Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

रवी बँकेच्या आजी-माजी दहा संचालकांना अटक
कोल्हापूर, १० जून / प्रतिनिधी

येथील रवी को-ऑप. बँकेच्या दहा आजी-माजी संचालकांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी नितीन पाटील यांनी सर्व संशयित आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. या सर्वावर सुमारे १७ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा लेखापरीक्षकांनी ठपका ठेवला आहे. या आर्थिक घोटाळय़ातील आणखी १५ संशयित आरोपी अटकेच्या कारवाईपासून दूर आहेत.

वसंतदादा कारखाना कामगारांचा जिल्हाधिकाऱ्यांना कोंडण्याचा प्रयत्न
सांगली, १० जून / प्रतिनिधी

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना कामगारांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांना कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. साखर कामगारांची ४० कोटी रुपयांची थकीत देणी व साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास द्यावा, आदी प्रमुख मागण्यांसाठी वसंतदादा शेतकरी साखर कारखाना कामगारांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले सात दिवस ठिय्या आंदोलन सुरू आहे.

जातीच्या दाखल्याअभावी भटक्या समाजातील गुणवत्तावान पूजाचे भवितव्य अधांतरी
राधानगरी, १० जून / वार्ताहर

हातोहात कागदपत्रात हेराफेरी करून बनावट दाखले देण्यात महसूल खात्याचा ‘हातखंडा’ आहे. मात्र जिवघेण्या दारिद्रयाशी झगडत, वेळेप्रसंगी शिळी भाकरी खाऊन बारावीच्या परीक्षेत ८१ टक्के गुण मिळवणाऱ्या कौलव (रा.राधानगरी) येथील वडार समाजातील कु. पूजा शंकर पोवार या विद्यार्थिनीचे शैक्षणिक भवितव्य केवळ जातीच्या दाखल्या अभावी व दारिद्रयामुळे अंधारमय बनले आहे.

इचलकरंजीत नगराध्यक्षपदासाठी घोडेबाजार; फुटिरांना लाखमोल
विरोधकांची कोटीच्या कोटी उड्डाणे व सत्ताधाऱ्यांची लाखमोलाची किंमत
इचलकरंजी, १० जून / दयानंद लिपारे
श्रीमंत नगरपालिकेचे नगराध्यक्षपद मिळवायचेच, या हेतूने सत्तारूढ काँग्रेस आणि ५ फुटीर नगरसेविकांसह सर्व विरोधकांनी चंग बांधला आहे. त्यासाठी पडेल ती किंमत देण्याची तयारी दाखवली गेल्याने सदस्य मालामाल झाले आहेत. विरोधकांची कोटीच्या कोटी उड्डाणे व सत्ताधाऱ्यांची लाखमोलाची किंमत याचे आकडे ऐकूनच सामान्य जनतेचे डोळे विस्फारले आहेत. हा सारा खेळ समाजसेवेसाठी की सत्तेतून येणाऱ्या मलिद्यासाठी, असा प्रश्न जनतेला पडला असला तरी तो पाहण्यावाचून तूर्तास पर्यायही राहिला नाही.

मोटारसायकल ट्रकवर आदळून दाम्पत्याचा मृत्यू
सोलापूर, १० जून/प्रतिनिधी

आपल्या गरोदर पत्नीला तिच्या माहेरी सोडायला पुण्याहून मोटारसायकलीवरून निघालेल्या तरुणास वाटेत अपघात होऊन त्यात दोघे पती-पत्नी जागीच मरण पावले. सोलापूर-विजापूर महामार्गावर मंद्रुपनजीक तेरा मैलजवळ बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. रात्रभर धोका पत्करून मोटारसायकलीचा प्रवास करताना सदर मोटारसायकल रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालमोटारीवर धडकल्याने हा अपघात झाला. अन्वर जाफर शेख (वय २०, रा. कोंढवा, पुणे) व श्रीमती बानो अन्वर शेख (वय १८) अशी या अपघातातील मृत दाम्पत्याची नावे आहेत. त्यांचा विवाह वर्षांपूर्वीच झाला होता. अन्वर हा पुण्यात एका स्कूलबसवर चालक म्हणून काम करीत होता. श्रीमती बानोला बाळंतपणासाठी माहेरी कर्नाटकात विजापूर जिल्ह्य़ाच्या इंडी तालुक्यातील तेग्याळी येथे सोडण्यासाठी अन्वर हा तिला सोबत घेऊन आपल्या मोटारसायकलीवरुन (एमएच १२ बीवाय १३३२) काल रात्री पुण्याहून निघाला होता. रात्रभर धोका पत्करुन प्रवास करीत सोलापूर-विजापूर महामार्गावर मंद्रुपजवळ तेरा मैलनजीक आले असताना रस्त्याच्या कडेला डिझेल संपल्याने थांबलेल्या मालमोटारीवर पाठीमागून सदर मोटारसायकल जोरात आदळली. यात दोघे जागीच मरण पावले.

