Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

ओरोसच्या बैठकीत ‘कोकण पॅकेज’ची घोषणा - राणे
सावंतवाडी, १० जून/वार्ताहर

 

जून महिन्याच्या अखेरीस सिंधुदुर्ग- ओरोस येथे कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक होत आहे. या बैठकीत कोकण पॅकेजची घोषणा होईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिली. राणे यांनी मालवणमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मालवणसारख्या बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले मताधिक्य पाहून राणे यांनी पुनर्बांधणी करण्यासंबंधी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विरोधकांनी जातीचे राजकारण केले, तसेच काँग्रेस नेत्यांनी फितुरी केल्यानेच सुरेश प्रभू यांना मते मिळाल्याचा राणे यांनी पुनरुच्चार केला.
आगामी विधानसभा निवडणूक मालवण- कुडाळ की कणकवली- देवगड मतदारसंघातून लढवावी, याबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. कुडाळ- मालवणमध्ये सुमारे ११ हजार, तर कणकवली- देवगडमध्ये २६ हजारांचे मताधिक्य लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दिले आहे, असे राणे म्हणाले. मी मराठा समाजाचा असून जिल्ह्यात ६५ टक्के लोक या समाजातील आहेत, पण मी कधीच समाजाचे राजकारण केले नाही. अनेकांना पदे दिली, त्यावेळी त्यांचा समाज पाहिला नाही. जातीचे राजकारण कधीच केले नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत अनेकांनी जातीचे राजकारण केले, असे राणे म्हणाले.
गेली २० वर्षे कोकणासह सिंधुदुर्ग विकासासाठी काम केले, पण सुरेश प्रभू तोंडच दाखवीत नव्हते. त्यांना कोणत्या कामासाठी लोकांनी मते दिली, असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात नागरिकांना दर्जेदार सेवा-सुविधा दिल्या. येथील लोकांना आर्थिक प्रगतीकडे नेण्यासाठी माझ्याकडे योजना आहेत, असे त्यांनी सांगितले.
दोन विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ), एक विमानतळ आणि एक टेक्स्टाईल पार्क जिल्ह्यात होणार असून, जिल्ह्यातील बेरोजगारी संपविण्याचा प्रयत्न आहे, असे राणे यांनी सांगितले.