Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

गृहमंत्री जयंत पाटील यांची घोषणा
पोलिसांसाठी राज्यात गृहनिर्माण प्रकल्प
अलिबाग, १० जून/प्रतिनिधी

 

पोलिसांकडून कार्यक्षम सेवा आणि कायदा सुरक्षा टिकवण्याची अपेक्षा आपण करीत असतानाच त्यांना आधुनिक सुविधाही मिळणे आवश्यक आहे. या विचारास राज्य सरकारने चालना दिली असून, अलिबाग येथे होत असलेल्या पोलीस गृहनिर्माण प्रकल्पासारखेच गृहनिर्माण प्रकल्प राज्यात सर्वत्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री जयंतराव पाटील यांनी आज येथे बोलताना केली़
राज्यात एकमेवत्व सिद्ध करेल, अशा रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचा आणि रायगड पोलीस गृहनिर्माण प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ गृहमंत्री पाटील यांच्या हस्ते झाला़
ते पुढे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात १९११ मध्ये बांधलेल्या इमारतीत सध्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आह़े त्या इमारतीस २०११ मध्ये १०० वर्षे पूर्ण होतील़ या पाश्र्वभूमीवर आज भूमिपूजन केलेल्या नव्या प्रशासकीय इमारतीत येत्या वर्ष दीड वर्षांत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय कार्यान्वित झाल्यास स्वातंत्र्यप्राप्तीचा नेमका काय फायदा झाला, याचे चांगले संकेत जनसामान्यांमध्ये जाऊ शकतील़ गेल्या २६ नोव्हेंबरच्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्याच्या पोलीस दलात मोठे बदल करण्यात आल्याचे नमूद करून पाटील पुढे म्हणाले, २६ नोव्हेंबरच्या घटनेनंतर कोकणच्या किनारी भागातील सागरी सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ‘कोस्टल गार्ड’ कडे सोपविण्यात आली असली तरी किनारी भागातील गस्तीकरिता अत्याधुनिक ‘स्पीड बोटी’ कोकणातील चारही जिल्ह्यांच्या पोलीस दलास देण्याचा निर्णय गृहखात्याने घेतला आह़े राज्यातील नव्या सुरक्षा व्यवस्थेसाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, प्रत्येक जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या खाली भूमिगत ‘फायरिंग रेंज’ चे नियोजन करण्यात आले आह़े राज्यातील पोलीस दलातील शस्त्रधारी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्याने वर्षांतून किमान एकदा या रेन्जमध्ये प्रत्यक्ष फायरिंगचा सराव करणे अनिवार्य राहणार आह़े रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय समुद्रकिनाऱ्यास लागूनच असल्याने येथे भूमिगत फायरिंग रेन्ज तांत्रिकदृष्टय़ा कठीण असल्याने अलिबागजवळ अन्यत्र करण्यात येईल, असेही पाटील यांनी जाहीर केल़े पोलिसांच्या शारीरिक क्षमता अबाधित राखण्याकरिता येथे उपलब्ध करून देण्यात आलेली वैद्यकीय सेवा व विश्रामगृह सेवा राज्यात एकमेव असल्याचा विशेष उल्लेख करून रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेस यंदा झालेल्या ३० कोटी रुपयांच्या नफ्यातून रायगड पोलिसांसाठी तरणतलाव बांधून देण्याचा निर्णय बँकेचे चेअरमन व शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनी घेतल्याबद्दल त्यांचे त्यांनी अभिनंदन केल़े रायगड जिल्ह्यातील जनता, विविध राजकीय पक्षांचे प्रमुख, पोलीस आणि प्रशासन यांनी एकत्रितरीत्या महात्मा गांधी तंटामुक्त गांव योजना यशस्वी करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सर्वाचे अभिनंदन करून, या निमित्ताने निर्माण झालेला उत्साह टिकवून ठेवणारे रायगडचे नवीन पोलीस अधीक्षक असतील, असे जयंतरावांनी अखेरीस नमूद केल़े
राज्याचे ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात रायगडच्या तंटामुक्तीचे श्रेय विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांना देऊन त्यांचे अभिनंदन केल़े ‘रायगड पॅटर्न’ सतत राज्यभर गाजत राहिला आहे, तसेच येथून पुढे तंटामुक्तीसाठीचा सर्वपक्षीय रायगड पॅटर्न आपण सर्वजण राज्यास देऊ, असे त्यांनी आवाहन केल़े रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय प्रशासकीय इमारतीचाही रायगड पॅटर्न राज्यास आता मिळणार आह़े रायगड पोलिसांचे अभिनंदन करतानाच, नव्या प्रशासकीय इमारतीतून पोलीस जनतेशी जेव्हा सुसंवाद साधतील, तेव्हा ती इमारत यशस्वी होईल, असे त्यांनी अखेरीस सांगितल़े
मी रायगडचा पहिला तंटामुक्त खासदार असल्याचे नमूद करून लोकसंख्या व पोलीस या प्रमाणात कार्यक्षमतेच्या मुद्दय़ावर महाराष्ट्र पोलीस देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे खासदार अनंत गिते यांनी सांगितल़े दुग्धविकासमंत्री रविशेठ पाटील, राज्याचे पोलीस महासंचालक एस़ एस़ विर्क यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, तर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक प्रताप दिघावकर यांनी प्रास्ताविक केल़े
कार्यक्रमास अलिबागचे आमदार मधुकर ठाकूर, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड़ नीलिमा पाटील, कोकण परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षक कौशल कुमार पाठक, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष वसंत ओसवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड़ दत्ता खानविलकर आदी व्यासपीठावर उपस्थित होत़े.
दरम्यान, आजच्या कार्यक्रमपत्रिकेतील मान्यवरांमध्ये रायगड जिल्ह्यातील उर्वरित आमदारांचा समावेश करण्यात आला नव्हता. याबद्दल राष्ट्रवादीचे महाडचे आमदार माणिकराव जगताप यांनी पत्रकारांशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली.