Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

मिडास - लढाऊ विमानांचे भोजनालय
भारतीय हवाईदलाने आपल्या ताफ्यातील लढाऊ, तसेच अन्य विमानांचा पल्ला वाढावा यासाठी त्यामध्ये हवेत उडत असतानाच इंधन भरता यावे या हेतूने रशियन बनावटीची आयएल ७८ एमकेआय मिडास ही इंधनवाहू विमाने खरेदी केली. त्याच्या मदतीनेच भारतीय हवाईदलाने आज आपली सामरिक पोहोच सिद्ध केली आहे. आज भारतीय हवाईदलातील हे सर्वात मोठे आणि सर्वात वजनदार मालवाहू विमान आहे. हवाईदलांच्या परिभाषेत अशा प्रकारच्या इंधनवाहू विमानांना ‘मिड-एअर रिफ्युलर’ म्हटले जाते.

कधी रे येशील तू..
प्रिय वरुणराजा,
काल सात जून ही तारीख उलटून गेली. अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. तू मुंबई, ठाणे, कल्याण सोडून महाराष्ट्राच्या अन्य भागात आपली मान्सूनपूर्व हजेरी तरी लावलीस. मुंबईकरांवर मात्र तू रुसला आहेस का, मुंबईकरच नव्हे तर झाडे, झुडपे, प्राणी, पक्षी आणि धरित्रीही तुझी आतुरतेने वाट पाहात आहे. प्रत्येकजण विचारत आहे, तूला आळवत आहे, कधी रे येशील तू..

डुकरांपासून मूलपेशी
मूलपेशींचा वापर नवीन अवयवांची निर्मिती करण्याकरिता होतो हे आता विज्ञानाने सिद्ध केले आहे. आगामी काळातील वैद्यकीय उपचार पद्धतींमध्ये या मूलपेशींचे महत्त्व वाढणार आहे. जरी समजा अशा प्रकारे मूलपेशींनी दुर्धर आजार बरे होऊ लागले तरी या मूलपेशी कुठून आणि कशा मिळवायच्या, त्यातील कुठले मार्ग नैतिक आहेत, कुठले अनैतिक आहेत यालाही बरेच महत्त्व आहे. मूलपेशी मिळवण्याचा एक नवीन मार्ग चीनच्या वैज्ञानिकांनी शोधून काढला आहे. प्रौढ डुकरांपासून मिळवलेल्या पेशींपासून वेगवेगळय़ा अवयवांसाठी लागणाऱ्या ऊती तयार होऊ शकतील अशी व्यवस्था त्यांनी केली आहे. सध्या गर्भाच्या मूलपेशींमध्येच अशी क्षमता आहे की, ज्यापासून कोणत्याही अवयवांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या ऊतींची निर्मिती होऊ शकते.

स्वयंवराचा आधुनिक आविष्कार
रामायणातील सीता स्वयंवराचा प्रसंग किंवा अशाच प्रकारचे स्वयंवर रचून विवाह करण्याची पद्धत पौराणिक काळात होती हे आपल्याला माहीत आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘जोडी जमली रे’ या विवाहविषयक एकमेव रिअॅलिटी शोमध्येही गुरुवारी रात्री १० वाजता प्रसारित होणाऱ्या भागात स्वयंवराचा आधुनिक आविष्कार पाहायला मिळणार आहे. सर्व सहा स्पर्धकांची आता एकमेकांशी चांगली ओळख झाली असून, त्यांच्या वागण्याबोलण्यात मोकळेपणा आला आहे. अनुरूप जोडीदार निवडण्याच्या प्रक्रियेत स्पर्धक तरुणींनी आपले जोडीदार निवडले आता स्पर्धक तरुण आपापली जोडीदार निवडणार आहेत. ‘जोडी जमली रे’मध्ये आता नवीन पद्धतीचे इंटरॅक्टिव्ह खेळ सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे स्पर्धक तसेच प्रेक्षकांनाही ‘जोडी जमली रे’ कार्यक्रमाचे नवीन स्वरूप पाहायला मिळत आहे. आधुनिक स्वयंवराच्या खेळाबरोबरच लग्नाआधीचे आणि नंतरचे प्रेमप्रकरण यामुळे वैवाहिक नात्यावर होणारा परिणाम या विषयावर स्पर्धक चर्चा करतील. लग्नाआधीचे प्रेमसंबंध याविषयी भावी जोडीदाराला सांगावेत की नाही हा चर्चेचा प्रमुख मुद्दा राहणार असून स्पर्धक तरुण-तरुणी अतिशय मोकळेपणी आपली मते मांडणार आहेत.
प्रतिनिधी