Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

शेतकऱ्यांचे कुटुंब शेतीकामात मग्न
संगमेश्वर, १० जून/वार्ताहर

 

गत आठवडय़ात कोकणच्या विविध भागांत दमदार पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांचे सर्व कुटुंबच शेतीच्या कामात मग्न असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत मात्र अपेक्षित पाऊस पडलेला नाही.
कोकणातील मुख्य पीक भातशेती हेच असल्याने पेरणीपासून कापणीपर्यंत कोकणचा शेतकरी शेतीच्या कामात मग्न असतो. यावर्षीही वेळापत्रकानुसारच पेरण्या आटोपल्या असून, सद्यस्थितीत रोपांची वाढही चांगली होत असल्याचे पाहायला मिळते.
पेरणीनंतर चांगला पाऊस झाल्यास शेतकरी वर्ग विलंब न लावता उर्वरित शेतीच्या उखळ-बेरीचे काम हाती घेतो. संगमेश्वर तालुक्यासह जिल्ह्याच्या उर्वरित भागात गत आठवडय़ात दमदार पाऊस पडल्यामुळे जमीन नरम झाली असल्याने शेतकरी वर्गाचे सर्व कुटुंबच सध्या शेतामध्ये विविध कामांसाठी राबत असल्याचे दिसून येत आहे.
प्राथमिक व माध्यमिक शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत. तोपर्यंत मिळणारा वेळ शेतकऱ्यांची मुले शेतात काम करून आपल्या आई-वडिलांना मदत करण्यासाठी खर्ची घालत आहेत. उगवून आलेल्या छोटय़ा रोपांमुळे दिसणारे दृश्य सध्या विलोभनीय दिसते.
वयोवृद्ध शेतकऱ्यांना शेती करणे शारीरिक आणि आर्थिकदृष्टय़ा झेपेनासे झाल्याने हळूहळू शेती कमी केल्याने काही भागांतून शेतजमीन रिकामी राहात असल्याचे पाहायला मिळते.