अर्धवेळ स्त्री परिचर कर्मचाऱ्यांचा मोर्चा
सांगली, १० जून/प्रतिनिधी
अर्धवेळ स्त्री परिचर कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पूर्णवेळ परिचर नेमणुका द्याव्यात व शासकीय सुविधा मिळाव्यात, यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शनेही केली.जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अर्धवेळ स्त्री परिचर महिला कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पूर्णवेळ परिचर म्हणून नेमणूक द्यावी, स्त्री परिचर महिलांना राज्य शासनाकडून अत्यंत तुटपुंज्या म्हणजे ९०० रुपयांवर काम करावे लागत आहे. वाढत्या महागाईचा विचार केल्यास संसार चालविणेही कठीण झाले असून, किमान साडेतीन हजार रुपये वेतन द्यावे, स्त्री परिचरांना सेवानिवृत्तीनंतरचे कोणतेच लाभ मिळत नाहीत, त्यामुळे या महिलांना पेन्शन सुरू करावी, यासह विविध मागण्या करण्यात आल्या.या मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही या महिलांनी दिला. या आंदोलनात जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती श्रीमती सुजाता पाटील, शारदाताई मोरे, मिरज तालुकाध्यक्ष सुनंदा पाटील, सुरेखा शिंदे, सोनाबाई साळुंखे, यांच्यासह महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.

साताऱ्यात सरतापे यांचे उपोषण
सातारा, १० जून / प्रतिनिधी

देवापूर (ता. माण) येथील सव्‍‌र्हे नं. ३१ मधील वहिवाटीची जमीन मागासवर्गीय समाजाकडून काढून घेण्याच्या निषेधार्थ महादेव सरतापे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. लोकआयुक्त मुंबई यांच्या पत्र क्रमांक ऊ/७००/२००२ (जे.व्ही.ले /टी-२०) दि. ७/२ /२००३ अन्वये देवापूर येथील मागासवर्गीयांच्या सव्‍‌र्हे नंबर ३१ मधील जमीन परत करण्याचे आदेश होऊनही गावातील राजकीय पुढाऱ्यांनी महसूल प्रशासनास हाताला धरून संगनमताने याबाबत कार्यवाही होऊ दिली नाही. या अन्याया विरोधात लढा सुरू करण्यात आला आहे. मागासवर्गीय वहिवाटदारांच्या नावावर या जमिनीचा सातबारा व खातेउतारा केला जात नाही. तोपर्यंत आंदोलन जारी ठेवण्यात येणार असल्याचे महादेव सरतापे यांनी सांगितले. महादेव सरतापे यांच्याबरोबर देवापूरचे अन्यायग्रस्त नागरिक उपोषणास बसले आहेत.

हणबर समाजाचा मागासांमध्ये समावेश करण्याची मागणी
सांगली, १० जून / प्रतिनिधी
हणबर समाजाचा अनुसूचित जाती-जमातीत समावेश करावा, अशी मागणी हणबर समाज संघटनेचे राज्य संघटक मारुती नवलाई यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. रत्नवेल पांडियन यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील विविध जातींचा केंद्र शासनाच्या मागासवर्ग यादीत समावेश करण्यासाठी मुंबई येथे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. रत्नवेल पांडियन, डॉ. सुब्बा सोमू, राम अवधेश सिंग, अब्दुल अली अझीज व श्रीमती चित्रा चोप्रा यांच्यासमोर झालेल्या सुनावणीवेळी मारुती नवलाई यांनी ही मागणी केली. राज्य शासनाने हणबर समाजाचा इतर मागासवर्गीय जातीत समावेश करून या समाजावर अन्याय केला आहे. त्यामुळे या समाजाला मोठय़ा प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तरी हणबर समाजाचा अनुसूचित जाती-जमातीत समावेश करून विकासापासून वंचित राहिलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणावे, अशी मागणी मारुती नवलाई यांनी केली आहे. या शिष्टमंडळात वाय. बी. पाटील, भाई जोतगोंडे, गंगाधर व्हसकोटी, कोल्हापूरचे जिल्हा सचिव डॉ. संदीप गुडंकल्ले, रामचंद्र येमीटकर, बाबासाहेब खोत व विठ्ठल हणबर आदींचा समावेश होता.

उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिक्षिका सारिका भरले यांची निवड
सोलापूर, १० जून/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत वर्ग-१ अधिकारीपदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षिका सारिका शिवानंद भरले या उत्तीर्ण झाल्या असून, त्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदासाठी पात्र झाल्या आहेत.राज्य सेवा आयोगाकडून राज्यातील एकूण ३० उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी २००६ मध्ये मुख्य परीक्षा घेऊन पात्र उमेदवारांची १८ मार्च २००९ रोजी मुलाखत घेण्यात आली होती. अंतिम निकालात सारिका भरले या गुणवत्ता यादीत १८ व्या व महिला उमेदवारांमध्ये पाचव्या क्रमांकावर आल्या. त्यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. श्रीमती भरले या दक्षिण सोलापूर तालुक्यातील घोडा तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या ६-७ वर्षांपासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे शिवानंद भरले यांच्या सारिका भरले या पत्नी आहेत.

