हणून वर्गिस सध्या काम पहात आहेत. येत्या ऑगस्टमध्ये जॉन मॅकार्थी यांच्याकडून नव्या पदाची सूत्रे ते हाती घेणार आहेत. २००४ साली मॅकार्थी उच्चायुक्त म्हणून भारतात आले होते. पाच वर्षाची कारकीर्द संपवून येत्या ऑगस्टमध्ये ते मायदेशी परत जाणार आहेत. वर्गिस यांचा जन्म १९५६ साली केनियात झालेला असला तरी त्यांचे आईवडील मूळचे भारतीय. केरळमधील मल्याळी समाजाचे. बऱ्याच वर्षापूर्वी ते ऑस्ट्रेलियात येऊन स्थायिक झाले. तिथेच शिक्षण, तिथेच वास्तव्य, तिथेच नोकरी केलेल्या वर्गिस यांनी ऑस्ट्रेलियन परराष्ट्र खात्यात अल्पावधीतच आपला दबदबा निर्माण केला. वर्गिस यांनी क्वीन्सलँड विद्यापीठातून इतिहास या विषयात पदवी घेतल्यानंतर १९८० ते १९८३ या कालावधीत व्हिएन्नामध्ये, ८६ ते ८८ या कालावधीत वॉशिंग्टनमध्ये आणि ९४ च्या सुमारास टोकियोमध्ये काम केले. ऑस्ट्रेलियन परराष्ट्र खात्याला धोरणात्मक आखणी आणि नियोजनविषयक सल्ला देणाऱ्या ऑफिस ऑफ नेट अ‍ॅसेसमेंटचे महासंचालकपद त्यांच्याकडे चालून आले. पंतप्रधान केव्हिन रूड यांना थेट सल्ला देणारे हे पद गुप्तचर सेवेत आणि परराष्ट्र सेवेत अत्यंत महत्वाचे मानले जाते. मे २००६ मध्ये कॅनबेरात झालेल्या सिक्युरिटी इन गव्हर्न्मेंट या परिषदेत ‘इस्लामिक टेररिझम - द इंटरनॅशनल कॉन्टेक्स्ट’ या विषयावर झालेले वर्गिस यांचे भाषण या विषयाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोण देणारे ठरले होते. येते दशकच नव्हे, तर आणखी एका पिढीइतका काळ इस्लामी दहशतवादाचा धोका जगाला जाणवत राहील असे त्यांचे म्हणणे होते. इस्लामी दहशतवादाचा चेहरा अमुक एक प्रकारचा असेल असे सांगता येत नाही; ओसामा बांधकाम व्यवसायातील कोटय़धीशाचा मुलगा होता, अल जवाहिरी वैद्यकीय व्यावसायिक होता, तर अल झरकावी एक अशिक्षित कुख्यात लुटारूच होता. अशा माणसांमध्ये समान सूत्र शोधणे कठीण असते असे वर्गिस यांचे म्हणणे आहे. ऑस्ट्रेलियाच्या कूट राजनीतिज्ञांपैकी एक मानले जाणारे, अत्यंत कुशाग्र बुद्धीचे वर्गिस भारतात येतील ते तीन चार नेमक्या बाबी डोळ्यासमोर धरून. वांशिक हल्ल्यांमुळे ऑस्ट्रेलियातील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांच्या मनामध्ये असलेली अस्वस्थता संपवणे, त्यांना विश्वास प्रश्नप्त करून देणे हे जसे एक मोठे आव्हान वर्गिस यांच्यापुढे आहे, तसेच अमेरिका, जपान, भारत व ऑस्ट्रेलिया या चतुष्कोणातून बाहेर पडून ऑस्ट्रेलिया चीनच्या अधिक जवळ जात असल्याची जी एक जागतिक प्रतिमा निर्माण होते आहे, तिला परस्पर शह देण्याचा एक प्रयत्न ऑस्ट्रेलियाला त्यातून साधायचा आहे. पण याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे अनेकार्थानी भारताशी जे लष्करी स्नेहाचे संबंध आहेत, ते वृद्धिंगत करण्याचाही वर्गिस यांना प्रयत्न करावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियातून जगातील ज्या देशांमध्ये निर्यात होत असते, त्यांच्यात भारताचा चौथा क्रमांक लागतो. ही निर्यात टिकावी, वाढावी, त्यातून ऑस्ट्रेलियाच्या तिजोरीत भर पडावी हा हेतूही समोर आहेच.