Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

ताडोबातील वाघांच्या आकडेवारीचा घोळ
वन्यजीवप्रेमींचा आरोप
चंद्रपूर, ९ जून/ प्रतिनिधी
गेल्या सहा महिन्यात पाच वाघांचा मृत्यू झाला असतानाही ताडोबा-अंधारी प्रकल्पातील वाघांची संख्या ४३ वर स्थिर आहे. चिंता करण्यासारखे काही कारण नाही असे वन खात्याच्या वतीने सांगण्यात येत असल्याने या प्रकल्पातील वाघांच्या आकडेवारीचा घोळ समोर आला आहे. प्रत्यक्षात प्रकल्पात वाघ कमी असून अधिकारीच आकडा वाढवून सांगत असल्याचा आरोप वन्यजीव प्रेमींनी केला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ४ ते ९ मेदरम्यान व्याघ्र गणना पार पडली.

ट्रकची ऑटोला धडक, दोन ठार, सहा जखमी
चंद्रपूर, ९ जून / प्रतिनिधी
गडचांदूर-कोरपना मार्गावर भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन प्रवासी ठार तर सहा गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास सोनुर्ली आसनजवळ घडला. मृतांमध्ये ऑटोचालक फारुख खान रफीक खान (२४) व मधुकर तुराणकर (४२) यांचा समावेश आहे.

‘वन्यजीव रक्षणावर’ चर्चासत्र आणि ‘वाईल्ड वॉच’ची स्थापना
भंडारा, ९ जून / वार्ताहर

जागतिक पर्यावरण दिनाचेनिमित्त साधून ‘भंडारा युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट’द्वारा येथील ज.मु. पटेल महाविद्यालयाच्या ‘एम.बी.ए.’च्या सभागृहात ‘वन्यजीव रक्षण व पर्यावरण’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.चर्चासत्रात नागझिरा अभयारण्याचे अभ्यासक, ‘सखा नागझिरा’ ग्रंथाचे लेखक किरण वसंत पुरंदरे, भंडाऱ्याचे उपवनसंरक्षक यशबीर सिंग, सामाजिक वनीकरण विभाग भंडाराचे उपसंचालक डॉ. एन.डी. चौधरी, ‘कोका-नागझिरा-नवेगावबांध’ची वनसमृद्धी त्याचे प्रतीक वाघ, ध्यानात घेऊन ‘व्याघ्र प्रकल्पाची उभारणी’ या दृष्टीने अभ्यासात संशोधक गौरव पशिने आणि पिटेझरीच्या घनदाट जंगलात वास्तव्यास असलेले,

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी
गडचिरोली, ९ जून / वार्ताहर

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे प्रणेते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी स्थानिक भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.येथील इंदिरा गांधी चौकातून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भडांगे, राज्य समितीचे विश्वस्त डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी केले.

पर्यावरण रक्षणाचे दायित्व गावाने स्वीकारावे -संभाजीराव सरकुंडे
कोरंभी टेकडीत पर्यावरण दिन साजरा
भंडारा, ९ जून / वार्ताहर
पर्यावरण रक्षणाची जबाबदारी गावकऱ्यांनी स्वेच्छेने स्वीकारून जल, जंगल, जमीन वाचवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संभाजीराव सरकुंडे यांनी कोरंभी टेकडी परिसरात आयोजित कार्यक्रमात केले. ग्रीन हेरिटेज बहुउद्देशीय संस्था, ग्रामपंचायत आणि सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने कोरंभीत हा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, संपूर्ण विदर्भाला अभिमान वाटावा इतकी निसर्गरम्य कोरंभी टेकडी, या गावाला वारसा म्हणून मिळाली आहे.

कृषी विद्यापीठ परिसरात बंदूक बाळगणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
अकोला, ९ जून / प्रतिनिधी

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात बंदूक घेऊन फिरणाऱ्याांविरुद्ध सिव्हील लाईन्स पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. लुकस गायकवाड व धमेँद्र बावरी हे खदान परिसरात राहणारे दोघे कृषी विद्यापीठ पसिरात बंदूक घेऊन फिरताना रविवारी आढळले होते. कृषी विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी संशयावरून त्यांना अडवले आणि त्यांच्याजवळील बंदूक जप्त केली. लुकस गायकवाड माजी सैनिक असून, जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुरक्षा रक्षक असल्याचे समजले. तसेच बंदुकीत काडतुसे नसल्याचेही सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. सिव्हील लाईन्स पोलिसांना याविषयी माहिती देण्यात आली. पोलिसांनी सुरक्षा अधिकारी विश्वास मानकर यांच्या तक्रारीवरून सोमवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्याजवळील बंदूक जप्त करून त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटकाही करण्यात आली.

