Leading International Marathi News Daily

गुरुवार, ११ जून २००९

कुरघोडी कोण करणार?
प्रदीप नणंदकर

मतदारसंघाच्या पुनर्रचनेत पूर्वीच्या लातूर विधानसभा मतदारसंघाचे दोन भाग करून शहर व ग्रामीण असे दोन मतदारसंघ तयार करण्यात आले. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात लातूर तालुक्यातील १६ गावे वगळता उर्वरित सर्व गावे, रेणापूर तालुका व औसा तालुक्यातील दोन जिल्हा परिषद विभागांचा समावेश करण्यात आला आहे. तीन तालुक्यांचा समावेश असलेला हा मतदारसंघ आहे. रेणापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले तर औसा तालुक्यावर शिवसेनेचे आमदार दिनकर माने यांचे वर्चस्व आहे.

युतीतील समन्वय महत्त्वाचा
गणेश कस्तुरे

नांदेड विधानसभा मतदारसंघाचे दोन भाग करून नांदेड (दक्षिण) व नांदेड (उत्तर) असे दोन स्वतंत्र मतदारसंघ निर्माण झाल्याने केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर विजय मिळविण्याचे गणित यंदा जमणार नाही. मतदारसंघाची झालेली पुनर्रचना भल्याभल्यांचे विजयाचे अंदाज यंदा खोटे ठरवेल असे मानले जाते. नांदेड विधानसभा मतदारसंघ हा गेल्या २० वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला. संपूर्ण देशात नांदेडची ओळख जगप्रसिद्ध गुरुद्वारामुळे

विधान परिषदेवर माणिकराव बिनविरोध
प्रदेशाध्यक्ष बदलणार ?
मुंबई, १० जून / खास प्रतिनिधी
विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता अपेक्षेप्रमाणे एकच अर्ज आल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली. अर्थात त्याची औपचारिकता शनिवारी पूर्ण होईल. शिवसेना-भाजप युतीने उमेदवारी अर्ज न भरल्याने विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध झाली. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ठाकरे यांचा एकच अर्ज आला.

शिवसेना-भाजपच्या मूळ मुळावर उठले
‘हिंदुत्वा’च्या जहाल चेहऱ्याने भाजपचे तोंड पोळल्याचे आता या पक्षाचे नेते खासगीत मान्य करू लागले आहेत तर ‘मराठी’च्या मुद्दय़ामुळे शिवसेनेची अवस्था मानगुट पिरगळली गेल्यासारखी झाली आहे, असे भाजपचे नेते जाहीरपणे तर शिवसेनेचे नेते खासगीत कबुल करीत आहेत. आपले मूळ मुळावर उठावे यापेक्षा दुसरी शोकांतिका ती काय? लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची एवढी सरशी होईल याची खुद्द सोनिया गांधी यांनाही खात्री नव्हती.

अभूतपूर्व घोषणायुद्धात कामकाज तहकूब
मुंबई, १० जून/ खास प्रतिनिधी

हे सरकार बंडलबाज आहे, ४२० आहे आणि सर्वसामान्यांची फसवणूक करणारे आहे, या विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्या उद्गारावरून आज विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन कदम यांनी माफी मागावी, अशा जोरदार घोषणा दिल्या तर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकार आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. जवळपास दोन तास चाललेल्या या घोषणायुद्धानंतर अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभारासाठी तहकूब केले.

