Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

चिपळूण व गुहागर तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित
धीरज वाटेकर, चिपळूण, १० जून

 

पावसाळी हंगामाच्या पाश्र्वभूमीवर चिपळूण व गुहागर तालुक्यातील रस्त्यांच्या कामाला वेग आला असला, तरी अनेक ठिकाणची कामे आजही वर्षांनुवर्षे प्रलंबित आहेत. नव्याने सुरू असलेल्या काही कामांच्या अंदाजपत्रकात अचानक झालेली वाढ, योग्य वेळेत तरतूद न केली गेल्याने रस्ते रखडण्याचे चित्र दिसून येत आहे. दोन्ही तालुक्यांत असलेल्या धनगरवाडय़ांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांची वर्षांनुवर्षे असलेली दुरवस्था अद्यापि कायम आहे. मूलभूत मानवी अधिकार हक्काने मिळविण्याच्या युगात आजही पावसाळ्यात अनेक गावांमध्ये नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येण्याची शक्यता आहे.
वहाळ व संगमेश्वर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वहाळपासून तीन कि.मी. असणाऱ्या या रस्त्याचे वीरबंदपर्यंत डांबरीकरण सहा वर्षांंपूर्वी झाले होते. हे डांबरीकरण काही ठिकाणी कच्चे केल्याने रस्ता ठिकठिकाणी उखडत गेला. गाडय़ांची रहदारी असल्याने व रस्त्यावरील खड्डय़ांकडे वेळोवेळी दुर्लक्ष केल्याने खड्डे वाढत गेले. वहाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाता-येता रुग्णांना जीव मुठीत घ्यावा लागतो. या रस्त्याचे पावसापूर्वी डांबरीकरण करावे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
गुहागर तालुक्यातील बोऱ्या येथील खारभूमी योजनेतून सुरू असलेल्या बंधाऱ्याचे आणखी १५ मीटर वाढीव काम पावसाळा संपल्यानंतर होणार असल्याचे वृत्त आहे. प्रलंबित असलेल्या वाढीव कामाला मुंबई किनारी अभियंता व जिल्हा सहाय्यक पतन अभियंता यांनी मंजुरी दिली आहे. ऐन पावसाळ्यातच ही मंजुरी मिळाल्याने हे काम आता पुढे ढकलावे लागणार आहे.
गुहागर तालुक्यातील चिवेली फाटा ते दत्तमंदिर या सुमारे तीन कि.मी. लांबीच्या रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य असल्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी व्हावे, अशी मागणी पंचक्रोशीतील प्रवासी करीत आहेत. हा रस्ता ३० वर्षांंपूर्वीचा असून आजपर्यंत या रस्त्याचे पक्के डांबरीकरण झालेले नाही. हा रस्ता अतिशय महत्त्वाचा असून तो चिवेली, बामणोली, कौंढरताम्हाने, बोरगाव, वाघिवरे, गोंधळे या गावांना जोडणारा आहे. या रस्त्यावरून गावांचे दळणवळण अवलंबून आहे. लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्याने पावसाळ्यापूर्वी रस्ता डांबरीकरण करावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, गुहागर तालुक्यात रस्ते विकासासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तालुक्यात पर्यटनाची वाढ होत आहे. त्यामुळे मुख्य रस्ते चांगल्या दर्जाचे होणे गरजेचे असल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक ठिकाणी कामांना मंजुरी दिली जात आहे. या कामांमधून तालुक्यातील वेलदूर, गुहागर रस्त्यावर ढापा डेनची पुनर्बांधणी, मोऱ्यांचे बांधकाम, गुहागर-चिपळूण रस्त्यावरील पुलाचे रुंदीकरण, पुनर्बांधणी, मोडका आगर- पालशेत- तवसाळ रस्त्यावरील मोऱ्यांच्या बांधकामांचा समावेश आहे. राज्य सरकारकडून कोकण पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. या पॅकेजमध्येही ग्रामीण विकास कामे मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे चिपळूण व गुहागर येथील धनगरवाडय़ांमधील समस्या प्रलंबित आहेत. अनेक सरकारी योजना धनगरवाडय़ांपर्यंत पोहोचल्या नाहीत. अनेक वाडय़ांमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून विहीर व शिवकालीन तलाव बांधण्यात आले, परंतु पाण्याच्या या योजना नाकाम झाल्या आहेत. गुहागर तालुक्यातील कावळे धनगरवाडीसाठी आठ लाख रुपये खर्चून राबविण्यात आलेली शिवकालीन तलावाची योजना वाडीपासून एक किलोमीटर लांब राबविली आहे. या तलावात पावसाळ्यातही पाणी थांबत नाही. त्यापेक्षा सध्याच्या मूळ झऱ्यावर साठवण टाकी बांधण्यात आली असती तर पाणीप्रश्न मिटला असता, असे लोकांचे म्हणणे आहे. हुंबरी झोरेवाडी, वाडीबीड, शिंदेवाडी, खोपी, ओंकारवाडीतील ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्ते बांधले आहेत.