Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

‘लोकसत्ता इफेक्ट’
कृषी संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून कलिंगड पिकाची पाहणी
नालासोपारा, १० जून/वार्ताहर

 

कृषी संशोधन केंद्र पालघरच्या शास्त्रज्ञांनी आज रानगाव येथे भेट देऊन कलिंगडाच्या नष्ट झालेल्या पिकाची व जमिनीची पाहणी केली. एकाच जागी सातत्याने घेण्यात येणारे एकच पीक व सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. गुणाजी देसाई यांनी सांगितले.
‘रानगाव येथील कलिंगड शेती नष्ट होण्याच्या मार्गावर’ या वृत्ताची दखल घेऊन कृषी संशोधन केंद्र पालघरचे डॉ. देसाई, डॉ. बी. डी. शिंदे, प्रा. किरण मालसे, वनस्पती कृषी शास्त्रज्ञ शरद माने यांनी रानगावला भेट दिली. तेथील कलिंगडच्या शेतजमिनीची पाहणी करून वेल, माती, फळ आदींच्या प्रादुर्भावाचे नमुने घेतले. यावेळी खराब झालेली फळे त्याच जमिनीत पुरून किंवा जाळून टाकण्याच्या सूचना त्यांनी शेतकऱ्यांना केल्या. जेणेकरून पुढील वर्षी नुकसान कमी प्रमाणात होईल. त्याचबरोबर पेरणीच्या वेळी बीज प्रक्रिया करून औषध फवारणी करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
फवारणीचे वेळापत्रक तयार करून देतानाच डिसेंबर २०१० पासून हंगामाची पूर्वतयारी म्हणून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र कोसबाडचे सहकार्य घेण्यात येणार असल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले. भविष्यात अशाप्रकारे कोणतेही नुकसान होऊ नये, म्हणून शेतकरी शास्त्रज्ञ मंचची स्थापना करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.