काँग्रेसमधील विलीनीकरणाने राष्ट्रवादीत भाऊबंदकीची शक्यता - गोपीनाथ मुंडे
मुंबई, १० जून/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस नजिकच्या काळात काँग्रेसमध्ये विलिन होईल. शरद पवार हे उमेदवार निवडून आणू शकतात, हा विश्वास लोकसभा निवडणूक निकालाने संपुष्टात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील बरेचजण अस्वस्थ आहेत. मात्र काहींना हा निर्णय अमान्य असेल तर त्यामुळे या पक्षात भाऊबंदकी माजू शकते, अशी शक्यता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक बातचित करताना व्यक्त केली. राष्ट्रवादीचे खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे निंबाळकर खून प्रकरणी ‘मोक्का’ कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

राणे यांच्या इशाऱ्यावरून आमदार झाले आक्रमक !
मुंबई, १० जून / खास प्रतिनिधी

विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी सदस्य खोटेनाटे आरोप करीत असताना सभागृहात काँग्रेसचे आमदार बचावात्मक भूमिका का घेतात, असा सवाल उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी रात्री पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत केला होता. त्यानंतर लगेचच आज विरोधी पक्षनेते रामदास कदम यांना लक्ष्य करून काँग्रेसचे आमदार आक्रमक झालेले सभागृहात बघायला मिळाले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी रात्री उशिरा पक्षाच्या आमदारांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत राणे यांनी विरोधी सदस्यांना झुकते माप मिळत असल्याबद्दल नाराजीचा सूर लावला होता. विरोधी पक्षनेते व अन्य आमदार सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आरोप करीत असताना आपल्याकडून त्याला काहीच प्रत्युत्तर दिले जात नाही, असा राणे यांना आक्षेप होता. यामुळेच आज सभागृहात विरोधी पक्षनेते कदम यांना लक्ष्य करण्यात आले. गोंधळ सुरू असताना घोषणाबाजीमध्ये काँग्रेसचे आमदार आघाडीवर होते. आमदारांच्या बैठकीत मतदारसंघांमधील कामे लवकरात लवकर व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आमदारांची मागणी होती. लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले असले तरी हुरळून जाऊ नका, असे सांगून महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सर्वांना सावध केले. मुख्यमंत्री चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचीही भाषणे झाली.

ठाणे जिल्ह्यात गुंड टोळ्यांचे राज्य- वसंत डावखरे
मुंबई, १० जून/प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यात गुंड टोळ्यांचे राज्य आहे. येथील काही पोलीस ठाण्यांतील पोलीस बिल्डरांचे हस्तक असल्याप्रमाणे वावरत आहेत. येथील पोलिसांवर कारवाई केली तर त्यांचे संरक्षण करायला ते ‘मॅट’ बसले आहे, अशा शब्दांत विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी आज नाराजी प्रकट केली. ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीसंबंधात चर्चा करण्याकरिता उद्या पोलीस महासंचालकांना उपसभापती डावखरे यांच्या दालनातील बैठकीकरिता बोलाविण्याची घोषणा त्यांनी केली. काँग्रेसचे सदस्य मुझफ्फर हुसेन यांनी ठाणे जिल्ह्यातील गुंडगिरीवर प्रकाश टाकणारी लक्षवेधी सूचना दाखल केली होती. अरविंद सावंत, संजय केळकर यांनी चर्चेत भाग घेतला. हुसेन म्हणाले की, पाच मे रोजी उत्तन येथील आऊटपोस्ट स्टेशनजवळ एका नागरिकावर गुंडांनी सशस्त्र हल्ला केला. त्याने पोलिसांना दिलेल्या जबानीत ज्यांची नावे दिली त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही. उलटपक्षी त्यांना जामीन मिळावा याकरिता पोलिसांनी मदत केली. गृहराज्यमंत्री नितीन राऊत यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यामुळे उपसभापती डावखरे यांचे समाधान झाले नाही. ते म्हणाले की, बाळासाहेब देसाई यांच्यासारखे गृहमंत्री मी पाहिले आहेत. त्यांच्याएवढे आपण मोठे होऊ शकत नाही. मंत्र्यांच्या उत्तराने मी जराही समाधानी नाही. उद्या माझ्या दालनात पोलीस महासंचालकांसोबत बैठक बोलावणार असून त्यावेळी ठाणे जिल्ह्यातील आमदारांना बोलाविण्यात येईल.