Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

व्यापार - उद्योग

उरण वायू केंद्रातून विक्रमी वीजनिर्मिती

 

व्यापार प्रतिनिधी: महानिर्मितीच्या उरण वायू विद्युत केंद्राने यंदा विक्रमी वीजनिर्मिती करून गेल्या १० वर्षांंतील सर्वोच्च वीजनिर्मिती साध्य केली आहे. २००८-०९ या आर्थिक वर्षांत या वीज केंद्राने ४४३१.७९ दशलक्ष युनिटस् इतकी विक्रमी वीजनिर्मिती केली आहे. वस्तुत: विविध नियंत्रण संस्थांनी निर्धारित केलेल्या वार्षिक उद्दिष्टांपेक्षाही जास्त उत्पादन या केंद्राने केले आहे. वर्ष २००८-०९ साठी नियोजन आयोगाने ३८०२ द.ल.यु., केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने ३८१० द.ल.यु., राज्य वीज नियामक आयोगाने ३९३८ द.ल.यु. तर महानिर्मितीने स्वत:साठीचे ४००० द.ल.यु. इतके वीजनिर्मितीचे उद्दिष्ट निर्धारित केले होते.
या वीज केंद्राची वीजनिर्मिती ९८.७१ टक्के इतकी असून ६७२ मेगाव्ॉट स्थापित क्षमता विचारात घेतल्यास ७८.८७ टक्के संयंत्र भारांक नोंदविण्यात आला आहे. २० मे रोजी या केंद्रातून शिखर मागणीच्या काळात ७१६ मेगाव्ॉट इतकी विक्रमी वीजनिर्मिती करण्यात आली.
या विद्युत केंद्राला पुरेशा इंधन वायूचा पुरवठा होण्यासाठी महानिर्मितीने राज्य शासनामार्फत सातत्याने पाठपुरावा केला होता. नुकताच ‘रिलायन्स’शी या संदर्भात आगामी पाच वर्षांसाठी एक दीर्घकालीन करार करण्यात आला असून त्यायोगे महानिर्मितीला इंधन वायू उपलब्ध होत आहे.
राज्यातील विजेच्या वाढत्या मागणीच्या पाश्र्वभूमीवर उरण वायू केंद्राने बजावलेली कामगिरी निश्चितच वीज ग्राहकांना दिलासा देणारी आहे.

बिल्डरच्या घशात भूखंड घालण्याचा डाव मुख्यमंत्र्यांनी हाणून पाडला
व्यापार प्रतिनिधी: रोज हजारो रुग्णांना नाममात्र दरात आरोग्य सेवा पुरविणाऱ्या जैन हेल्थ सेंटर असलेला दादरचा भूखंड खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा पालिका प्रशासनाचा डाव मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वेळीच हस्तक्षेप करून हाणून पाडला आहे. याच मागणीच्या समर्थनार्थ पन्नास हजार नागरिकांनी सह्या केल्या आहेत.
श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाने ३० वर्षांपूर्वी या सुसज्ज आरोग्य केंद्राची इमारत उभी केली आणि परिसरातील सर्वसामान्य नागरिक गेली अनेक वर्षे या हेल्थ सेंटरचा लाभ घेत आहेत. या इमारतीच्या बाजूला असलेली गरीब रुग्णांच्या नातेवाईकांसाठी फक्त १० रुपयांत भोजन देणारी शेड, भाडेकरूंची घरे आणि काही मोकळी जागा अशी अंदाजे ३००० वार असलेली ही जागा पुनर्विकासाच्या नावावर एका बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू होता. अश्वत्था डेव्हलपरला महापालिकेने सर्व नियम धाब्यावर बसवून मंजुरीही देऊन टाकली होती. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या अहिल्याताई रांगणेकर यांनी या आरोग्य केंद्राच्या बचावासाठी मोठे आंदोलन उभारून हा प्रयत्न थोपविला होता. परंतु त्यांच्या निधनानंतर बिल्डरने वेगाने हालचाली करताना, दडपणे व प्रलोभने द्यायला सुरुवात केल्याचे आढळून आले.
भाडेकरूंना चांगली घरे मिळावीत आणि सुसज्ज हॉस्पिटल उभे राहावे या मागणीसाठी अहिल्याताईंचे आंदोलन होते. अहिल्याताईंच्या निधनानंतर हेल्थ सेंटर बचाव कमिटीने लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांची भेट घेतली. कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दादरकर नागरिकांचे शिष्टमंडळ भेटले. मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या या कारवाईला तातडीने स्थगितीचे आदेश दिले.
स्थानिक भाडेकरूंना स्वत:च्या मालकीची चांगली घरे मिळावीत आणि हेल्थ सेंटरच्या गरीबांसाठी चालणारे सुसज्ज हॉस्पिटल उभे राहावे यासाठी आवश्यक तो प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी नुकतेच दिले आहेत. येथे उभ्या राहणाऱ्या नियोजित हॉस्पिटलला कॉ. अहिल्याताई रांगणेकरांचे नाव देण्याचा निर्णयही विश्वस्तांनी घेतला आहे.

अभ्युदय बँकेची आज निवडणूक
व्यापार प्रतिनिधी: बहुराज्यीय शाखाविस्तार असलेल्या सहकार क्षेत्रात प्रगतीशील अभ्युदय बँकेचे नवे संचालक मंडळ निवडण्यासाठी गुरुवारी ११ जूनला प्रस्तावित निवडणूक ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पार पडणार आहे. या निवडणुकीला स्थगिती द्यावी अशी विनंती करणारी मुंबई उच्च न्यायालयात केली गेलेली रिट याचिका आज फेटाळण्यात आली. या निवडणुकीसाठी नेमलेले निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. घोरपडे सध्याच्या सीताराम घनदाट यांच्या नेतृत्वातील संचालकांच्या ‘संस्थापक पॅनेल’ला मदत व्हावी यासाठी पक्षपातीपणाने वागत असल्याचा आरोप करणारी आणि नवा निवडणूक अधिकारी नेमल्याखेरीज निवडणूक घेतली जाऊ नये, अशी रिट याचिका उच्च न्यायालयात केली गेली होती. पण ती फेटाळताना न्यायालयाने निवडणूक अधिकारी म्हणून घोरपडे यांच्या नियुक्तीवरही शिक्कामोर्तब केले आहे.

ऋग्वेद कलेक्शनचे पैठणी साडय़ांचे प्रदर्शन
व्यापार प्रतिनिधी: शिल्पा आनंद यांच्या ऋग्वेद कलेक्शनने विशेष ब्रायडल कलेक्शनच्या पैठणी साडय़ांचे प्रदर्शन शुक्रवार, शनिवार आणि रविवार १२, १३ व १४ जूनला वैभव हॉल, रानडे रोड, सुजाता हॉटेलच्या वर, दादर (प.), मुंबई येथे सकाळी ११ ते रात्री ९ दरम्यान आयोजित केले आहे. रु. ३९००/- पासून सुरू होणाऱ्या १६ पेक्षा जास्त डिझाइन्समधील विशेष पैठणी साडय़ा, वधूंसाठी विशेष पैठणी साडय़ा, लेडीज रेडिमेड्स शॉर्ट, कुडते, लांब कुडते, सलवार सूट, ड्रेस मटेरियल आणि पैठणीमध्ये पुरुषांसाठी पारंपरिक लांब आणि शॉर्ट कुडता तसेच पैठणीच्या पर्सेस या ठिकाणी उपलब्ध असतील.