विद्युत पुरवठा खंडित
चंद्रपूर, ९ जून /प्रतिनिधी

वादळामुळे इरई डॅम येथील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे रामनगर, नगीना बाग, मुक्ती कॉलनी, सिव्हिल लाईन, सिस्टर कॉलनी तुकूम वडगांव, दादमहल वॉर्ड, नेहरू नगर, बंगाली कॅम्प, सरकार नगर, बाबुपेठ परिसर तसेच घुटकाळा पाण्याच्या टाकीवरून होणारा विठ्ठल मंदिर, बालाजी वॉर्ड, घुटकाळा, समाधी वॉर्ड पठाणपुरा या परिसरात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तरी नागरिकांनी यांची नोंद घेऊन सहकार्य करावे, अशी विनंती पाणीपुरवठा अभिकर्ता यांच्याकडून करण्यात आली आहे.

हळद ओली असतानाच मृत्यू
चिखली, ९ जून / वार्ताहर

वेगात असलेल्या मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाले. यापैकी एकाचा केवळ चार दिवसापूर्वीच विवाह झाला होता. येथून १६ किलोमीटरवरील अंबाशी येथील दोन मित्र सोमवारी रात्री घरी परतताना १०.३० वाजता च्या दरम्यान मेहकर फाटय़ाजवळील जिजाऊंच्या पुतळ्याजवळ हा अपघात झाला. वाहनचालक प्रदीप वाळेकर (२८) हा घटनास्थळीच ठार झाला. त्यांचा मित्र विजय देशमुख (२६) याला तात्काळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. त्याचाही मृत्यू झाला. विशेष म्हणजे विजय देशमुख याचे चार दिवसापूर्वीच लग्न झाले होते. अंगाची हळद सुकण्यापूर्वीच मृत्यूने घाला घातल्याने परिसरात शोक व्यक्त होत आहे.

लोक न्यायालयात ११ प्रकरणे निकाली
हिंगणघाट, ९ जून / वार्ताहर

येथे नुकत्याच झालेल्या महसूल लोक न्यायालयात ११ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. रवी मद्दलवार होते. या लोक न्यायालयाचे उद्घाटन न्या. राम बोधाने यांनी केले. या महसूल लोक न्यायालयात २९ प्रकरणे मांडण्यात आली होती. यातील बहुतांश प्रकरणे शेतातील रस्त्याची होती. ज्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी अनेक वर्षांंपासून महसूल कार्यालयात हाजरी भरत होते. या २९ पैकी ११ प्रकरणे निकालात निघाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला.यावेळी तहसीलदार मदन खाडिलकर यांनी लोक न्यायालयाच्या माध्यमातून ग्रामीण जनतेने आपली प्रकरणे समझोत्याच्या माध्यमातून सोडवावी, असे आवाहन केले.

विनयभंग प्रकरणी कारावास
चंद्रपूर, ९ जून /प्रतिनिधी

एका विवाहितेचा विनयभंग केल्या प्रकरणी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने अमित शंकर संगीडवार यास साडेसात वष्रे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्ना जोशी यांनी हा निकाल दिला आहे. आरोपी अमित संगीडवार याने एका विवाहितेला आपल्या दुचाकीवर बसवून अंतरगाव निमगाव दरम्यान एका शेतशिवारात नेले व तिचा विनयभंग केला. २४ नोव्हेंबर २००७ रोजीच्या या घटनेसंदर्भात ब्रह्मपुरी पोलिसांनी आरोपी अमित विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्यास अटक केली होती व हे प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते. सदर गुन्ह्य़ाचा तपास एसडीपीओ पराग मनेरे यांनी केला.

