Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

सरंगा मासा दुर्मिळ होण्याची चिन्हे
पालघर, १० जून/वार्ताहर

 

चालू वर्षीही मासळी बाजारात ‘कावळी’ तथा ‘कावलटी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सरंग्यांच्या लहान पिलांची मोठय़ा प्रमाणावर आवक झाली आहे. मत्स्य प्रजननानंतर जन्माला येणाऱ्या या लहान पिलांची पूर्णत: वाढ होऊ न देता मोठय़ा प्रमाणावर एकप्रकारे कत्तल केली जात असल्याने भविष्यात पापलेट तथा सरंगा दुर्मिळ झाल्यास आश्चर्य वाटू नये. आश्चर्याची बाब म्हणजे, तात्काळ आर्थिक लाभाच्या हव्यासापोटी मच्छिमार स्वत:च आपल्या पायावर धोंडा मारून घेत असून, त्यांना या हव्यासापासून रोखण्यास मच्छिमार संस्था हतबल ठरत आहेत; तर मत्स्य व्यवसाय खाते दुर्बल ठरल्याचा प्रत्यय येत आहे.
पालघर तालुक्यातील सातपाटी-मुरबेसह वसई तालुक्यातील अर्नाळा-उजन-वसई इ. समुद्रकिनाऱ्यावरील मच्छिमारांना सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या माशांमध्ये पापलेटचा वाटा मोठा आहे. वैशिष्टय़पूर्ण अशा उत्तम चवीसह कमी काटय़ाचा मासा म्हणून या माशांना नेहमीच मोठी मागणी असते. देशाच्या दोन्ही किनारपट्टीवर सुमारे एक वाव म्हणजेच सहा फूट खोलीपर्यंत हा मासा सापडतो. तरती बुडी व डोलनेट जाळ्याद्वारा जिल्ह्यात ही मासेमारी चालते.
मुंबई येथील शिवाजी महाराज मंडई म्हणजेच जुने क्रॉफर्ड मार्केटमधील पेढीवरील उपलब्ध आकडेवारीनुसार एप्रिल ते जून २००८ या केवळ तीन महिन्यांत या भागातील सुमारे २५० बोटींनी ५० ग्रॅम इतक्या वजनाच्या या कावलटीची (लहान पिलांची) ९७ हजार टन इतकी मासेमारी केल्याचे उघड झाले आहे, तर यावर्षीही सातपाटी व मुंबई येथील बाजारपेठेत जवळपास ६५ हजार टन लहान पिलांची विक्री झाल्याची माहितीही पुढे आली आहे.
मुंबईच्या ‘सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ूट’च्या अहवालानुसार महाराष्ट्रात १९८३ मध्ये सर्वाधिक १९ हजार ४०६ टन इतक्या सरंग्याचे उत्पादन झाले. तद्नंतर या उत्पादनात वर्षांगणिक घसरण चालूच असून, अलीकडे ते केवळ तीन हजार टनापर्यंत आले आहे. सरंग्याच्या लहान पिलांची कत्तल हेच या घसरणीचे कारण असल्याचे अहवालात नमूद केले आहे. मच्छिमारांमार्फत लहान पिलांची केली जाणारी ही अर्निबध कत्तल थांबवून पावसाळी मासेमारी बंदीच्या काळात त्यांची पुरेशी वाढ होण्यासाठी अवधी दिल्यास मच्छिमार बांधवांना चौपट लाभ होऊ शकतो. मात्र तात्काळ लाभाच्या हव्यासापोटी मच्छिमार स्वत:चेच नुकसान करून घेत आहेत.
त्या पाश्र्वभूमीवर मत्स्यव्यवसाय संशोधन संस्थेने डोल जाळ्यांची मासेमारी केवळ सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीपुरतीच मर्यादित ठेवावी. याबरोबरीने वसई-अर्नाळा भागातील डोल जाळ्याने होणाऱ्या सरंग्याच्या मासेमारीला र्निबध घालावा, असे दोन उपाय सुचविले आहेत. मात्र अहवालातील या सूचनांकडे मच्छिमार जाणीवपूर्वक डोळेझाक तर करताहेतच, परंतु मच्छिमार संघटना व मच्छिमार संस्थांच्या आवाहनालाही भिक घालत नसल्याची खंत संघटना व संस्थांचे पदाधिकारी बोलून दाखवीत आहेत.