Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दहावा वर्धापनदिन कर्जतमध्ये साजरा
कर्जत, १० जून/वार्ताहर

 

दहिवली येथील यशदा मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० वा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला. या समारंभामध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षेत विविध कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गौरवही करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिण्यात आलेल्या या समारंभास राज्याचे ऊर्जामंत्री सुनील तटकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमवेत जिल्हा उपाध्यक्ष पुंडलिक पाटील, तालुकाध्यक्ष एकनाथ धुळे, तानाजी चव्हाण, पंचायत समिती सदस्य सुरेश टोकरे, नगराध्यक्ष शरद लाड, उपनगराध्यक्षा अस्मिता मोरे, वसंतराव भोईर, अशोक भोपतराव तसेच उदय पाटील, संतोष भोईर, रघुनाथ जाधव, भगवान चंचे, मंगेश म्हसकर आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपेक्षेप्रमाणे यश का मिळू शकले नाही, याबाबत योग्य त्या पद्धतीने शहानिशा करण्यात येईल. मात्र कार्यकर्त्यांनी यामुळे निराश न होता येत्या निवडणुकीसाठी आतापासूनच अधिक जोमाने कामाला लागावे, असे आवाहन तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. येत्या काही दिवसांत १५ जणांची मतदान केंद्रनिहाय समिती स्थापन करण्याची सूचना त्यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत विकासाचा मुद्दा घेतला होता. विरोधकांनी मात्र धार्मिक भावनांच्या आधारावर निवडणूक लढविली, असा आरोप त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकले असते तर वर्धापनदिनाचा अधिक आनंद झाला असता. यावेळचा वर्धापन दिन साजरा करताना पराभवाचे शल्य निश्चितच मनात राहिले आहे. मात्र आपल्याकडे कार्यकर्त्यांची फळी असल्यामुळे कोणीही खचून जाण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन सुरेश लाड यांनी केले.