बार्शीत शोभेच्या दारूचा स्फोट होऊन चौघे भाजले
सोलापूर, १० जून/प्रतिनिधी
बार्शी शहरात विक्रीसाठी बेकायदा साठा करुन ठेवलेल्या शोभेच्या दारुचा स्फोट होऊन त्यात एकाच घरातील चौघेजण भाजून जखमी झाले. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोघा बंधूंविरुध्द बार्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या स्फोटात वाहेद वहाब मनियार (वय ३५), त्याचा भाऊ अल्ताफ (वय १८) तसेच घरातील रब्बाना इस्माईल अतार (वय ४०) व रफाला कलीम सौदागर (वय २८, रा. मंगळवार पेठ, बार्शी) हे चारजण भाजून जखमी झाले. त्यांना बार्शीच्या जगदाळे मामा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हायड्रोजन बॉम्ब व लक्ष्मी तोटे तयार करण्याचा मनियार यांचा कारखाना आहे. या शोभेच्या दारुचा साठा त्यांनी बेकायदेशीर करुन घरात ठेवला होता.

पुणे-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेसची मुदत सप्टेंबपर्यंत वाढविली
सोलापूर, १० जून/प्रतिनिधी
पुण्याहून सोलापूरसाठी प्रायोगिक तत्त्वावर गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या इंद्रायणी एक्स्प्रेसला प्रवाशांकडून मिळत असलेला उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन ही इंटरसिटी गाडी येत्या सप्टेंबपर्यंत धावणार आहे. या मुदतवाढीची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे परिचालन व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी सांगितली. पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणारी १६ डब्यांची इंद्रायणी एक्स्प्रेस पुढे सोलापूपर्यंत वळवून इंटरसिटीच्या स्वरुपात (क्रमांक ११३ व ११४) गेल्या फेब्रुवारी अखेरपासून सुरु करण्यात आली होती. सकाळी ९ वाजता पुण्याहून ही गाडी सुटते आणि दुपारी १.३० वाजता सोलापुरात पोहोचते. त्यानंतर ही गाडी दुपारी २ वाजता पुण्याकडे मार्गस्थ होऊन पुण्यात सायंकाळी ५.४५ वाजता पोहोचते. ही गाडी पुणे आणि सोलापूरच्या प्रवाशांच्या दृष्टीने अतिशय सोयीची असल्यामुळे तिला सुरुवातीपासून प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. दररोज सरासरी १२०० प्रवाशांची ने-आण करणारी ही गाडी अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे.

‘कृष्णा’चे संचालक मंडळ थायलंडला अभ्यास दौऱ्यावर
कराड, १० जून/वार्ताहर
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ उपाध्यक्ष दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाच दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर रवाना झाले. संचालक मंडळाने स्वखर्चाने थायलंड येथे अभ्यासदौरा आखला असून ‘कृष्णा’चे अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते व त्यांची पत्नी डॉ. सविता यांनी अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.कृष्णा कारखाना शून्य प्रदूषण होण्यासाठी हा अभ्यासदौरा असून थायलंड येथील तज्ज्ञांनी गतवर्षी कृष्णा कारखान्याला अभ्यासकामी दिलेल्या भेटीवेळी संचालक मंडळाला थायलंड भेटीचे निमंत्रण त्यांनी दिले होते. यशस्वी ऊस कारखानदारी संदर्भातील या अभ्यासदौऱ्याचा सखोल, अभ्यासपूर्ण अहवाल कृष्णा कारखा-न्याच्या बैठकीसमोर येणार आहे.या दौऱ्याबाबत सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.

फसवणूक करणाऱ्या जडेजाच्या पुतळ्याचे दहन
इचलकरंजी, १० जून / वार्ताहर
गुंतवलेली रक्कम तीन पटीत देण्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या डॉ.अशोक जडेजा याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे आज येथे दहन करण्यात आले. शांतिनगर परिसरातील कंजारभाट समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. पुतळा दहन करतेवेळी जडेजाच्या निषेधाच्या घोषणा देत त्याच्या पुतळ्याला चप्पलने मारले जात होते.

राष्ट्रवादीचा वर्धापनदिन उत्साहात
आटपाडी, १० जून / वार्ताहर
राष्ट्रवादी काँग्रेसचा १० वा वर्धापनदिन आज मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. शहर कार्यालयासमोर पक्षाचे तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या प्रसंगी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जि. प. सदस्य रामचंद्र पाटील, पंचायत समिती सभापती रुक्मिणी खंदारे, राजश्री लेंगरे, अशोकराव देशमुख, जयंत नेवासकर, विजयसिंह पाटील, मनोज मरगळे व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. वर्धापनदिनानिमित्त पक्ष कार्यालयात चहापानाचा कार्यक्रम झाला.

अण्णाराव मरगूर यांचे निधन
सोलापूर, १० जून/प्रतिनिधी

येथील दमाणी प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक तथा सोलापूर चेंबर कॉमर्सचे कार्यालयीन अधीक्षक अण्णाराव गुरुबसप्पा मरगूर यांचे मंगळवारी सायंकाळी अपघाती निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.