Leading International Marathi News Daily

बुधवार, १० जून २००९

विविध

गृहमंत्रालयाला हुतात्म्यांची माहिती नसल्याचे उघड
नवी दिल्ली, ९ जून/पीटीआय

गृहमंत्रालयाचा एक संपूर्ण विभाग स्वातंत्र्यसैनिकांची पेन्शन या विषयाला वाहिलेला असतानाही सरकारकडे स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यसैनिक तसेच हुतात्म्यांची र्सवकष यादी उपलब्ध नाही, असे केंद्रीय माहिती आयोगाने म्हटले आहे. मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबिबुल्ला यांनी सांगितले, की ही माहिती देताना आम्हाला वाईट वाटते, पण सरकारकडे अशा हुतात्म्यांची किंवा स्वातंत्र्यसैनिकांची कुठलीही यादी नाही. खरेतर स्वातंत्र्यसैनिकांची पेन्शन या विषयाला वाहिलेला गृहमंत्रालयाचा खास विभाग आहे.

विरोधी बाकांवरून लालूंचे ‘विरहगीत’
मतलब निकल गया है तो..

नवी दिल्ली, ९ जून/खास प्रतिनिधी
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे बघत ‘मतलब निकल गया है तो पहचानते नही,’ या हिंदी चित्रपटातील गीताद्वारेआज लोकसभेत लालूप्रसाद यादव यांनी केंद्रातील सत्तेपासून दूर राहिल्याचा विरह व्यक्त केला. सोनिया आणि मनमोहन सिंग यांच्याविषयी आपल्याला तक्रार नाही, असे सांगतानाच आपण ‘टीटीएम’ (ताबडतोब तेल मालिश) करीत नसल्याचेही स्पष्ट करीत लालूंनी सभागृहातील सदस्यांची हसवणूक केली.

एक्स्प्रेस इन्व्हेस्टिगेशन
‘एनएसजी’पुढे आव्हानांचा डोंगर..

प्रणव धल सामंता, नवी दिल्ली, ९ जून

‘ताज’च्या दोन वेगवेगळ्या इमारती आहेत; तसेच प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यापूर्वी ‘नरिमन हाऊस’ भोवतालच्या रहिवासी इमारती रिकाम्या करून घ्याव्या लागतील. त्यासाठी बराच वेळ लागेल याचीही ‘एनएसजी’ला कल्पना नव्हती. प्रत्यक्षात या इमारती रिकाम्या करून घेण्यात, तेथील रहिवाशांना इतरत्र हलविण्यात एक पूर्ण दिवस गेला. ‘एनएसजी’ म्हणजे दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला नेटाने करणारे आपल्या देशातील सर्वात शक्तिशाली, प्रभावी दल..

लष्करातील तोफखान्यासाठी आता संगणक संचालित नियंत्रण प्रणाली..
नवी दिल्ली, ९ जून/पी.टी.आय.
लष्करातील संपूर्ण तोफखान्याचे एकत्र नियंत्रण करण्यासाठी संगणक संचालित प्रणाली लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून ‘प्रश्नेजेक्ट शक्ती’ असे या प्रकल्पाचे नाव आहे. त्यामुळे आता या आधुनिक संगणकीय प्रणालीशी सुसंगत असा तोफखाना उभारण्यात येणार आहे. ‘आर्टिलरी कॉम्बॅट कमांड अ‍ॅणड कंट्रोल सिस्टीम’ असे या शक्ती प्रकल्पाचे वर्णन करण्यात येणार असून येत्या शुक्रवारी ही यंत्रणा बसविण्यास सुरुवात होईल, असे लष्करातर्फे घोषित करण्यात आले.

रॅगिंगला कंटाळून विद्यार्थ्यांची आत्महत्या
वारंगळ, (आंध्र प्रदेश) ९ जून / पीटीआय

रॅगिंगला कंटाळून येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमसीएच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. तो अवघा २२ वर्षाचा होता, असे पोलिसांनी सांगितले. वारंगळचे पोलिस उपअधीक्षक व्यंकटेश्वर राव यांनी सांगितले, की देवेंदरकुमार हा हैदराबादच्या इब्राहिमपट्टनम भागातील वसावी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होता. रॅगिंगला कंटाळून त्याने धरमाराम खेडय़ात धावत्या रेल्वेखाली जीव दिला. त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यात त्याने म्हटले आहे, की वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून सतत रॅगिंग होत होते ते सहन करण्यापलीकडे गेले होते. त्यामुळे आपण जीवनयात्रा संपवित आहोत. तो मूळचा करीमनगर जिल्ह्य़ातील चोपडांदी खेडय़ाचा रहिवासी होता. ९ जूनला सेमेस्टर परीक्षेसाठी तो हैदराबादला येणार होता त्याचवेळी ही घटना घडली. त्याचा मृतदेह धरमाराम येथे रेल्वेमार्गावर सापडला, त्यानंतर त्याच्या आईवडिलांना माहिती कळवण्यात आली. मृतदेहाची ओळख पटली असून तो शवविच्छेदनासाठी एमजीएम रुग्णालयात नेण्यात आला. याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

नक्षलवाद्यांनी केलेल्या सुरुंग स्फोटात नऊ पोलीस जखमी: दोघा भावांची हत्या
रायपूर, ९ जून / पी.टी.आय.