कंत्राटदाराच्या घराला आग
बल्लारपूर, ९ जून /वार्ताहर

वातानुकूलित यंत्राचे सर्कीट जळाल्याने घराला आग लागल्याची घटना काल दुपारी ४.३० वाजता पेपरमिलमध्ये लाईन स्कोर कंत्राटदार असलेल्या रघु रेड्डी यांच्या घरी घडली. रविवारी दुपारच्या सुमारास रेड्डी कुटुंबीय झोपले असता दुपारी अचानक वातानुकूलित यंत्राचे सर्कीट जळाल्याने घराला आग लागली. यात १२ लाखाचे नुकसान झाले. या घटनेची माहिती फायर ब्रिगेडला देण्यात आली. मात्र, नगरपालिकेची येथील अग्निशमन गाडी नादुरुस्त असल्याने ती घटनास्थळी पोहचू शकली नाही. शेजाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

प्रा. अनुप्रिता नागपुरे -झाडे यांना पीएच. डी.
चंद्रपूर, ९ जून /प्रतिनिधी

चंद्रपूर अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याता प्रा. अनुप्रिता नागपुरे (झाडे) यांना नुकतीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आचार्य पदवी प्रदान केली आहे. ‘कौमार्यावस्थेतील मुलांची महत्त्वाकांक्षा, अभिवृत्ती, सामाजिक क्षमता, वर्तणूक व कौटुंबिक संबंधाचे सहसंबंधात्मक अध्ययन’ या विषयावर प्रा. नागपुरे यांनी जनता शिक्षण महाविद्यालयाच्या प्रपाठक डॉ. प्रणोती माकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधप्रबंध सादर केला होता. प्रा. नागपुरे यांनी यशाचे श्रेय पती बाबा झाडे, सर्वसेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत चहारे, सचिव प्रा. अनिल शिंदे, प्राचार्य, अधिव्याख्याता यांना दिले आहे. या यशाबद्दल प्रा. नागपुरे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

१४ जूनला खामगावात समूह नृत्य स्पर्धा
खामगाव, ९ जून / वार्ताहर

जिल्ह्य़ातील नृत्य कलावंतांना आपली सुप्तकला सादर करण्याची संधी मिळावी त्याकरिता कामगार कल्याण केंद्राच्यावतीने येत्या १४ जून रोजी जिल्हा समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे संयोजन विदर्भ साहित्य संघ व नाटय़दर्पण संस्था करणार आहे. जिल्ह्य़ातील नृत्य संघानी या स्पर्धेत मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धा कोल्हटकर स्मारक मंदिर येथे होणार आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित गीतावर या स्पर्धा होतील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाला गीताची सी.डी., कॅसेट स्वत: आणावी लागेल. या स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या संघांना कामगार कल्याण केंद्र (सतीफैल), विदर्भ साहित्य संघ व नाटय़ दर्पण संस्थेच्यावतीने रोख रक्कम पुरस्कार व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रथम बक्षीस ३००० रुपये, द्वितीय बक्षीस २००० रुपये, तृतीय बक्षीस ५०० रुपये उत्तेजनार्थ म्हणून देण्यात येणार आहे. इच्छुकांनी १२ जूनपर्यंत आपला प्रवेश नोंदवावा. अधिक माहितीसाठी कामगार कल्याण केंद्र सतीफैल, श्याम कस्तुरे, शेखर कुळकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

औषध विक्रेता संघाचे कार्यालय सुरू
गोंदिया, ९ जून / वार्ताहर

जिल्हा औषध विक्रेता संघ कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम नुकताच पार पडला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय औषध विक्रेता संघाचे राज्याध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अनिल नावंदर, अमरजित सोबती, श्याम कुलधारिया, संजय दुबे, मुकुंद दुबे, संजय खत्री, सुरेश सारडा, अमिन नागाणी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरीच्या तैलचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी बोलताना अनिल नावंदर म्हणाले की, औषध विक्रेत्यांनी व्यवसायात येणाऱ्या समस्यांना कशाप्रकारे सामोरे जावे याविषयी माहिती दिली. प्रास्ताविक संजय दुबे यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. मनोज सांगाणी, अजय अग्रवाल, आत्माराम गंबानी, रूपेश रहांगडाले, भास्कर बुधेकर, सुनील गंगवाणी, मिलन रामटेककर, विवेक सोनछात्रा, अशोक पटले आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन अरुण प्रतापसिंग व उत्पल शर्मा यांनी तर आभार सुशील शर्मा यांनी मानले.

वीज कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला
चंद्रपूर, ९ जून / प्रतिनिधी

येथील शास्त्रीनगरस्थित वीज वितरण कंपनीच्या वसाहतीत राहणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आढळून आला. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. एस.के. कुंजू (५२)असे मृताचे नाव असून त्याला दारूचे व्यसन होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. रामनगर ठाण्यात मृत्यूची नोंद केली आहे.