Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

पर्यावरण जनजागृती ही काळाची गरज - जाधव
महाड, १० जून/वार्ताहर

 

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करण्याची गरज असून, प्रदर्शने, व्याख्याने या माध्यमातून जनजागृती ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदीप जाधव यांनी आज केले.
महाड उत्पादन संघटना, नेचर प्रिव्हेन्शन ट्रस्ट यांच्यातर्फे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात जागतिक पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभाला उद्घाटक म्हणून संदीप जाधव, तर प्रमुख अतिथी म्हणून महाडचे प्रांताधिकारी भाऊसाहेब फटांगरे होते. महाड उत्पादन संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोसले, लक्ष्मी ऑर्गेनिक्स कंपनीने ए. बी. पाठारे, ‘नेचर प्रिव्हेन्शन’ ट्रस्टचे पदाधिकारी कृष्णा भागवत, औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार उपस्थित होते.
जाधव पुढे म्हणाले, गेल्या तीन-चार वर्षांमध्ये या भागातील प्रदूषण निश्चितच कमी झाले आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या जनजीवनावर झालेला दिसून येतो. महाड नगरपालिका लवकरच प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी घालणार आहे. या कार्यामध्ये महाड उत्पादन संघटनेने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. शहरातील घनकचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याची विल्हेवाट लावण्यासाठी लाडवली गावाजवळ पालिकेच्या मालकीची ११ एकर जमीन आहे. त्या ठिकाणी घनकचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न पालिका करीत आहे, परंतु तांत्रिक अडचणी येत असल्याने त्यास विलंब लागत आहे. या कार्यातही संघटनेने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पर्यावरणतज्ज्ञ कृष्णा भागवत पर्यावरणाचे महत्त्व स्पष्ट करताना म्हणाले, निसर्ग मानवाला भरपूर काही देत असतो. त्याप्रमाणे निसर्गालाही देण्याचे मानवाचे कर्तव्य आहे. पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येक नागरिकाने आपल्याकडून प्रदूषण होणार नाही, असा संकल्प सोडावा, असे आवाहन करताना देशामध्ये दररोज एक लाख मेट्रिक टन कचरा फेकला जातो. त्याचा पर्यावरणावर भयंकर परिणाम होत आहे. त्यासाठी प्रत्येकाने पथ्ये पाळली तर निसर्ग पूर्वीप्रमाणे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशामध्ये पर्यावरण संरक्षणाचे भरपूर कायदे आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
भाऊसाहेब फटांगरे यांनी उत्पादक संघटनेच्या उपक्रमाचे स्वागत करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सुरेश भोसले यांनी जागतिक पर्यावरणाचे महत्त्व सांगताना महाडमध्ये प्रदूषण आणि पर्यावरणविषयाची जनजागृती करण्याच्या उद्देशाने आजपासून तीन दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.