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या सुरुंगस्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे नऊ जवान जखमी झाले तर कांकेर जिल्ह्यात दोघा भावांना नक्षलवाद्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत प्रश्नण गमवावे लागल्याचे पोलिसांनी सांगितले. बिजापूर जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना नेणारा ट्रक बिजापूर खोऱ्यात आला असताना नक्षलवाद्यांनी सुरुंगाद्वारे ट्रक उडवून दिला. ट्रकमधून जवानांसाठी धान्यादी जीवनावश्यक वस्तूही नेण्यात येत होत्या. राज्य पोलीस मुख्यालयातून हा ट्रक निघाल्यानंतर ४५० किलोमीटर अंतरावरील बिजापूर खोऱ्यात हा हल्ला झाला. जखमी पोलिसांना जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. रायपूरनजीक कांकेर जिल्ह्यात सुंद्रू आणि मंगूराम या दोन भावांचे मृतदेह पोलिसांना मिळाले.

मुख्यमंत्री अब्दुल्ला यांचे राहुल गांधी यांना काश्मीरभेटीचे निमंत्रण
लंडन, ९ जून/ पी.टी.आय.

अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी दहशतवादग्रस्त अशा जम्मू व काश्मीरमधील नागरिकांशी थेट संवाद साधण्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रयत्नामुळे प्रभावित झालेले जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी राहुल गांधी यांना राज्यात आमंत्रित करण्याचे ठरविले आहे. शहराबाहेरच्या युवकांशी संपर्क साधावा, त्यावेळी कोणीही प्रसारमाध्यमांचा प्रतिनिधी नसावा अनौपचारिक अशी संवादाची भाषा निर्माण व्हावी अशा प्रकारच्या संवादासाठी राहुल गांधी यांना राज्यात आमंत्रित करण्याचा विचार आहे, असेही अब्दुल्ला यांनी सांगितले. युवकांना काय सांगायचे आहे आणि ते भविष्याकडे कोणत्या दृष्टिने पाहात आहेत, ही बाब राहुल गांधी समजून घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सपाच्या आमदाराचा ‘बसपा’त प्रवेश
लखनौ, ९ जून/पी.टी.आय.
सुलतानपूर येथील समाजवादी पार्टीचे आमदार चंद्रभद्र सिंह यांनी आपला राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष सुखदेव राजभोर यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांनी आता बहुजन समाज पक्षात प्रवेश केला आहे.

मौलाना फझलुल्लावर पाच कोटींचे बक्षीस..
इस्लामाबाद, ९ जून/पी.टी.आय.

स्वात खोऱ्यातील तालिबानचा कमांडर मौलाना फझलुल्ला याची माहिती देणाऱ्या इसमाला पाकिस्तान शासनाने पाच कोटींचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. स्वात खोऱ्यामध्ये तालिबानींविरोधात पाकिस्तानी लष्कराची कारवाई अंतिम टप्प्यात आली असताना प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये शासनाने याबाबतची जाहिरात प्रसिध्द केली आहे. फझलुल्लाखेरीज त्याच्या २० सहकाऱ्यांवर एक कोटीचे इनाम लावण्यात आले असून त्यामध्ये फझलुल्लाचा प्रवक्ता मुस्लिम खान याचा समावेश आहे. फझलुल्ला यास जिवंत किंवा मृत पकडण्यासाठी जो पाकिस्तानी लष्कराला मदत करेल त्याला पाच कोटी रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे.

थायलंडमध्ये मशिदीतील गोळीबारात ११ ठार
बँकॉक, ९ जून/पीटीआय
दक्षिण थायलंडमध्ये सोमवारी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एका मशिदीत केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ११ ठार, तर १२पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार रात्री आठच्या अगोदर लोक नमाज पठण करीत असताना हा हल्ला झाला. नराथिवात प्रश्नंतातील चो इ रोंग जिल्ह्य़ात घडलेल्या या घटनेत पाचजण गंभीर जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. पंतप्रधान अभिसित वेजाजिवा यांनी लष्करप्रमुख अनुपॉँग पोचिंदा यांना नराथिवात प्रश्नंतात पाठविले असून, ते स्थानिक अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. बंडखोरांना बदनाम करण्यासाठी अधिकाऱ्यांनीच हा हल्ला केला, अशी चर्चा असून, हा प्रश्न आता मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे. नराथिवात प्रश्नंत हा मुस्लिमबहुल असून, तेथे २००४ पासून बंडखोरांच्या कारवायांत हजारो लोक मारले गेले आहेत.